बिशप डॅामिनिक आब्रिओ : समाजसेवा, शिक्षण आणि समर्पणाचे प्रतिमान
X
१ मे १९८७ हा दिवस भारतातील कॅथोलिक समाजासाठी अत्यंत भावनिक असा आहे. या दिवशी एक असामान्य व्यक्तिमत्त्व, समाजसेवेची सजीव प्रतिमा, बिशप डॅामिनिक आब्रिओ यांचं निधन झालं होतं. औरंगाबाद धर्मप्रांताचे पहिले बिशप म्हणून बिशप डॅामिनिक आब्रिओ केवळ धार्मिक क्षेत्रात नव्हे, तर समाज, शिक्षण आणि संस्कृतीतही अमूल्य योगदान दिलं. त्यांच्या निधनाला जवळपास चार दशकं झाली तरी त्यांची प्रेरणा आजही तितकीच समाजाला मार्गदर्शन करते.
कौटुंबिक पार्श्वभूमी
बिशप डॅामिनिक आब्रिओ यांचा जन्म ३ जुलै १९२३ रोजी वसईतील माणिकपूर गावात झाला. त्यांचे वडील जोसेफ डाबरे आणि आई नाताल डाबरे. दुर्दैवाने, ते फक्त एका वर्षाचे असताना आईचा सहवास संपला, त्यामुळे त्यांचे सांभाळ मोठ्या बहिणी आणि मावशींनी केला. अशा कठीण परिस्थितीतही त्यांचा अभ्यासात गाढ रुची निर्माण झाली आणि ते हुशार विद्यार्थी ठरले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी एम.ए. (मराठी) आणि बी.एड. अशी पदवी मिळवली. मराठी भाषेवर त्यांचा असामान्य प्रेम आणि आत्मीय नातं होतं. भाषेच्या माध्यमातून त्यांनी समाजाशी जुळण्याचे मार्ग शोधले, लेखन, भाषणं आणि संपादनाच्या माध्यमातून लोकांच्या मनाशी संवाद साधला.
सार्वजनिक आयुष्य
५ डिसेंबर १९५४ रोजी फादर आब्रिओ यांनी पाद्री म्हणून आपली सेवा सुरू केली. त्यांनी निर्मळ येथील होली क्रॉस चर्चमध्ये अनेक वर्षे कार्य केले. साधेपणा, संवेदनशील विचार आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले. १९७७ साली त्यांची औरंगाबाद धर्मप्रांताचे पहिले बिशप म्हणून नियुक्ती झाली, ज्यामुळे वसईसाठी अभिमानाची अनुभूती निर्माण झाली. बिशप म्हणून त्यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांना मदत, युवकांसाठी व्यवसाय प्रशिक्षण, मुलांसाठी वसतिगृहं, महिलांसाठी शिवणयंत्र आणि पशुपालन योजना अशा अनेक उपक्रम राबवून ग्रामीण आणि वंचित वर्गाला सशक्त केले.
'सुवार्ता'चे २२ वर्षे संपादक
फादर आब्रिओ हे केवळ धर्मगुरू नव्हते, तर विचारवंत आणि लेखकही होते. १५ ऑगस्ट १९५५ रोजी त्यांनी मराठी भाषेतील पहिलं कॅथोलिक मासिक ‘सुवार्ता’ सुरू केलं आणि २२ वर्षे संपादक म्हणून कार्यरत राहिले. या मासिकातून त्यांनी समाज, शिक्षण, धर्म, राजकारण आणि नैतिकतेसंबंधी अनेक विषय हाताळले. ‘उत्तरदायी पालकत्व’, ‘दारूबंदीचं आव्हान’, ‘गोव्याचं जागरण’, ‘गरीबी आणि विकास’, ‘गर्भपात की हत्या?’ अशा लेखांनी वाचकांच्या मनावर खोल प्रभाव टाकला. ‘सुवार्ता’मुळे अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळालं आणि पुढे राज्य पुरस्कारप्राप्त लेखकांनी आपली लेखनयात्रा याच मासिकातून सुरू केली. सुरुवातीला ‘सुवार्ता’साठी कार्यालय नव्हतं; त्यांनी निरमल येथील होली क्रॉस चर्चमधील एका छोट्या खोलीतून १३ वर्षे मासिक चालवलं, हे त्यांचं अपार समर्पण दर्शवतं.
