Home > मॅक्स ब्लॉग्ज > Sandeep Joshi Letter : 13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे - संदीप जोशी

Sandeep Joshi Letter : 13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे - संदीप जोशी

कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ, शोर नहीं, सुकून चुनने चला हूँ। किसी और की राह रोशन हो सके, इसलिए ख़ुद एक क़दम पीछे हटा हूँ। आता मी थांबतोय...!, भाजप आमदार संदीप जोशी यांनी का घेतली राजकारणातून निवृत्ती? काय म्हटलंय त्यांनी आपल्या पत्रात वाचा?

Sandeep Joshi Letter : 13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे - संदीप जोशी
X

BJP Leader Sandeep Joshi Quits Politics ... आता मला थांबायचंय ! या आशयाचे पत्र समाजमाध्यमांवर पोस्ट करत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. सध्याच्या राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. १३ मे रोजी आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ, शोर नहीं, सुकून चुनने चला हूँ। किसी और की राह रोशन हो सके, इसलिए ख़ुद एक क़दम पीछे हटा हूँ। आता मी थांबतोय...! असं म्हणत संपूर्ण भूमिका व निर्णयाचे कारण स्पष्ट करणारे त्यांचे भावनिक पत्र त्यांनी सोबत जोडले आहे. या निर्णयाच पत्र त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे.

काय म्हणाताहेत आपल्या पत्रात संदीश जोशी?

... आता मला थांबायचंय !

नमस्कार,

हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे… आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे.

मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व मा. ना. नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे.

माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी. 13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, तर सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन.

राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो.

राजकारण हे माझ्या आयुष्यातील एक निमित्त होते. या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या निभावण्याची संधी मिळाली. हे कार्य मात्र पुढेही अविरत सुरू राहील.

कोरोनाच्या काळात एकल पालकत्त्व नशिबी आलेल्या बहिणींसाठीचा ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीचा ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, मोहगाव झिल्पी येथील गोसेवा प्रकल्प, श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे सामाजिक प्रकल्प, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य ॲम्युचर हॉकी संघटना, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना, नागपूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन, खासदार क्रीडा महोत्सव या क्रीडा क्षेत्रातील विविध पदांना न्याय देईन, तरुण खेळाडूंसोबत उभा राहून त्यांना प्रोत्साहन देईन.

काळ कोणासाठी थांबत नसतो. तो पुढे जातच राहतो. मात्र त्या काळातील काही क्षण आपल्याला आतून हादरवतात. त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो. इतरांना नाही, किमान स्वतःला न्याय देता आला, तरच जगणे अर्थपूर्ण ठरते, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि तोच निर्णय आज मी घेतला आहे.

कुटुंबानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावर संस्कार केले. मला घडवले. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकत राजकारणात अनेक संधी दिल्या. या सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषदेचे सदस्य अशी जबाबदारी देत सन्मान दिला. याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि शीर्षस्थ नेतृत्वाचा कायम ऋणी राहीन.

राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील, याची मला खात्री आहे. कारण एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो, हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे, हे मी अभिमानाने सांगतो. मात्र माझ्या असण्यामुळे कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत आहे. आणि नसण्यामुळे कोणाचे काहीही अडणार नाही, हे अंतिम सत्य आहे. म्हणूनच अधिक काही न बोलता, आज मी हा निर्णय घेत आहे.

शेवटी एवढेच…

कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ,

शोर नहीं, सुकून चुनने चला हूँ।

किसी और की राह रोशन हो सके,

इसलिए ख़ुद एक क़दम पीछे हटा हूँ।

आता मी थांबतोय...!

धन्यवाद मित्रांनो…!

आपलाच,

आ. संदीप जोशी

सदस्य, विधान परिषद (महाराष्ट्र)






Updated : 19 Jan 2026 12:42 PM IST
Next Story
Share it
Top