Home > मॅक्स ब्लॉग्ज > कारळाचा झटका!

कारळाचा झटका!

काळ्या रंगाच्या कारळाची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का? मात्र, या कारळाचं पीक कसं येतं? जर या पिकाला पाणी जास्त झालं तर काय होतं? वाचा महारुद्र मंगनाळे यांचा एक भन्नाट अनुभव...

कारळाचा झटका!
X

विहीरीलगत दहा गुंठे रान आहे. तणासाठी ख्यातनाम. गाजरगवतापासून ते इचक्या पर्यंत सर्व प्रकारची तणं येतात. दरवर्षी हे रान बुडवतं. हे माहिती असूनही आम्ही इथं काही ना काही पेरतो. पेरलं नाही तर या रानात खूपच आयचान (मोठ्या प्रमाणात गवत) होतं. यावर्षी बऱ्याच उशीरा रोटर, पंजी केली आणि कारळ पेरलं.

उगवण पातळ (विरळ) झाली. पण कारळ छान वाढलं. डहाळा केला. भरपूर फुलं लागली. त्या काळात सलग पंधरा दिवस पाऊस होता. मी दररोज त्या फुलांमधून जायचो. ओले फुलं बघितले तेव्हा त्यात कारळ भरत असल्याचं वाटलं... मी मनातल्या मनात किती कारळ होईल, याचा हिशोब करायचो. दहा दिवसांपूर्वीच फुलं, पानं वाळली. ते कापणं गरजेचं होतं. पण सोयाबीन काढणीमुळं कारळाकडं लक्ष देणं शक्य नव्हतं. ते काम संपल्यानंतर परवा पुष्पामावशी व दीपकच्या आईनं कारळ कापलं. दोन दिवसात पाऊस येणार अशा बातम्या होत्या. त्यामुळं काल मी भरतमामांना घेऊन रास करायला वावरात गेलो. चवाळ्यावर कारळाच्या दोन कडप्या ठेऊन मामांनी बडविल्या. बडवलेले बोंड बाजुला करून, बुडाला कारळ किती जमा झालयं? ते बघितलं. दोघेही चकीत झालो. मुठभरच कारळ जमा झालं होतं, ते ही होलपट!

मामा म्हणाले, 'काढायला उशीर झाला बघा. कारळ जागेवरच गळून गेलं...'' मला कारळ गळून गेलेलं कुठंच दिसत नव्हतं. शिवाय ते इतकं कडकडीत वाळलंही नव्हतं. दुसऱ्या चार-पाच कडप्याची फुलं बघितली. त्यातही कारळ नव्हतं. कडप्या बडवण्याचा उपयोग नव्हता. आम्ही सगळं कारळाचं काड उकंड्यात भरून टाकलं. विनाकारण पाच-सहा हजाराला चुना लागला.

कारळं गळलं कसं? याचा विचार करीतच चार वाजता माईला भेटायला गावातील घरी गेलो. काळा चहा पिता-पिता माईला कारळाचा किस्सा सांगीतला. ती म्हणाली, एवढं सगळं कारळ गळणं शक्य नाही.... कारळ भरलंच नाही. फुलं असताना सारखा पाऊस लागून होता. त्यानं कारळ होप गेलं... असं मागे कधी तरी घडल्याची आठवणही माईने सांगितली. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. कारळ होप जाऊ शकतं, याची माहिती मला माहिती नव्हती... कारळ म्हणजे हमखास येणार तेलधान्य असाच माझा समज होता. तो माईने दूर केला. आता या जागेवर फक्त आणि फक्त पेरू लावायचेत. रोपं मिळाली तर पुढील आठवड्यात पेरूची लागवड करेन..।

(महारुद्र मंगनाळे यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Updated : 20 Oct 2020 5:02 AM GMT
Next Story
Share it
Top