अनेक वर्षांच्या अंधारातून लख्ख प्रकाशझोतात आलेले ‘अमोल मुजुमदार’
X
यशासारखे दुसरे काहीच नसते. अमोल मुजुमदार हे आमच्या तारुण्यातील क्रिकेटमधील मुंबईसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव! सचिन तेंडुलकरच्या सुवर्णकाळात अमोलनेही उत्तम कामगिरी करत भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले. तोही सचिनप्रमाणे, आचरेकर सरांचा चेला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल अकरा हजार धावा करूनही अनेक हुकलेल्या प्रतिभावंत खेळाडूंप्रमाणेच याच्यासाठीही ते नाहीच उघडले.
मुंबईतून भारतीय संघात निवड होत नाही म्हणून तो आसामसाठी खेळला. पण व्यर्थ! गुणीजनांचे वावडे आपल्या भारतीयांना नेहमीच राहिले आहे. असो… अमोल मुजुमदार हा विषय उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या देशातील लोकांसाठी यथावकाश कायमचा संपला. पण महिला भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अन् त्यांचा पांढऱ्या दाढीतला पन्नाशीतला प्रशिक्षक अमोल मुजुमदार अनेक वर्षांच्या अंधारातून लख्ख प्रकाशझोतात आला.
जिंकलेल्या खेळाडू महिला अत्यानंदाने एका दाढीधारी आनंदित व्यक्तीला मिठ्या मारताना दिसल्या खऱ्या... पण तो व्यक्ती मुंबईचा एकेकाळचा उत्तम फलंदाज अमोल मुजुमदार आहे आज समजल्यावर आश्चर्याचा सुखद धक्का बसला.. आज भारतीय महिला क्रिकेट संघ त्यांच्या सर्वोच्च फॉर्मात आहे. नव्हे पुढे जाऊन भारतीय महिला क्रिकेट संघाने कालच्या सुवर्ण रात्रीला दक्षिण आफ्रिकेच्या बलाढ्य संघाला मैदानात धूळ चारत इतिहास रचला आहे.
विश्वचषकावर क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारतीय लढाऊ महिला क्रिकेटपटूंनी नाव कोरले आणि त्यांचा कबीर ( चक दे इंडिया..) म्हणून ट्रेनिंगमध्ये येऊ पाहणाऱ्या प्रशिक्षक अमोल मुजुमदार हे नाव सुद्धा सुवर्ण अक्षरात लिहिले गेले! हर्मन प्रीत कौर आणि प्रीती मन्धाना या अनुभवी स्टार क्रिकेटपटूंसोबतच जेमीमा, शेफाली, दीप्ती, ऋचा या तरुण आणि प्रतिभावंत मुलींनी विश्वचषक जिंकून देण्यात 'वाघिणीचा' वाटा उचलला. याचे श्रेय त्यांना उत्तम प्रशिक्षित करणाऱ्या प्रशिक्षकालाही जायला हवे. म्हणतात ना, राजा राज्यात पुजयते.. विद्वान सर्वत्र पुजयते. यावेळी एक गंमतीदार म्हण नव्यानं तयार झाली.
प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या ( यंग टीम इंडिया..) मागे एक पुरुष असतो अशी! आयुष्यात एक दरवाजा बंद झाला तर तो कायमचा बंद होत नसतो. तुम्ही जिद्द ठेवली तर दुसरा रत्नजडित दरवाजा तुमच्यासाठी उघडतो. थोडी वाट पहावी लागते. तेव्हढे धैर्य ठेवावे लागते. हे अमोल मुजुमदार यांच्या वीस वर्षांनंतरच्या प्रशिक्षक म्हणून सन्मानपूर्वक केलेल्या भन्नाट पुनरागमनाने सिद्ध केले आहे. स्त्रियश्चरित्म.. पुरुषस्य भाग्यम् कुछ भी हो सकता है...
चकदे चकदे इंडिया...
श्रीनिवास खांगटे
(कंटेंट, ललित लेखक, मुंबई
माझा फेसबुक कट्टा नावाने पुस्तक प्रसिद्ध)






