राजनीति छिनाल आहे - डॉ. बाबा आढाव
भारताच्या घटनेत धर्मनिरपेक्ष शब्द असला तरी मोदी आणि भाजप पक्ष हे सरळ सरळ हिंदू राष्ट्र समजूनच सगळा व्यवहार करताहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. असं डॉ. बाबा आढाव यांनी म्हटलं होतं. डॉ. बाबा आढाव लिखित लेख पुन:प्रकाशित करत आहोत.
X
(८ डिसेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ समाजवादी नेेते आणि विचारवंत डॉ. बाबा आढाव यांचं निधन झालं आहे. यानिमित्ताने मॅक्स महाराष्ट्रच्या चिंतन या विशेषांकामध्ये त्यांनी राजकारण आणि सत्ताधारी भाजपावर केलेलं लेखन पुनःप्रकाशित करत आहोत.)
भारतात सध्या केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर एक प्रकारची शाब्दिक रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये जे प्रश्न निर्माण झालेत ते सनातनी आहेत. यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, धर्म आणि राजकारण यांची जी गल्लत, मिसळ होते. हा बदल, फार काळजी निर्माण करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
काही वर्षापूर्वी ज्यावेळेला बाबरी मशीद पाडली गेली. त्या वेळी बाबरी मशीद पाडण्यासाठी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघाली. आज त्या लालकृष्ण आडवाणी यांना केंद्र सरकारने भारतरत्न देण्याची घोषणा केली. काही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेते असतील. पण त्यावेळेला अयोध्येवर जे मोर्चे गेले आणि त्याचं शेवटी काय झालं आपल्याला माहित आहे. त्या वेळेला ही अशी प्रक्षोभकता खूप वाढली होती. काय होणार? काय होणार? अशी चर्चा सर्वत्र होती. परंतु जे झालं ते संपलं ही, पण राजकरणात ते शिल्लक राहिलं.
आपण भारतीय घटनेमध्ये सेक्युलर शब्द स्वीकारलेला आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. त्या धर्मनिरपेक्षतेला बाधा निर्माण होईल अशा तऱ्हेचं एक वातावरण निर्माण झालं आहे. हे हिंदू राष्ट्र बनावं म्हणून वाद ही झाले. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मंडळींचं म्हणणं हेच आहे की. हे हिंदू राष्ट्र आहे. आपण हिंदू राष्ट्रच बनावं. आता अयोध्येला जे राम मंदिर बांधलं गेलं आहे . त्या ठिकाणी बाबरी मशीद होती. ती पाडली गेली, आणि त्याठिकाणी आता एक फार मोठ्या प्रमाणावर एका राम मंदिराची उभारणी होत आहे . ज्याचा गाजावाजा सरकारी पातळीवर केला गेला, हा एक शासकीय समारंभ बनलेला आहे. आता माझं वय चौऱ्याण्णव वर्ष आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर झालेल्या बदलांचा मी साक्षीदार आहे . घटना निर्मिती, त्या नंतर आत्ता पर्यंत भारतामध्ये झालेल्या सगळ्या निवडणूका, हे सगळं मी पाहिलेलं आहे. याच बरोबर आपल्या महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, गोव्याचा लढा झाला असे बरेच लढे झाले. मंडल आयोग लागू केल्या वर झालेला लाठी चार्ज, अशा सगळ्या इतिहासाचा आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचाही मी साक्षीदार आहे. आताच्या काळातील जो प्रश्न आहे त्या काळात तो वेगळा होता इतकंच.
महात्मा गांधींचा खून झाल्यामुळे हिंदूराष्ट्राचा हा प्रश्न थोडासा घायाळ झाला. गांधींचा खून होणं हे देशाला खूप मोठा हादरा होता. स्वातंत्र्याच्या चळवळीत गांधींनी केलेलं काम हे लोकांच्या हृदयात जाऊन बसलं होतं. त्यामुळे हे प्रकरण थोडं दाबल्या सारखं झालं होतं, पण पुढे नंतर हा प्रश्न वरचेवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पुढे आणण्यात आलं. कारण पाकिस्तान ची निर्मिती मान्य करणं त्यांना जमलं नाही. पुढे बाबरी मशीद, राम जन्मभूमीचा प्रश्न निर्माण करण्यात आला. हे आपल्याला सगळं माहिती आहे, आणि ही इतिहासातली वेदनादायक बाब आहे.
