‘...फुरसतके रात दिन ...’
गुलजार यांच्या मौसम चित्रपटातील फुरसतके रात दिन या गाण्याचा अर्थ, भावना समजून सांगताहेत लेखक श्रीनिवास बेलसरे
X
इंग्रजी कादंबरीकार ए. जे. क्रोनिन यांची ‘द जुडास ट्री’ ही कादंबरी १९६१ साली प्रकाशित झाली होती. त्यावर १९७५ साली हिंदीत एक सिनेमा आला होता. दिग्दर्शक होते गुलजार आणि सिनेमा ‘मौसम’! मूळ कथानकात गुलजार यांनी काही बदल केले तरी त्यांच्या जबरदस्त शैलीमुळे दर्जेदार आणि अभिरुचीसंपन्न सिनेमा पसंत करणाऱ्या प्रेक्षकात या सिनेमाचे स्थान अद्वितीय ठरले.
चुकून हातातून निसटून गेलेल्या काळाविषयीची हुरहूर हा तर माणसाच्या मनाला हात घालणारा चिरंतन विषय! त्यात ‘मौसम’मध्ये अमरनाथ गीलने (संजीवकुमार) डॉक्टर होण्यासाठी केवळ गाव सोडलेले नसते तर त्याचे पहिले प्रेम असलेल्या चंदाला (शर्मिला टागोर) विसरून तो कलकत्त्यात आपल्या करियरमध्ये रममाण झालेला असतो. अचानक सगळे आठवल्याने तो आपल्या भोळ्याभाबड्या प्रेयसीला शोधायला दार्जीलिंगला परत येतो तेव्हा त्याला तिची भयानक शोकांतिका समजते. तिच्या वाताहतीला आणि नंतर तिच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यालाही आपणच कारणीभूत झालो आहोत हे लक्षात आल्याने तो बेचैन होतो.
मूळ कादंबरीकार क्रोनिन यांनी कादंबरीच्या नावात बायबलमधील जुडासचा उल्लेख केला कारण प्रभू येशूला धरून देण्यासाठी त्याने फितुरी केली होती आणि येशूच्या वेदनामय मरणाला आपण कारणीभूत आहोत हे लक्षात आल्यावर पश्चातापाने गळफास घेऊन आत्महत्याही केली होती. कलकत्याला गेल्यावर आपल्या प्रेयसीला पूर्णपणे विसरून गेलेल्या संजीवकुमारला जेव्हा वेश्या बनलेली आणि हुबेहूब आपल्या आईसारखी दिसणारी आपली मुलगी दिसते तेव्हा त्याच्या मनात जुडाससारखा अपराधीपणा दाटून येतो. ‘मौसम’ हा सिनेमा म्हणजे आपल्याच मुलीला त्या नरकातून सोडविण्यासाठी डॉ. गीलने केलेले प्रयत्न आणि त्याच्या मनात सतत फेर धरणाऱ्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीची काव्यमय अभिव्यक्ती होती. भूपिंदरसिंह आणि लता दीदीने गायलेले ‘दिल ढूंडता हैं फिर वोही फुरसत के रात दिन’ ऐकताना अस्वस्थ झाला नाही असा माणूस मिळणे अशक्य आहे.
‘मौसम’चे वैशिष्ट्य म्हणजे इतर सिनेमात आपण नकळत कोणत्या तरी एका पात्राशी स्वत:ला जोडून घेतो तसे इथे होत नाही. ‘मौसम’ पाहताना प्रेक्षक स्वत: प्रत्येक भूमिकेत जातो. प्रत्येक पात्राचे मनोव्यापार त्याला समजू लागतात. अर्थात ही किमया होती गुलजार यांच्या दिग्दर्शनाची! रेंगाळणारी प्रेमभावना हा गुलजार यांचा आवडता विषय. त्यामुळे तारुण्यात होऊन गेलेल्या प्रेमाचा प्रत्येक क्षण त्यांनी या गाण्यात टिपला आहे.
दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसतके रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए
या कुणालाही भूतकाळात घेऊन जाईल अशा गाण्यात नकळत एक रोमँटिक मूड बनूनच जातो.
जाड़ोंकी नर्म धूप और आँगनमें लेटकर
आँखोंपे खींचकर तेरे आँचलके सायेको
औंधे पड़े रहें कभी करवट लिये हुए
दिल ढूँढता है...
मुद्दाम निवडलेला वाटावा अशा भूपिंदरसिंगच्या वेगळ्याच पोताच्या आवाजामुळे आपण प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकतो आणि प्रत्येक शब्दचित्र मनासमोर तरलपणे जिवंत होत जाते. हिंदी सिनेमात अनेकदा हिरो थियेटरात जावून सिनेमा पाहत असतो असे दाखवतात. त्यावेळी हमखास गाण्यातील हिरोच्या जागी स्वत:ला आणि हिरोईनच्या जागी आपल्या प्रेयसीला पाहू लागतो आणि गाणे संपताना पुन्हा मूळ हिरो आणि हिरोईन सिनेमाच्या सिनेमातील आपली जागा घेतात. असेच मौसमच्या प्रत्येक गाण्यात आपलेही होते! ही किमया पुन्हा गुलजार यांच्याच शब्दांची आणि दिग्दर्शनाची! ते सगळ्या ऋतूतील आयुष्याचे कवडसे दाखवून आपल्याला कथेत पूर्ण गुंतवून टाकतात-
या गरमियोंकी रात जो पुरवाईयाँ चलें
ठंडी सफ़ेद चादरोंपे जागें देर तक
तारोंको देखते रहें, छतपर पड़े हुए
दिल ढूँढता है...
‘मौसम’चे यश खरे तर ‘दिल ढुंडता हैं’ या पहिल्या ३ शब्दातच निश्चित झाले होते. कारण सहीमे दिल ढुंडता ही रहता हैं!
पण अशा हुरुहूर लावणाऱ्या गाण्याबरोबर हिंदी कवींनी वास्तवाचे कठोर भान देणारी गाणीही तितक्याच प्रभावीपणे लिहून ठेवली आहेत. ‘शिरीन-फरहाद’मध्ये गीतकार तन्वीर नक्वी यांचे एक गाणे लतादीदीने गायले आहे. ते आपल्याला एकदम वास्तवात आणून सोडते. ‘गुज़रा हुआ ज़माना, आता नहीं दुबारा हाफ़िज़ खुदा तुम्हारा’ अशा ओळीने सुरु होणाऱ्या गाण्यात लतादीदींनी आवाज काही वेगळाच लावलाय.
खुशियाँ थीं चार पलकी आँसू हैं उम्र भरके,
तन्हाइयोंमें अक़्सर रोएंगे याद करके,
दो वक़्त जो कि हमने इकसाथ है गुज़ारा,
हाफ़िज़ खुदा तुम्हारा..
एक अटळ अशी ताटातूट झाल्यावरचे हे गाणे आहे. त्यात एका हरलेल्या मनाची तडफड आहे, अनिच्छेने घेतलेला निरोप आहे, आपल्या प्रिय व्यक्तीला केलेली शेवटची विनंती आहे.
मेरी क़सम है मुझको तुम बेवफ़ा न कहना
मजबूर थी मुहब्बत सब कुछ पड़ा है सहना
तूफ़ाँ है ज़िन्दगीका, अब आखिरी सहारा
हाफ़िज़ खुदा तुम्हारा...
