Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'तो' मुस्लीम आणि ही हिंदू

'तो' मुस्लीम आणि ही हिंदू

तो मुस्लीम आणि ही हिंदू... आणि लग्न होऊन 4 ते 5 वर्ष मुलं नाही... आणि मैत्रिणीची सरोगसी करण्याची तयारी... समाजातील विषारी वृत्तीचा वेध घेणारा लेख... कोणतीही कमेंट करण्यापुर्वी अनुजा यांचा लेख वाचा आणि मगच कमेंट करा...

तो मुस्लीम आणि ही हिंदू
X

माझा जर्नलिझमचा कोर्स सुरू होता. मैत्रिणीचं लग्न आणि ओरल्स एकाच दिवशी. क्लास उशीरा संपला. विद्यापीठातून पार्ल्यात पोहोचेपर्यंत रिसेप्शन संपलं. बेस्ट फ्रेंड. चुटपूट होतीच. इंटर रीलिजन लग्न असल्याने तिला झालेला विरोध माहित होता. सीए करता करता ती त्याच्या प्रेमात पडली. आम्ही दोघी कविता नि गाणंवेड्या. तो कविता करायचा. मराठीतून. नि ही त्या ऐकता ऐकता छान प्रेमात पडली. तिचं प्रेम समजून घेणं अजिबातच अवघड नव्हतं. चर्चांमुळे गोंधळ होता पण मैत्री त्या गोंधळापलीकडची होती.

तिचं लग्न, वाद, समजावून घेणं, सपोर्ट सगळं परंपरेने पार पडलं. लग्नाला पाच-सात वर्षं झाल्यानंतरही बच्चू नसल्याने तिला उगाच भीती होती. टेस्ट बिस्ट सगळं नॉर्मल. अडॉप्शनचा पर्याय पण शोधून पाहिला. पण ती हिंदू नि तो मुस्लिम अशा स्थितीत हा पर्याय वर्क आऊट होत नव्हता. मी 27-28 वर्षांची होते. तिला म्हटलं काहीच पर्याय नसेल तर मी सरोगेटेड मदर व्हायला तयार आहे. आई नि बहिणीला सांगितलं. वाद अपेक्षितच होते. मग किमान डॉक्टरकडे तर जाऊन चौकशी करतो, एवढंच सांगितलं.

या डॉक्टरांच्या मुलाला आईने शिकवलं होतं. त्यामुळे त्या डॉक्टर प्रामाणिकपणे मार्गदर्शन करतील हा विश्वास होता. तिथल्या वादावर पडदा पडला. हुतात्मा नव्हतं व्हायचं पण बहिणीसाठी जे केलं असतं ते बेस्ट फ्रेंडसाठी करायला माझी काही हरकत नव्हती. सोल सिस्टर्स... तिने मुस्लिम व्यक्तीशी लग्न करणं हा प्रॉब्लेम मला तिथे कुठेच वाटत नव्हता. माझ्यासाठी धर्मापेक्षा मैत्री महत्त्वाची होती. माझ्या मैत्रिणीसाठी मी उभं राहणं, माणूस म्हणून मला जास्त महत्त्वाचं होतं. धर्म नंतरचा होता. किंबहुना धर्म नव्हताच. आजही नाही. समाज मदत करत नाही तेव्हा जवळच्यांनी तरी ठामपणे उभं राहायला हवं सोबत असं मला वाटतं.

माझ्या बॉयफ्रेंडला सांगितलं. तो बिचारा हादरला. गर्लफ्रेंड वेगळ्या वाटेने जाणारी असली तर जोवर ते मिरवता येतं तोवरच ते चालतं. मला तेव्हाही लोकांनी विचारलं तर काय, लोकांनी नाकारलं तर काय, टोमणे मारले तर काय असे प्रश्न पडले नव्हते. मी मैत्रिणीसाठी सरोगेट मदर झाले. हे माझं उत्तर जास्त मजबूत होतं. हे सगळं होत असताना एक दिवस मला तिचा फोन आला की अनुजा मी प्रेग्नंट आहे. मी कोकणात होते. नि तिला म्हटलं की आत्ता उडून आले असते. खूप आनंदी होते तिच्यासाठी...

तिचं नातं माझ्यासाठी आजही तेवढंच गहिरं, घट्ट आहे. ती माझ्यासाठी तेवढीच खास आहे. धर्माची लेबलं काहीही लागली तरी. तिच्या आजूबाजूला कट्टर असतील की असंही मला सांगून झालंय. पण ते तुमच्या आमच्या बाजूलाही आहेत. मी स्वतःला माणूस म्हणून प्रश्न विचारते. तेवढीच उत्तरं महत्त्वाची. मी मृण्मयी म्हणून लिहिलेलं पहिलं आर्टिकल या अनुभवावर आधारित होतं. ते आर्टिकल आज माझ्याकडे नाही. पण ठाम उभं राहणं हे अधिक रुजत गेलंय तेव्हापासून. प्लीज प्लीज असं हॅट्स ऑफ वगैरे नकोय. ते खूप ऑकवर्ड वाटतंय.

हे मोठेपणा वगैरे मिरवायला नाही लिहिलं. मैत्री मात्र मिरवेन. वयाच्या 15-16 वर्षी अपरिचित शहरात, शहर शोधताना, रात्री एकमेकींचा हात धरून भटकणं, पार्ल्यात भटकताना तिची छान गाणी ऐकणं, गझल ऐकणं.. ट्रेकच्या गप्पा रंगवणं, छात्र प्रबोधनच्या पार्ल्यातल्या शिबिरासाठी नव्या संकल्पना शोधणं, नेव्ही-एअर फोर्समधल्याच मुलाशी लग्न करायचं स्वप्न पाहणं... असं आभाळभर शेअरिंग केलंय दोघींनी. त्याने हे सहज स्फुरलं. प्रत्यक्षात आणायची गरज पडली नाही. मैत्रीला सलाम नको. मला फक्त मैत्री महत्त्वाची असते, माणूसपण महत्त्वाचं असतं एवढंच सांगायचंय. नि तेवढंच आहे. फक्त काहीही न गाळता लिहिलंय. ताकद धर्मबाधित विचारात नाही...

Updated : 17 Oct 2020 11:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top