हे सर्व होत असतानाच, भारताच्या जडण घडणीचा आलेख रचला गेला, घटना रचली गेली आणि त्यातून एक प्रतिज्ञा केली गेली. २६ जानेवारी १९५० ला ज्यात आम्ही भारत कसा बनवणार? हे सगळं नमूद करण्यात आहे. भारतीय संविधान बनविले गेले ज्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या माणसांनी आणि इतर अनेक मंडळी व घटनातज्ञांनी जी घटना मंजूर केली. आणि भारतीय संविधाना नुसार हा देश लोकशाहीत देश बांधला. त्याच लोकशाहीचा वापर करूनच त्याला समाजवाद, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता विज्ञाननिष्ठा ही सगळी मूल्ये आली.
विशेष म्हणजे खंडप्रिय असलेल्या या देशातल्या प्रत्येक राज्याने ते स्वीकारलं. मला आनंद वाटतो की इथल्या प्रत्येक माणसाला मताचा अधिकार मिळाला. तो अधिकार हा पूर्वी एकवीसाव्या वर्षी होता. आता तो अठरा वर्षी आहे. निवडणुकांमध्ये इथली माणसं हिरीरिने भाग घेतात. मात्र निवडणुका ह्या कधी शांततापूर्ण झाल्या आहेत असं नाही. हे सगळं होत असताना स्वतंत्र झालेल्या भारतात इथल्या माणसाला सन्मानाने जगता यावं. त्याचे शोषण होऊ नये ही माफक अपेक्षा होती. असं असतानाही अडचण ही होती की, जाती व्यवस्था इथली स्त्री-पुरुष विषमता, इथले अनेक धर्म, हे सगळंच निर्माण झालं होतं. शिवाय जे जुने संस्कार होते ते संस्कार, त्या संस्कारामध्ये सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे कर्म सिद्धांत. गेल्या जन्मातलं जे काही असेल त्याच्याप्रमाणे, म्हणजे नव्याने मी काही विचार करायचा हे स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखी परिस्थिती असल्यामुळं इथल्या जनतेची मानसिकता ही धर्मवादाकडे झुकलेली आहे.
आज विकासाची भाषा प्रत्येक क्षणाला बोलली जाते, परंतु प्रगती किती झाली? काँग्रेसने भाजपाला दोष द्यायचा आणि भाजपने काँग्रेसला दोष द्यायचा असे एकमेकांवर ढकलून कसं चालेल? याच आत्मचिंतन व्हायला हवं.
पण या वेळेला घडतंय काय? बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याठिकाणी राम जन्मभूमी बांधण्याचा, राम लल्लाच त्या ठिकाणी मंदिर उभारण्याचा प्रयत्न झाला. आता त्याचं उद्घाटन देखील होत आहे. पुढे त्या ठिकाणी ते पूजापाठ होतील. पण या ठिकाणी विषय असा आहे की हे सगळं हिंदू करतायत का? तर नाही.. हे सगळं शासन करत आहे. सरकार करतंय, याचं सगळं पौरोहित्य हे नरेंद्र मोदी करत आहेत. ते भारताचे पंतप्रधान आहेत. थोडक्यात पंतप्रधान मोदी आणि सरकारच यजमान झाले आहेत. हे काही सहज चाललंय का? नाही ...