पण कितीही निरोप दिला तरी आठवणी मात्र जात नसतात. त्या हळव्या मनाचा पाठलाग शेवटपर्यंत करतच राहतात. ‘दिल एक मंदिर’मध्ये शैलेन्द्रने असेच एक अजरामर गीत लिहून ठेवले आहे. शंकर जयकिशन यांच्या संगीतामुळे तर ते कितीतरी पिढ्यांच्या मनावरच कोरले गेले. त्यात रफीसाहेबांचा आवाज म्हणजे खपली काढून जखम पुन्हापुन्हा भळाभळा वाहू द्यायचीच ना.
याद न जाए, बीते दिनोंकी
जाके न आये जो दिन दिल क्यूँ बुलाए
उन्हें, दिल क्यों बुलाए..
शैलेन्द्र यांच्या उपमा कुणालाही चटकन समजाव्या अशाच असत. या कवीचा भर होता तो आपला आशय सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत सहज पोहोचावा यावर! त्यामुळे अगदी अमूर्त अशा संकल्पनाही ते नेहमी चित्रमय करून टाकताना दिसतात-
दिन जो पखेरू होते, पिंजरेमें मैं रख लेता
पालता उनको जतनसे, मोतीके दाने देता
सीनेसे रहता लगाए, याद न जाए...
आयुष्यातून निघून गेलेल्यांची आठवण त्याने जीवापाड जपली आहे. पण आता ‘ती’ तर परक्याची झालेली आहे. हे भानही कवीच्या मनात असल्याने तो म्हणतो-
तस्वीर उनकी छुपाके, रख दूँ जहाँ जी चाहे,
मनमें बसी ये मूरत, लेकिन मिटी न मिटाए,
कहनेको हैं वो पराए...
पण जिथे असे काही निर्णायक झालेले नाही. अजूनही दुरावा संपू शकतो, आशा बाकी आहे आणि तरीही घालमेल आहे, ताटातूट आहे ती भावावस्था गीतकार योगेश यांनी ‘छोटी सी बात’मध्ये सुंदर चितारली होती. सलील चौधरींच्या मार्गदर्शनात लातादिदीचा आवाज होता-
न जाने क्यों, होता है ये ज़िन्दगीके साथ
अचानक ये मन, किसीके जानेके बाद
करे फिर उसकी याद, छोटी-छोटीसी बात
बासू चटर्जी यांच्या ‘बातो बातो मे’ मध्येही योगेश यांनी असेच एक सुंदर गाणे दिले आहे. अशाच तात्पुरत्या विरहाचे, पण तरीही अस्वस्थ करणारे.
कहाँ तक ये मनको, अँधेरे छलेंगे
उदासीभरे दिन, कभी तो ढलेंगे
कभी सुख कभी दुःख, येही ज़िन्दगी है
ये पतझड़का मौसम, घडी दो घडी है
नए फूल कल फिर, डगरमें खिलेंगे
उदासी भरे दिन, कभी तो ढलेंगे
अमोल पालेकर आणि टीना मुनीमचा हा सिनेमा बासूदांनी काहीशा हलक्या फुलक्या वातावरणात चित्रित केला होता. इथे हरलेला प्रियकर स्वत:च्याच मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो आहे. योगेश यांनी या विरहाच्या गाण्यातच पुनर्मिलनाची आशा किती अलगद गुंफली होती पहा.
भले तेज कितना हवाका हो झोंखा
मगर अपने मनमें तू रख ये भरोसा
जो बिछड़े सफरमें तुझे फिर मिलेंगे
उदासी भरे दिन, कभी तो ढलेंगे.
अनेकदा अशाच लहानशा आशेवर तर लोक सगळे जीवन काढतात. जीवनाच्या ‘पँडोराज बॉक्स’मध्ये त्या ग्रीक परीकथेतील देवदूतासारखी लपून बसलेली तीच ‘होप’ नावाची परी ‘त्या वरच्या’ने अलगद ठेवूनच दिलेली असते.
श्रीनिवास बेलसरे.
(लेखक चित्रपट, चित्रपटातील गाणी आणि अन्य विषयांवर लिखाण करतात.)
72086 33003






