Home > मॅक्स ब्लॉग्ज > मुस्लिम संघर्ष

मुस्लिम संघर्ष

सध्या आफगाणिस्तानमधील संघर्षाने पुन्हा एकदा धार्मिक संघर्षाबाबत जागतिक स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या चर्चेचं मुळ कारण काय आहे? जागतिक देश कशा प्रकारे धार्मिकतेच्या कारणांवरून एकमेकांशी लढतात. या सगळ्यांमध्ये अमेरिकेची नक्की भूमिका काय आहे? जागतिक स्तरावर मुस्लीमांचा, ज्यू लोकांचा आणि ख्रिस्ती लोकांचा संघर्ष नक्की काय आहे? आणि या सगळ्यांमध्ये हिंदू समाजाची भूमिका नक्की काय असायला हवी... समजून घेण्यासाठी वाचा संजय सोनवणी यांचा लेख

मुस्लिम संघर्ष
X

१) Non believer (काफिर) पैगंबरंच्या दृष्टीने कोण होते?

हा खरा प्रश्न आहे. प्रथम ते काफिर ज्यू होते आणि त्यात ख्रिस्चनांची भर पडली. ते का काफिर ठरले? कारण ज्यू हेच आपले प्रथम अनुयायी होतील असे पैगंबरांना वाटले होते. मुळात इस्लाम हा ब-यापैकी ज्यू धर्मतत्वांच्या निकटचा आहे.

"अल्लाह" हा शब्द ज्यूंच्याच "एल - अल" या शब्दांतुन निर्माण झाला आहे. अल्लाह हा अरब जगताला इस्लअमपुर्व काळापासुन माहित होता. पण ज्युंनी पैगंबरांचे प्रेषितत्व नाकारले आणि ज्यू शत्रू (काफर) झाले. ख्रिस्ती धर्मही ज्युंचीच पडछाया असल्याने तेही काफर. त्यात जेरुसलेमच्या धर्मस्थळावरून काही शतके क्रुसेडस झाली. त्यात हे वैर वाढत गेले. याचा हिंदू धर्माशी कधीही संबंध नव्हता.

२) अरब, ज्यु हे वाळवंटी प्रदेशातील रहिवासी. टोळ्यांत राहणारे. स्वाभाविकच त्यांच्यात पाणी, अन्न आणि स्त्री यावरुन आपापसात झगडे होत राहणे अपरिहार्य होते. तत्कालीन टोळीजीवनातील आवेश, हिंसकता याचे प्रतिबिंब धर्मतत्वांत पडणे स्वअभाविक आहे.

उदा. वैदिक धर्मही टोळीजीवनातुनच निर्माण झाला. त्यातही परधर्मियांबद्दल पुरेपुर अनास्था, हिंसकता, लुटींचे समर्थन आहे. हवे तर वेद पुन्हा वाचुन घ्या. वैदिकांचा मुख्य देव इंद्रही युद्धायमान असाच आहे. धर्म हा परिस्थितीचे अपत्य असतो.

३) आपण आज मुस्लिम राष्ट्रे हा शब्द बिनदिक्कत वापरतो, पण अमेरिका ते युरोपातील राष्ट्रांना "ख्रिस्ती राष्ट्रे" हा शब्द वापरत नाही. बव्हंशींचा तो अधिकृत धर्म असुनही. आणि युरोपिय राष्ट्रांनी एखाद्या ख्रिस्ती राष्ट्रावर एकत्र येत हल्ला चढवल्याचे उदाहरण नाही. इराकबद्दल ते का हे लक्षात घ्यायला हवे.

४) ख्रिस्त्यांना ज्युंबद्दल प्रेम आहे म्हणून नव्हे तर मुस्लिम राष्ट्रांवर सातत्याने कुरघोडी करायची आहे म्हणून. पाकिस्तानला अमेरिकेने त्यासाठीच "पाळले" आहे. हिंदु राष्ट्रावर वचक राहावा म्हणून हे आम्ही कधीही लक्षात घेत नाही.

५) दहशतवादाबत्द्दल म्हणाल तर प्रत्येकाने बायबल (विशेषत: 'जुना करार") वाचायलाच हवे. हिंसेची मुलतत्वे त्यात, जेवढी कुराणमद्ध्ये आहेत, तेवढीच दिसून येतील.

६) आद्य आत्मघातकी दहशतवाद ज्युंनी शोधला, दुस-या शतकापासून निरलसपणे वापरला. फार कशाला अलीकडेच लिट्टॆला आत्मघातकी दहशतवादाचे धडे देणारे ज्यूचे मोसादच होते.

७) अरबी राष्ट्रे, (जी आज मुस्लिम आहेत), ख्रिस्ती (जे आज बव्हंशी युरोपियन नि अमेरिकन खंडीय आहेत) आणि अल्पसंख्य पण व्यापारी वृत्तीचे ज्यू हा तिढा अरबांच्याच भुमीवर निर्माण झाला आहे. मुस्लिम राष्ट्रे सरळ युद्धात ख्रिस्ती राष्ट्रांशी आणि ख्रिस्ती-सपोर्टेड ज्युंशी सरळ लढ्यात जिंकु शकलेले नाहीत आणि जिंकण्याचे सुतराम शक्यता नाही.

जगातील सर्व महत्त्वाची माध्यमं ख्रिस्त्यांच्या हाती आहेत. अरबी माध्यमांची विश्वासार्हता एक तर प्रश्नांकित तरी आहे आणि त्यांचा रीचही जास्त नाही. त्यामुळे मुस्लिमांना दहशतवादाचा आश्रय (त्याच्या दृष्टीने तो गनिमी कावा) घेतल्याखेरीज गत्यंतर काय? अमेरिका हे जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र आहे. हे मी खुद्द अमेरिकेतच जाहीर मुलाखतीत म्हणून आलोय.