याला एक संदर्भ आहे. तो असा की, एका महिन्यावर लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. ज्याअर्थी त्यांनी निवडणूकच्या दरम्यान हा विषय निवडलाय, त्यातून एक शंका निर्माण होते की मग भारत हा धर्मनिरपेक्ष राहणार की नाही? का धर्मराज्य होणार? हे घटनेतून होणार की घटनाबाह्य पद्धतीने होणार हे जरी स्पष्ट नसलं तरी देखील प्रत्यक्षात आज अशी परिस्थिती झालेली आहे. की भारताच्या घटनेत धर्मनिरपेक्ष शब्द असला तरी मोदी आणि भाजप पक्ष हे सरळ सरळ हे हिंदू राष्ट्र समजूनच सगळा व्यवहार करताहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
ही चिंतेची बाब या अर्थाने आहे की हिंदू धर्माचे जे स्वरूप आहे, ते स्वरूप आणि त्यातला आतला जातीयवाद, स्त्री-पुरुष विषमतेवर हा समाज आधारलेला आहे. कर्मकांडावर आधारलेला हा समाज आहे. भारताने तो त्यागल्याय. स्वातंत्र्याच्या चळवळी आणि तत्पूर्वी सुध्दा आम्ही गेली शतकभर हे सांगत आलोत, की जरी याठिकाणी हिंदू बहुसंख्य असले तरी हे हिंदुराष्ट्र होणार नाही. इथे मुसलमान देखील आहेत. दोन नंबर ची संख्या मुसलमानांची आहे. इथे हिंदू नुसते नाही, तर हिंदूंच्यामध्ये जाती व्यवस्था आहे. अस्पृश्यता आहे. स्त्री-पुरुष भेद आहे. मी लोकशाही समाजवादी आहे. महात्मा फुलेंचा सत्यशोधक मी स्वतःला म्हणवून घेतो. त्याप्रमाणे मी जगलोय. म्हणून मी दावा करणार नाही, पण मला असं वाटतं की आता आपलं भान सुटलंय, भारतीय राज्यकर्त्यांचं भान सुटले आहे. त्याचं कारण असं आहे की, भारतीय जनता पक्षाने घटना कधी मनापासून मान्य केली नाही. त्यांनी कधीही घटनेची मूल्ये मान्य केली नाहीत. लोकशाही, समाजवाद ह्यांच्याशी त्यांचं नेहमीच वाकडंच आहे आणि ते हे जाहीरपणे सांगतात. पण हे सर्व ते निवडणुकीमध्ये मात्र असं स्पष्टपणे म्हणत नाहीत. पण करताना मात्र स्वतःला हवं असंच करतात.
आज जे सगळं फोडाफोडीच राजकारण सुरू चाललंय ते यातून भारताचं विघटन होईल का? कारण हा देश खंडप्राय देश आहे. हा देश अनेक भाषांचा आहे. अनेक धर्मांचा आहे. याठिकाणी जे प्रांत आहेत, त्यातली सगळी संस्कृती वेगळी आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री तेच सांगतात तुमचे तिकडे चाललं आहे ते वेगळं आहे, ती आर्य संस्कृती आहे आम्ही द्रविडी संस्कृती मानतो. वर्षानुवर्षे हे चालत आले आहे. केरळची परिस्थिती सांगायची झाली तर केरळ कधी काँग्रेस ने जिंकलं ना कधी भाजपने. केरळ ने नेहमी स्वतःला वेगळं ठेवलं आहे.
हा देश खंडप्राय देश आहे. इथे अनेकविध भाग आहेत. अनेक धर्म आहेत. हिंदू धर्मामध्ये अनेक जाती-उपजाती आहेत. सगळ्याच गावांमध्ये मंदिरं आणि धार्मिक स्थळं आहेत. पण भारत मातेचं मंदिर नाही. ज्या ठिकाणी सगळे मंडळी भारतीय म्हणून जमतील, असं एकही ठिकाण गेल्या स्वातंत्र्य काळातील पंच्याहत्तर वर्षात आम्ही निर्माण करू शकलो नाही.
धर्म म्हणून सर्वांना स्वतंत्र आहे पण काही गोष्टी हे समजून घेतल्या पाहिजेत. रक्ताला कोणता धर्म आहे का? जात आहे का, तर नाही ! स्त्री-पुरुष भेदाभेद रक्तात आहे का, तर नाही. रक्ताला जात नाही,धर्म नाही. विज्ञान आलं पण रक्ताची जात सिद्ध करता आली नाही. धर्माची कोणतीही निशाणी माणसाच्या रक्तात सापडत नाही. मग हा भेदाभेद कशाला? आता सुद्धा भारतात, आज जातींचेच प्रश्न चालले आहेत. धर्माचेच प्रश्न चालले आहेत. म्हणजे पाकिस्तान वेगळं होऊन सुद्धा उरलेल्या भारताचे हे चालावं हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. अतिशय दुःखदायक गोष्ट आहे. हे लवकरात लवकर कसं थांबेल असं माझ्या पिढीला वाटत होतं. भारतीय घटनेने सांगितलेला भारत, तो भारत आम्ही निर्माण करू असं जे आम्हाला वाटलं होत ते होऊ शकलेलं नाही.
