Home > मॅक्स ब्लॉग्ज > चांद मिलता नहीं सबको संसार में...

चांद मिलता नहीं सबको संसार में...

सरस्वतीचंद्र’ (१९६८) हा सिनेमा गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी यांच्या त्याच नावाच्या गुजराथी कादंबरीवर बेतलेला होता. नूतन आणि मनीष यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही शोकांतिका आजही अनेकांच्या लक्षात आहे त्याचे मुख्य कारण त्यातली शामलाल बाबू राय उर्फ ‘इंदीवर’ यांची भावमधुर गाणी! अतिशय तरल पण अपयशी ठरलेली प्रेमकहाणी ही इंदीवर यांना भावविव्हल कविता लिहिण्याची पर्वणीच होती. त्यांनी ती इतक्या प्रभावीपणे हाताळली की सरस्वतीचंद्र ज्यांनी पाहिला आहे ते आजही प्रत्येक गाणे ऐकताना भावूक होतात. याविषयी चित्रपट समीक्षक श्रीनिवास बेलसरे यांनी आठवणी सांगितल्या आहेत.

चांद मिलता नहीं सबको संसार में...
X

मुकेश आणि लतादीदीने एकेकदा गायलेले, ‘चंदनसा बदन चंचल चितवन’, मुकेशच्या नितळ आवाजाने अस्वस्थ करणारे ‘हमने अपना सबकुछ खोया प्यार तेरा पानेको’ लतादीदींच्या निरागस आवाजातले, “मैं तो भूल चली बाबुलका देस” श्रोत्यांचे मन व्यापून उरायचे! मुकेश आणि दीदीचे द्वंद्वगीत ‘फुल तुम्हे भेजा हैं खतमे, फुल नही मेरा दिला हैं’ म्हणजे तर मनाला आतून बाहेरून मोहरून टाकणारा अनुभव असायचा!

एक गाणे श्रोत्याला अनेक भावनिक आंदोलनातून नेत असे. उदात्त पातळीवरचे प्रेम आणि अध्यात्म यांच्या सीमेवर रेंगाळणारे, काहीसे तत्वज्ञानाकडे झुकणारे, हे गीत कल्याणजी-आनंदजींच्या संगीत दिग्दर्शनाने अजरामर झालेले आहे. पूर्वायुष्यातील प्रेयसीकडून निराश झालेला, प्रेमाची बाजी हरलेला मनीष संन्यासी व्हायला निघालेला असतो आणि तीच विरक्त प्रेयसी त्याला आयुष्य नव्याने सुरु करण्याचा सल्ला देत आहे असा प्रसंग! गाण्याआधीच्या शेरवजा दोन ओळीही फार सुंदर होत्या-

कहा चला ए मेरे जोगी, जीवनसे तू भागके,

किसी एक दिलके कारण युँ सारी दुनिया त्यागके...

यावेळी डोंगरातून उतरणारी पायवाट आणि मधूनमधून दिसणा-या आकाशाच्या पार्श्वभूमीवर नूतनचा नितळ, निरागस, उभट चेहरा, वा-यावर उडणारे काळेभोर केस आणि पंढरीशुभ्र साडी तिचे अवघे सात्विक सौंदर्य अजूनच खुलवते.

प्रियकराला ती सांगते आहे जरी माझे पती निवर्तले असले तरी माझे लग्न झालेले आहे. पूर्वीचे आपले प्रेम कितीही खरे असले तरी आता आपले मिलन शक्य नाही. तू माझ्या एकटीसाठी सगळा संसार सोडून जाणे योग्य होणार नाही. माझे ऐक, जीवन नव्याने सुरु कर-

छोड़ दे सारी दुनिया किसीके लिए,

ये मुनासिब नहीं आदमीके लिए.

प्यारसे भी जरूरी कई काम हैं,

प्यार सबकुछ नहीं ज़िन्दगीके लिए.

छोड़ दे सारी...

