जेफ्री एपस्टीन कोण आहे ? ज्याची चर्चा आणि धास्ती आजही कायम आहे !
Who is Jeffrey Epstein? The man whose name still evokes discussion and fear.
X
"मी लैंगिक शिकारी नाही, मी एक 'गुन्हेगार' आहे," असे जेफ्री एपस्टीनने २०११ मध्ये न्यूयॉर्क पोस्ट दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. चेन स्नॅचिंग करणाऱ्या आणि खुन करणाऱ्या गुन्हेगारामधील फरक समजण्यासाठी एपस्टीनचं वरील वक्तव्यं पुरेसं आहे.
१० ऑगस्ट २०१९ रोजी न्यूयॉर्कच्या तुरुंगातील कोठडीत एपस्टीनचा मृत्यू झाला. लैंगिक तस्करीच्या गंभीर आरोप असलेल्या एपस्टीनला जामिनाची भाबडी आशा होती. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
एका अल्पवयीन मुलीकडून बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय करवून घेतल्याप्रकरणात एपस्टीनला दोषी ठरविण्यात आलं होतं. या घटनेला एक दशकाहून अधिकचा काळ उलटून गेला होता. त्यानंतर त्याच्यावर लैंगिक तस्करीचा गुन्हा नोंदविला गेला होता. वेश्या व्यवसायासाठी एपस्टीन हा अल्पवयीन मुलींचं मोठं नेटवर्क चालवत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. इतक्या आरोपानंतरही एपस्टीन स्वतःला निर्दोषच सांगत होता.
एपस्टीनच्या संपर्कात जगभरातील मोठे नेते, उद्योजक होते. त्यानं या सर्वांचे मुली आणि महिलांसोबतचे फोटो, व्हिडिओ काढून घेतल्याची चर्चा होती. या दरम्यानच नोव्हेंबर २०२५ मध्ये अमेरिकेच्या संसदेतील दोन्ही सभागृहामध्ये एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट बहुमतानं मंजूर केला. त्यानुसार एपस्टीनच्या सर्व गुन्ह्यांशी संबधित सर्व फाईल्स प्रसिद्ध करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ३० दिवसात या सर्व फाईल्स ऑनलाईन शोधता आल्या पाहिजेत आणि त्या डाऊनलोडही करता आल्या पाहिजे, याची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळं १९ डिसेंबरपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करत या सर्व फाईल्स सार्वजनिक करणं बंधनकारक होतं.
मागील काही वर्षात एपस्टीन प्रकरणातील हजारो कागदपत्रं, फोटो, व्हिडिओज् आधीच सार्वजनिक झालेली आहेत. त्यातून अनेक उच्चपदस्थ नेते, उद्योजक यांच्या क्षेत्रात सनसनाटी निर्माण झाली होती. हाऊस ओव्हसाइट कमिटीच्या सदस्यांनी ३ डिसेंबर २०२५ रोजी एपस्टीनच्या अमेरिकेतल्या व्हर्जिन आयलंड्समधील घराची छायाचित्र पहिल्यांदाच जगासमोर आणली. त्यात अनेक बेडरुम्स, भिंतीवर मुखवटे लावलेली एक खोली दिसत होती.
एपस्टीनचा जन्म न्यूयॉर्कमधला. तिथंच तो लहानाचा मोठा झाला. १९७० च्या दशकात तो न्यूयॉर्कच्या डाल्टन स्कूलमध्ये एपस्टीन हा गणित आणि भौतिकशास्त्र विषय शिकवत होता. विशेष म्हणजे एपस्टीननं विद्यापीठात या दोन्ही विषयाचा अभ्यास केला होता. मात्र, तो पदवी पूर्ण करु शकला नव्हता.
एपस्टीनची विद्यार्थ्यांना शिकविण्याची पद्धत चांगली होती. यामुळं त्याचा प्रभाव पडत असे. याच प्रभावाखाली येत एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी एपस्टीनची ओळख वॉल स्ट्रीटवरील बेअर स्टर्न्स या गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या एका वरिष्ठ पार्टनरशी करुन दिली. अवघ्या चारच वर्षात एपस्टीन हा या कंपनीत पार्टनर झाला. १९८२ पर्यंत त्यानं स्वतःचीच जे एपस्टीन अँड कंपनी स्थापन केली.