फादर आब्रिओ यांचा ठाम विश्वास होता की, खरा धर्म म्हणजे समाजासाठी कृती करणे. १९७२ ते १९७५ या दुष्काळाच्या काळात त्यांनी “फूड फॉर वर्क” योजना सुरू केली, ज्यात धर्म, जाती पाहिल्या जाऊ न देता लोकांना सामुदायिक कामाच्या बदल्यात धान्य दिलं जात असे. प्रबोधन सेवा मंडळाच्या शाखेत शेतकऱ्यांना कमी व्याजावर कर्ज मिळायचं, आणि अनेकदा स्वतः आजारी किंवा गरिबांना मुंबईपर्यंत उपचारासाठी नेऊन मदत केली. समाजातील जुन्या गैरप्रथांना त्यांनी आव्हान दिलं; महिलांनी डोक्यावर ओढणी घेण्याची प्रथा, दिखाऊ लग्नं, दारूचं व्यसन, हुंडा अशा गैरप्रथांविरुद्ध त्यांनी खुलेपणाने प्रचार केला. त्यांच्या मते साधेपणा आणि समानता हाच खरा धर्माचा अर्थ आहे.
शिक्षक आणि प्रशासक म्हणूनही त्यांची दृष्टी आधुनिक होती. १९६४ ते १९७७ या काळात ते होली क्रॉस हायस्कूल, वसईचे प्राचार्य होते आणि नंतर थॉमस बाप्तिस्ता कॉलेजमध्ये नेतृत्व केले. त्यांनी शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालय आणि आधुनिक अध्यापन पद्धती सुरू केल्या. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी वसईच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जीवनात नवा उत्साह निर्माण केला. जॉर्ज फर्नांडिस, हमीद दलवाई यांसारख्या विचारवंतांना व्याख्यानांसाठी बोलावलं. मराठी विज्ञान परिषद वसई शाखा सुरू करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. १९७७ मध्ये शिक्षकांना मुंबईतील नेहरू प्लॅनेटेरियमला शैक्षणिक सहल घडवून आणली, जे त्या काळात दुर्मीळ आणि विशेष होते.
बिशप आब्रिओ मानायचे की, समाजात सौहार्द आणि शांतता टिकवायची असेल, तर धर्मांमध्ये संवाद हवा. त्यांनी विविध धर्मांचे नेते एकत्र आणून अंतरधार्मिक प्रार्थना सभा घेतल्या आणि सामाजिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. ते लोकशाहीविषयक आणि राजकारणी जागरूक होते; विद्यार्थ्यांना लोकशाहीची ओळख करून देण्यासाठी शालेय निवडणुका आणि वादविवाद स्पर्धा सुरू केल्या. १९६४ साली पंडित नेहरू आणि जॉन एफ. केनेडी यांच्या स्मरणार्थ त्यांनी फोटोंचं प्रदर्शन भरवलं, ज्याने संपूर्ण वसईचं लक्ष वेधलं.
बिशप डॉमिनिक आब्रिओ यांचं आयुष्य केवळ धार्मिक नव्हतं, तर ते समाजसेवेचं आंदोलन होतं. त्यांनी दाखवून दिलं की श्रद्धा ही केवळ प्रार्थनेत नाही, तर कृतीत दिसली पाहिजे. आज वसई आणि औरंगाबादमधील त्यांच्याशी संबंधित संस्था, शाळा आणि सामाजिक उपक्रम त्यांच्या कार्याची ओळख जपून आहेत. त्यांनी म्हटलं होतं, “धर्म फक्त चर्चच्या भिंतीत नाही, तो प्रत्येक ठिकाणी आहे जिथं माणसाची सेवा होते.” त्यांच्या या विचारांनी आजही समाजाला शिक्षण, सेवा आणि मानवतेसाठी झटणं हेच खऱ्या अर्थानं श्रद्धेचं रूप असल्याची शिकवण दिली आहे. बिशप डॉमिनिक अब्रेव यांचे जीवन ही प्रेरणा आहे, जी प्रत्येकाला स्वतःच्या समाजासाठी आणि मानवतेसाठी काहीतरी करायला उद्युक्त करते.