ती म्हणते, ‘आपली मने तर कधीच एक झालेली आहेत आता शरीरांचे मिलन झालेच पाहिजे असे थोडेच आहे? सुंदर फुलांनी फुललेली प्रत्येक बाग आपली थोडीच असते. ती थोडी लांब असली आणि त्या फुलांचा मधुर सुवास दुरून वा-यावर जरी येत राहिला तरी काय हरकत आहे?’

तनसे तनका मिलन हो न पाया तो क्या,

मनसे मनका मिलन कोई कम तो नहीं.

खुश्बू आती रहे दूरहीसे सही,

सामने हो चमन कोई कम तो नहीं.

अरे बाबा, सर्वाना थोडाच चंद्र हाती लागतो. घरात प्रकाश देणारा एखादा दिवा जरी तेवत असला तरी पुरेच असते ना? म्हणून वैराग्याच्या गोष्टी करू नकोस.

चाँद मिलता नहीं सबको संसारमें,

है दीयाही बहुत रौशनीके लिये.

छोड़ दे सारी...

हल्ली युवकांना छोट्याछोट्या भावनिक समस्या सोडवता येत नाहीत. आपल्याकडेही अमेरिकेसारखे ‘मानसशास्त्रीय सल्लागार’ निर्माण झालेत. पण जुन्या काळी आमचे गीतकार किती कमी शब्दात जीवनाचे केवढे सार मांडून दु:खी मनांना दिलासा देत हे पाहिले की कौतुक वाटते.

आनंद बक्षिजींनी या गाण्यात एक वेगळाच दृष्टीकोन पेश केला आहे. त्यांच्या मते सकाळी उमलणारी फुले पाहून आपले मन उल्हासित होते हा झाला जुना विचार. आनंदजी म्हणतात, ‘जरा असे बघून पहा की त्या कळ्या किती आशेने तुझ्याकडे एकटक पाहत आहेत. तू पुन्हा उमेद धरावीस, जीवनाकडे आशावादी दृष्टीकोन ठेवून पुढे जावेस, आताचा शिशिर विसरून वसंत ऋतूला परत बोलावलेस असे त्यांना सांगायचे आहे.’ एक स्वप्न भंगले म्हणून बिघडले कुठे. तू नव्या जोमाने दुसरे का बघत नाहीस?

कितनी हसरतसे तकती हैं कलियाँ तुम्हें,

क्यूँ बहारोंको फिरसे बुलाते नहीं?

एक दुनिया उजड़ ही गयी है तो क्या,

दूसरा तुम जहां क्यों बसाते नहीं?

एखाद्या सुहृदाने प्रेमाने समजवावे तसे त्या दुख-या हृदयाला फुकंर घालून प्रेयसी समजावते आहे. खरे तर आनंदजीच समजावत आहेत. त्याकाळीही अगदी आजच्यासारखे सर्व होतच होते. पण साध्या फिल्मी गाण्यातूनही अनेकांना केवढा दिलासा मिळायचा!

गाण्याच्या शेवटी नूतन आपल्या उदास प्रियकराला सांगते, फक्त स्वत:चा विचार करणे सोड. तुझ्याशी संबधित इतरांचाही विचार कर. त्यांच्या आनंदासाठी तरी पुन्हा नव्याने जीवन सुरु कर. एखादा मानसशास्त्रीय सल्लागार तरी इतक्या हळुवारपणे इतका सहज पटणारा सल्ला देवू शकेल की नाही देव जाणे!

दिल न चाहे भी तो, साथ संसारके,

चलना पड़ता है सबकी ख़ुशीके लिए.

छोड़ दे सारी...

अनेकदा हिंदी गीतकारांचे काय करायचे? तेच कळत नाही. ते जे मनात आणतील ते तुम्हाला पटवूनच सोडतात. आता एकीकडे ‘प्यार सब कुछ नही जिंदगीके लिये’ हे मनाला पटू लागत नाही तर तर दुसरीकडे जुन्या ‘आंखे’ मधील अल्लड माला सिंहाच्या तोंडी दिलेले साहिरचे जीवघेणे शब्द आठवतात, “मिलती हैं जिंदगीमे मुहब्बत कभी कभी” पण ते पुन्हा कधीतरी!

Updated : 21 May 2023 3:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top