Home > मॅक्स ब्लॉग्ज > कम्युनिस्टांकडून पिडीत, प्रस्थापितांकडून उपेक्षित आणि मातंग समाजाकडून वंचित अण्णा ऊर्फ तुकाराम भाऊ साठे....!

कम्युनिस्टांकडून पिडीत, प्रस्थापितांकडून उपेक्षित आणि मातंग समाजाकडून वंचित अण्णा ऊर्फ तुकाराम भाऊ साठे....!

दिड दिवसांची शाळा शिकली, पोटाची खळगी भरण्यासाठी सांगली ते मुंबई असा पायी लाँग मार्च काढला. मराठी भाषेतील प्रस्थापित, सुशिक्षीतांना लाजवेल अशा लेखनशैलीत ४० कांदबरी, १३ लोकनाट्य, ३ नाटके, १३ कथासंग्रह, १ शाहीरी पुस्तक, १५ पोवाडे, १ प्रवास वर्णन, ७ चित्रपटकथा लेखन, २२ भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादीत झालेला पहिला जागतीक किर्तीचा साहित्यीक, रशियामध्ये जंगी स्वागत झालेला भारतीय कम्युनिस्ट कॉम्रेड, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डफावर हात मारत पहाडी आवाजात शाहीर अमर शेख, शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्यासमवेत शाहीरी जलसा करणारे प्रतिभासंपन्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज १०१ वी जयंती निमित्त शब्दांजली वाहिली आहे यशपाल सोनकांबळे यांनी..

कम्युनिस्टांकडून पिडीत, प्रस्थापितांकडून उपेक्षित आणि मातंग समाजाकडून वंचित अण्णा ऊर्फ तुकाराम भाऊ साठे....!
X

मॅक्झिम गॉर्की यांची आई कांदबरी जशी जगभरात वाचली जाते. तशीच अण्णांची चित्रा, सुलतान अशा अनेक कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात. तसेच त्यांनी लिहिलेला 'लेनीनग्राड ग्राउंड' चा पोवाडा रशियाच्या लोकसंगीताचा अविभाज्य घटक बनला आहे. स्वातंत्र्यदिनी काढलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्च्यात 'ये आजादी झुठी है भारतकी जनता भूखी है' अशी घोषणा देणारे अण्णा आयुष्यभर कष्टकरी, कामकरी, शेतकरी वर्गाच्या हक्क अधिकारासाठी लढले. मुंबईसह मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे, यासाठी राज्यभरात शाहिरी जलसा करताना 'माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली' ही त्यांची फक्कड खूप गाजली. त्यांची ही फक्कड म्हणजे मराठी भाषेचं सुंदर शब्दशिल्प बनलं आहे.

लुटारू दरोडेखोर फकिराच्या पैशाच्या दुधावर आईने चिमुकल्या अण्णांना जगविले. त्या फकिरामामाच्या उपकाराची परतफेड अण्णांनी फकिरा या अजरामर कांदबरीतून केले. अठराविश्वे द्रारिद्र्य, अस्पृश्यतेचा जातीयतेचा अभिशाप असलेला शापीत साहित्यीक, पोटाची खळगी भरण्यासाठीचा दैनंदिन संघर्ष सुरू असताना, तत्कालीन कॉम्रेड, समाजबांधवांकडून उपेक्षित असुनही त्याची वाच्यता त्यांनी कधीही, कुठेही केलेली नाही.

समाजातील अज्ञान, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य, विषमतेवर कडाडून हल्ला केला. पृथ्वीची निर्मिती ईश्वराने देवाने केली असून जगाचा नियंता ईश्वरच आहे. शेषनाग हलला की भूकंप येतो, अशी अंधश्रद्धा आजही कायम आहे. त्यावर 'पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर तरलेली नसून ती कष्टकरी श्रमकरी शेतकरी वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे, असे ठणकावून सांगितले.

भांडवलशाही, ब्राह्मणशाही यांच्याविरुद्ध रणसंग्राम करणार्या अण्णांनी हे जग बदलायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल. हा संदेश समाजबांधवाना देण्यासाठी हे महाकाव्य लिहीले होते.

जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।

गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।

अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।

धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।

मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।

ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।

जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।

एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।

नव महाराष्ट्रा निर्मुन जगती। करी प्रगट निज नाव।।

परंतु या महाकाव्याचा अन्वयार्थ न कुणाला समजला, न कोणी समजावून सांगितला. आजही समाजबांधव अनभिज्ञ आहेत. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेशी नाळ जोडू नये यासाठी त्यांनाही अस्मितेच्या राजकारणात अडकविले जात आहे. लहुजी, आण्णाभाऊंच्या नावाने हजारो संघटना, जयंती, पुण्यतिथींना जत्रेचे स्वरुप आले आहे. भव्य फ्लेक्सबाजी, कर्णकर्कश डीजेपुढे बिभत्स नृत्य, नशाबाजी, हाणामारी यामुळे गालबोट लागत आहे. अण्णा भाऊ साठे डोक्यात घ्यायचा विषय आहे डोक्यावर घेऊन नाचायचा नाही, हे कधी समजणार. जयंती, पुण्यतिथीला वर्गण्या वसुल करणाऱ्या संघटित टोळ्या तयार होत आहेत. हिशोब मागितला की कार्यकर्ते व समाजबांधवांवर सशस्त्र हल्ला चढवित आहेत. ग्रहण अन् अमावस्येला समाजातील ज्येष्ठ स्त्रियांच्या हातात पोत, कवड्यांची माल आणि देवीची परडी आणि भिक्षा ही सद्य:स्थिती आहे. तिच्या हातात टॅब, संगणक कधी येणार. उच्चशिक्षीत समाजबांधव केवळ जयंती, पुण्यतिथीला भरघोस वर्गणी देणे इतकेच कर्तव्य पार पाडत आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये समस्त मातंग समाजाचे नेते होण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. कुठल्यातरी बोगस सेल, कमिट्या, महामंडळांच्या सदस्य आणि अध्यक्षपदांच्या भुलथापांना समाजबांधव-भगिनी बळी पडत असल्याचे निदर्शनास येते. काही बोटावर मोजण्याइतके आमदार, खासदार समाजाचे नेतृत्व करतायत की केवळ जातीचे लाभार्थी ठरतायत. पुतळे, स्मारके, सभागृहे बांधल्यामुळे समाजाची प्रगती होतेय, अन्न, वस्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांसाठीचा संघर्ष संपला काय, "राजकीय पक्षांच्या झेंड्यासोबत पिवळ्या रंगांच्या झेंड्यात हा जनांचा प्रवाह नेमका चाललायं कुठं" असे अनेक प्रश्न सुशिक्षीत, सुजाण नवी पिढी विचारत आहेत. प्रतिकं, प्रतिमा आणि अस्मितेच्या राजकारणातून समाजाच्या वाट्याला नेमकं काय येतयं. समाजाची, चळवळीची दिशा नेमकी कोणती, जनसमुदाय कुठे चाललाय याचे आत्मचिंतन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०० व्या जयंतीदिनी करावे ही अपेक्षा.लो

कशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीदिनी त्यांच्या कृती, स्मृती व विचारांना त्रिवार वंदन..विनम्र अभिवादन!

: यशपाल सोनकांबळे (मूक्त पत्रकार)

#yashpalsonkamble

#AnnabhauSathe

#jayanti2021

#कटू_सत्यवचन

Updated : 1 Aug 2021 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top