एपस्टीनची कंपनी ग्राहकांच्या १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्तेचे मॅनेजमेंट करण्यात यशस्वी झाली. एपस्टीननं या सर्व व्यवहारातून कमावलेली संपत्ती उधळायला सुरुवात केली. त्यात त्यानं फ्लोरिडामध्ये एक बंगला, न्यू मेक्सिको, न्यूयॉर्कमधील सर्वात मोठं घरं विकत घेतलं. त्यानंतर एपस्टीन हा सेलिब्रेटी, कलाकार आणि उच्चपदस्थ राजकारण्यांसोबत वावरु लागला.
२००२ मध्ये न्यूयॉर्क मासिकाला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीनवर पहिल्यांदा भाष्य केलं होतं. “जेफ्री एपस्टीनला मी १५ वर्षांपासून ओळखतो, तो एक जबरदस्त माणूस आहे, त्याच्यासोबत वेळ घालवायला खूप मजा येते, त्यालाही माझ्या इतक्याच सुंदर महिला आवडतात आणि त्यापैकी अनेकजणी या तरुण आहेत, असं वादग्रस्त वक्तव्यं ट्रम्प यांनी केलं होतं. त्यानंतर ट्रम्प आणि एपस्टीनमध्ये अनेकदा वादही झाले. व्हाइट हाऊसनंही स्पष्ट केलं होतं की, ट्रम्प यांनी कधीकाळी एपस्टीनला त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणात त्यांच्या क्लबमधून बाहेर काढलं होतं. ट्रम्प यांच्याशिवायही एपस्टीनचे अनेक उच्चपदस्थांशी संबंध होते. मात्र, त्याचा अर्थ त्या सर्वांनी गैरकृत्य केलं होतं, असा होत नसल्याचा खुलासाही व्हाइट हाऊसच्या प्रशासनानं केला होता.
एपस्टीननं २००२ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि अभिनेते केविन स्पेसी, ख्रिस टकर यांना एका खासगी विमानातून आफ्रिकेत नेलं होतं. २००३ मध्ये त्यानं चित्रपट निर्माता हार्वे वाइनस्टीनच्या साथीनं न्यूयॉर्क मासिकच विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो व्यवहार काही पूर्ण झालाच नाही. त्याच वर्षी एपस्टीनं हार्वर्ड विद्यापीठाला ३० दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली होती.
इंग्लडच्या राजकारणातील प्रसिद्ध असलेल्या पीटर मँडेलसन आणि एपस्टीनचीही मैत्री होती. त्यानंतर त्यांच्यातही वाद झाले. या मैत्रीबद्दल मँडेलसनने नंतर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एपस्टीनसोबतच्या मैत्रीमुळं मँडेलसनला २०१५ मध्ये त्याची अमेरिकन राजदूत ही नोकरी गमवावी लागली होती. यानंतरही एपस्टीननं त्याचं आयुष्य खासगी ठेवण्याचा प्रयत्न केला.
एपस्टीननं मिस स्वीडन इवा अँडरसन ड्युबिन आणि प्रकाशक रॉबर्ट मॅक्सवेल यांची मुलगी घिसलेन मॅक्सवेल या महिलांना डेटही केलं, पण लग्न कधीही केलं नाही.
एपस्टीन अडचणीत आला ते प्रकरण
फ्लोरिडातील एका पालकामुळं एपस्टीन अडचणीत आला. २००५ मध्ये फ्लोरिडातच राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलीच्या पालकानं सांगितलं की, एपस्टीननं पाम बीच इथल्या त्याच्या घरी त्यांच्या मुलीचा लैंगिक छळ केला होता. त्यानंतर पोलिसांनी एपस्टीनच्या घराची झाडाझडती घेतली असता पोलिसांचे डोळे चक्रावले ते घरातील प्रत्येक ठिकाणी मुलींचे फोटो पाहून. त्यानंतर एपस्टीनच्या काळ्या कृत्याचा एक-एक करुन उलगडा होत गेला...आजही इतक्या वर्षानंतर एपस्टीनच्या त्या कृत्यांची दहशत कायमच आहे...