आंदोलन, चळवळी या साठी आजही खेडोपाडी जावं लागतं. तिथे गेलो असताना त्या लोकांशी मी बोलतो. गावात सगळ्या धर्माची मंदिरे आहेत. पण भारत मातेचं मंदिर नाही. जिथे गावातली सगळ्या धर्मातली माणसं, जातीची माणसं एकत्र जमतील. भारतीय म्हणून जमतील. असं ठिकाण आम्ही खेड्यातून किंवा देशातून निर्माण करू शकलेलो नाही. त्यामुळे इथे सगळी फुटीरता आहे. मशीद स्वतंत्र आहे. मंदिर स्वतंत्र आहे आणि इथे जाणारी मुलं ही काय समजून घेण्यासाठी जाणार आहेत का? तर नाही, ती विष कालवण्यासाठी जाणार आहेत.
मुद्दा हा की असं चाललेलं आहे की, एका बाजूला आम्ही स्वप्न बघत होतो की आम्ही जे संविधान मान्य केलं या संविधानातला भारत निर्माण झाला का? निर्माण केला का? या प्रश्नावर खरं चिंतन व्हायला पाहिजे. वाईट याचं वाटतं की हे प्रश्न राहिले बाजूला. हे हिंदू राष्ट्र कसं बनवायचं? यासाठीच प्रयत्न चाललेले आहेत आणि हे रोखायचं कसं, याचा विरोधक विचार करतायेत. असं एक द्वंद्व आज भारतात चालू आहे. निवडणुका जवळ आले की याला फारच उधाण येतं.
राष्ट्रात धर्म आहे पण, राष्ट्राला धर्म असू नये. धर्म ही ज्याची ज्याची स्वतंत्र राहावी. पण राष्ट्र कुठलं ही धार्मिक असू नये. हे जे पथ्य आम्ही स्वीकारलं हे पथ्य मोडून काढण्याचा आज प्रयत्न चालला आहे. त्यात आता वाईट गोष्ट अशी आहे की, या मध्ये आता सरकार सामील झालंय. मोदींचं सरकार....
मोदी अयोध्येच्या राम मंदिराच्या निर्मितीमध्ये सुद्धा यजमान झाले. शंकराचार्यांचं सांगणं पण आता हे लोक नाकारत आहे. त्यांनी सांगितलं हे आता करता येणार नाही. तरी देखील काहीतरी त्यांच्या बरोबर शाब्दिक खेळ केला गेला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गुजरात मध्ये गजनीच्या मोहम्मदने तोडलेलं सोमनाथाचे मंदिर नंतर बांधण्यात आलं. त्या मंदिराचं पुनर्भरण करण्यात आलं असं सांगण्यात आलं. पण जे केलं त्याचं झालं काय यातून? तुम्ही मंदिर उभारलंत पण त्यातून झालं काय? आज गुजरात राज्यात जेवढा हिंदू मुसलमान द्वेष आहे. असा दुसरा कुठल्याही राज्यात नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
नुकतंच हे बिल्कीस बानो प्रकरण झालं, हे प्रकरण काय सांगतंय? आज मोदी किंवा शहा किती घमेंडी, घमेंडखोर होऊन बोललेत. आज तर गांधींची आठवण फार होते. गांधींचे प्राण गेले. गांधी गुजरात मधले पण गांधींच्या गुजरातमधून आले हे मोदी आणि शहा आज ज्या पद्धतीचं हे सगळं पुढं आणतायेत यातून देशापुढची परिस्थिती चिंताजनक आहे आणि ही चिंता ही सार्वत्रिक आहे. आणि आता राम मंदिराचा उद्घाटन झालंय. हे सर्व पाहत असताना सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं हे कोण लक्षात घेत नाहीये. चळवळीचं काम करत असताना लोक मला विचारतात बाबा आता नेमकं काय होणार. म्हणून मी चळवळीतला एक अनुभव सांगतो.
गाव खेड्यावर,धनगर वस्तीवर राहत असताना रात्री जेवण झाल्यानंतर सुंबरान म्हटलं जायचं. सुंबरानात रामाचं वनवास कांड सांगितलं जायचं ते आस....
सुबरान मांडलं ग सुंबरान मांडलं..
या इथे या वेळेला सुंबरान मांडलं...
राम निघालं वनवासाला, सीतामाई संगतीला..
दोघे गेले महालाला, कौशल्याच्या महालाला...
पुत्र म्हणे मायेला आशीर्वाद द्यावा आम्हाला..
आम्हीच आलो वनवासाला...
माऊली आशीर्वाद द्यावा ...