केवळ आर्थिक कारणांसाठी जग त्यांचे पोलिसिंग सहन करत असेल तर जागतिक समुदायांनी विचार करायला हवा.

८) भारतातील मुस्लिम हे बव्हंशी याच भुमीचे, कृषी संस्कृतीचे नागरिक आहेत, टोळी संस्कृतीचे नाहीत. अरबी-इराणी मुस्लिम समाज आणि भारतीय मुस्लिम समाजाला एकाच तागडीत तोलने योग्य नाही. सर्वात अधिक मुस्लिमच सुफी, वारकरी, वैष्णव संत भारतात झालेले आहेत. हे वास्तव नजरेआड करुन चालणार नाही.

९) युरोपियनांना सेमेटिकांशी नाळ एकोणिसाव्या शतकापासूनच तोडायची होती. हिटलरचा थिंक टॅंक रोझेनबर्ग म्हणतो, गो-या युरोपियांचा आणि सावळ्या सेमेटिकांचा भाषिक/वांशिक आणि सांस्कृतिकही संबंध नाही. मुळात आर्य सिद्धांत आणि नंतर इंडो-युरोपियन सिद्धांत जन्माला घातला गेला. कारण युरोपियनांना आपल्या संस्कृतीचा इतिहास पुर्वेकडे शोधायचा होता. आधी भारत नि चीन हे स्पर्धेत होते, पण नंतर त्यांनी याही स्थानांना नाकारत नवी मुलस्थाने शोधायला सुरुवात केली. दुर्दैवाने (अस्तित्वातच नसल्याने) गेल्या दोनशे वर्षांतही असे कोणतेही मुलस्थान त्यांना सापडलेले नाही.

१०) पण याच सिद्धांतामुळे येथील वैदिकांना युरोपियन (पक्षी ख्रिस्ती) जवळचे वाटतात. कारण त्यांच्या सिद्धांतामुळे जेवढे युरोपियनांचे वर्चस्वतावादी धोरण अंगिकारता येते तेवढेच स्वमाहात्म्यही गाजवता येते. ज्युंबद्दलचे वैदिकांचे प्रेम हे केवळ आणि केवळ मुस्लिमांवर दबाव बनवून आहेत म्हणून आहे, अन्य काही हेतु नाही.

११) थोडक्यात ख्रिस्ती विरुद्ध अरबी (सेमेटिक) इस्लाम या संघर्षात वैदिकजन अकारण मुर्खपणाच्या वर्चस्वतावादी भावनेतुन पडले आहेत.

१२) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, या संघर्षाचे आकलन नसलेले भारतीय मुस्लिम, केवळ धर्मभावनेने प्रेरीत होत अरबी मुस्लिम/ख्रिस्त्यांच्या संघर्षात "जणु आपलेच नाक कापले गेले" या भावनेतून पाहतात. तेही मुर्खपणाचे आहे. प्रत्येक मातीचे संघर्ष वेगळे असतात, धर्म कोणतेही असोत. आज अरबस्तानात अगदी इस्लामहुन अधिक शांततामय धर्म असता तरी संघर्ष हाच राहिला असता.

१३) युरोपियन पक्षी आजचे ख्रिस्ती हे वंशवादी होते आणि आहेत. (अपवाद क्षमस्व) त्यांना जेरुसलेमच्या सेमेटिक येशु ख्रिस्तानेच ख्रिश्चन धर्म स्थापन केला याशी काही घेणेदेणे नाही. खरे तर सुळावर जाईपर्यंत येशू हा ज्यूच होता. हे वास्तव लक्षात घेतले जात नाही. ख्रिस्ती राष्ट्रांनीच ज्यूंची जास्त हत्याकांडे केली, हकालपट्ट्या केल्या (भारत सोडून) अन्याय केले. हे ज्यू विसरले असतील असे समजू नका.

भविष्यात ज्यू विरुध ख्रिस्ती हा संघर्ष पेटला तर मला आश्चर्य वाटणार नाही., पण सध्या मुस्लिम हा दोघांचा शत्रू आहे आणि त्याचे परिणाम अरबांच्याही नृशंसपणातून दिसत आहेत. किंबहुना अरब राष्ट्रांवर अंतिम चाल करण्याची पुर्वतयारी सुरु आहे. आज जाहीरपणे अरबांची (म्हणजेच अरबी मुस्लिमांची) बाजू घेण्याची हिम्मत कोणी दाखवण्याची शक्यता नाही. कारण त्यांनाही या संघर्षाचे आकलन आहे काय हा खरा प्रश्न आहे.

१४) भारतीय मुस्लिमांनी आणि हिंदुंनीही (वैदिक सोडून, कारण आता वैदिक बांधव मला काय उपदेश करायला येणार आहेत याची मला पुरती जाणीव आहे.) कसल्याही स्थितीत, अरब मुस्लिम राष्ट्रे असोत की ख्रिस्ती राष्ट्रे, यांच्या जागतीक, ऐतिहासिक संघर्षातून, हिंसाचारातुन वेगळे अर्थ काढत आपापसात तेढ् माजवु नये.

भारतीय मुस्लिमांनी आयसिस अथवा तालिबान किंवा कोणीही, या संघर्षात सामील कोणतेही ख्रिस्ती राष्ट्र व त्यांच्या कारवाया करणा-या अमानवी संघटनांना किंवा सैन्यांना (सैन्य अनेकदा दहशतवाद्यांसारखे वापरले जाते) यदाकदाचितही सहानुभुती दाखवत आपापसात तेढ माजवायचे प्रयत्न करु नयेत.

(लेखातील मत ही लेखकांची वैयक्तिक मतं आहेत.)

Updated : 22 Aug 2021 3:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top