Manmohan Singh Tribute "आमच्या डॉ. मनमोहनसिंगांचा भारत!"
स्वतंत्र भारताच्या इतिहासात नेहरूंनंतर सगळ्यात महत्त्वाचे पंतप्रधान म्हणूनच मनमोहनसिंगांची नोंद होईल. जगाला हेवा वाटावा, ओबामांसारखा नेता ज्याच्यासमोर झुकावा, अशा या स्कॉलर नेत्याला त्याच्या बदल्यात भारतात काय मिळाले? वाचा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा लेख
X
London School of Economics 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'च्या प्रांगणात असताना, तिथले एक प्राध्यापक भेटले. गप्पा सुरू झाल्यावर, "कोण-कुठले?", असे प्रश्न आले. "भारतातून आलो", हे समजल्यावर ते म्हणाले- "आमच्या डॉ. मनमोहनसिंगांचा भारत!" Our Dr. Manmohan Singh's India
डॉ. मनमोहन हे 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'चे विद्यार्थी, याचा केवढा अभिमान तिथल्या लोकांना!
डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या निर्यात कामगिरीवर आपला डॉक्टरेटचा अभ्यास केला. प्रबंध लिहिला. त्यांच्या संशोधनातून आर्थिक धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यापार, देशांतर्गत रचना यांचा परस्परसंबंध स्पष्टपणे समोर येतो, असे मला ते प्राध्यापक सांगत होते! इकडे नेहरू पंतप्रधान असताना, तिकडे लंडनमध्ये भारताचा नवा पंतप्रधान घडत होता, हे किती पोएटिक आहे! गांधी-नेहरू-आंबेडकर जिथे घडले, तिथेच मनमोहनसिंगांच्या कक्षा रुंद होत होत्या. पोरवयात फाळणीच्या जखमा झेललेला हा गरिबाघरचा पोरगा गांधी-नेहरूंच्या भारतात लहानाचा मोठा होत गेला.
Dr. Manmohan Singh डॉ. मनमोहन यांचे बालपण अत्यंत संघर्षमय परिस्थितीत गेले. सध्याच्या पाकिस्तानात येणाऱ्या गाह या लहानशा गावात ते जन्मले. लहान वयातच आईचे छत्र हरपले. फाळणीच्या काळात झालेल्या दंगली, विस्थापन आणि अनिश्चिततेचा अनुभव त्यांनी जवळून घेतला. धर्मांधतेचा वणवा पाहिला. फाळणीनंतर कुटुंब भारतात स्थलांतरित झाले आणि अमृतसरमध्ये स्थिरावले. असा प्रवास करणारा एक अबोल, शांत आणि पुस्तकात रमणारा स्कॉलर पोरगा पुढे या देशाचा पंतप्रधान झाला.
डॉ. मनमोहनसिंग,
तुम्ही आमचे पंतप्रधान होतात!
एक नाही, दहा वर्षे हा देश तुम्ही सांभाळलात.
जागतिकीकरणानंतर अवघं जग गोंधळलंं. या कोलाहलातही भारताला आपला सूर सापडला, तो डॉ. मनमोहनसिंग यांच्यामुळे.
विषमता आणि विखार वाढत असताना, धर्मांध शक्तींनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश मिळवलेला असताना, या देशाला वेळीच योग्य वाट दाखवली, ती मनमोहनसिंगांनी.
जगाला हेवा वाटावा, ओबामांसारखा नेता ज्याच्यासमोर झुकावा, अशा या स्कॉलर नेत्याला त्याच्या बदल्यात भारतात काय मिळाले?
हेटाळणी, अवमान आणि उपहास.
भारतालाच आवाज देणार्या उत्तुंग नेत्याला 'मौनीबाबा' म्हणून हिणवणे आणि देश घडवणार्या कणखर राष्ट्रपित्याला 'मजबुरी का नाम महात्मा गांधी' म्हणणे यात गुणात्मक काही फरक नाही.
अन्य स्पर्धक असतानाही महात्मा गांधींनी नेहरूंची निवड केली आणि नेहरूंनी भारत नावाचा देश उभा केला. तर, स्पर्धेत नसतानाही सोनिया गांधींनी मनमोहनसिंगांची निवड केली आणि मनमोहनसिंगांनी अवघड वळणावर या देशाला सावरले. पुढे नेले.
वर्तमानाने मनमोहनसिंगांचे मोल ओळखले नसेल, पण 'इतिहास मला न्याय देईल', ही त्यांचीच खात्री. स्वतंत्र भारताच्या इतिहासात नेहरूंनंतर सगळ्यात महत्त्वाचे पंतप्रधान म्हणूनच मनमोहनसिंगांची नोंद होईल.
नेहरूंनंतर शास्त्री मिळाले, इंदिरा गांधी आल्या. त्यामुळे त्याच वाटेने देश जात राहिला. अगदी वाजपेयींच्या काळातही देशाने हा रस्ता सोडलेला नव्हता. आज नवा भारत ज्या रस्त्याने चाललेला आहे, अशा वेळी मनमोहनसिंगांचे जाणे भयंकर शोकव्याकुळ करणारे आहे.
डॉ. मनमोहनसिंग, इतिहास तुम्हाला न्याय देईलच; पण तुमच्यासारखी अशी सगळी थोर माणसे इतिहासात गेलेली असताना, वर्तमानाची ही लक्तरे आम्ही कुठे कुठे आणि कशी गुंडाळायची?
- संजय आवटे
ज्येष्ठ पत्रकार
(साभार - सदर पोस्ट संजय आवटे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतला आहे.)