ह्या वर कौशल्या रडू लागते आणि राम त्यांची समजूत काढत असतो. अग आई जाऊ दे मला, शिक्षा झाली आहे मला. राजाज्ञा झाली मला. जाऊ दे मला,पित्याची आज्ञा आहे मला.. ह्या वर कौशल्या विचारते पित्याची आज्ञा होऊ दे,राजाची आज्ञा होऊ दे पण मला खरं सांग, गुन्हा तू कोणचा केला? अन तुला शिक्षा का झाली?
हे सांगत असताना कौसल्या बोलते
समदं ठाऊक आहे मला..
तुला धाडायचं आहे वनवासाला...
राज्य द्यायचा आहे भरताला...
तो हाय आवडतीचा..
अन तू आहे नावडतीचा...
समदं ठाव आहे मला..
ही राजनीति हाय..
राजनीति लय छिनाल आहे..
हे सुंबरान गाव खेड्यावर, धनगर वस्तीवर ऐकत असताना एक विचार नेहमी मनात येतो. की हे सगळे यांच्याकडे कसे आलं. आत्ताच हे सगळं वातावरण पाहत असताना प्रामुख्याने हे सांगा वाटतं की, भारतातली ही जनता शाबूत आहे ना, ही भारतातली लोकशाही जिवंत ठेवेल. ते परत ह्या अतिवादाच्या कडे जाणार नाहीत. आज जातींची भांडणं चाललेली आहेत. बेरोजगारीचा प्रश्न फार तीव्र आहे. हे सगळं असताना. एका बाजूला स्त्रियांची प्रगती इतकी जोरात चाललेली आहे. देशाचे पंतप्रधान विकासाची भाषा बोलतात मात्र हे सगळं चालत असताना आपण विज्ञानाची वाट धरणार की हिंदुत्वाची वाट धरणार? आर्थिक विकास हाच विकासाचा मार्ग ठरणार का माणसातल्या माणुसकीचं काय? असा सवाल मी पंतप्रधानांना विचारतो? मोदींनी वैयक्तिक पुरुषत्त्वाचा घमंड बाळगण्याचे काही कारण नाही. हा देश वैयक्तिक पुरुषत्वाच्या जोरावर पुढे जाणार नाही. हा देश सामूहिक पुरुषत्वाच्या जोरावरच पुढे जाणार आणि त्या पुरुषत्वाची ताकद इथल्या तळागाळातल्या सामान्य माणसांमध्ये आहे, हा मला विश्वास आहे.
द्रौपदीचे वस्त्रहरण झालं त्यावेळेस भीष्म पितामह आणि संपूर्ण सभा मंडप हे बघत होतं, पांडव जुगार खेळण्यात व्यस्त होते. त्यावेळी द्रौपदीने प्रश्न विचारला हे असं का ? द्रोपदीच्या प्रश्नावर कोणाकडेही उत्तर नव्हतं. आज असाच सत्तेचा जुगार खेळला जात आहे. हे सगळं आपण महाराष्ट्र मध्ये आणि देशामध्ये पाहत आहोत. पुढे आपल्यावर निरूत्तर होण्याची वेळ येऊ नये म्हणून आत्ताच समाज घटकातील सुज्ञ माणसांनी आजच्या या चाललेल्या वस्त्रहरणावर भाष्य केलं पाहिजेल. तशी वेळ आज आलेली आहे. या राष्ट्राला कोणी धार्मिक राष्ट्र करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आता थांबवलं पाहिजे. त्यासाठी गांधींनी सांगितलेल्या वैयक्तिक सत्याग्रह, सामुदायिक सत्याग्रह चा वापर केला पाहिजे. शांत बसता कामा नये, आवाज केला पाहिजे.
राम वनवासाच्या सुमरनातून ज्यावेळेस सांगण्यात येतं की राजनीति छिनाल आहे, याचा प्रत्यय आज येत आहे. लोकांनी आता बोलले पाहिजे. तरच हा प्रत्यय पुन्हा येणार नाही.
राम मंदिर होते, होऊ द्यात. याच्यावर कदाचित निवडणुका ही जिंकता येतील. मात्र भारताला जो संविधान दिला गेलेला आहे त्या संविधानाला डावलून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल तर या देशाचे तुकडे पडतील. पण ते होणार नाही कारण इथला सामान्य मनुष्य हा जागा आहे
डॉ. बाबा आढाव
(ज्येष्ठ समाजवादी नेते आणि विचारवंत)






