Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > कलाकृतीच्या इतिहासातील मोठा कॅनव्हास: सारपत्ता पारंबराई

कलाकृतीच्या इतिहासातील मोठा कॅनव्हास: सारपत्ता पारंबराई

तीन तासाचा चित्रपट नुसत्या बॉक्सिंग ची गोष्ट न राहता पाहता पाहता समष्टीची गोष्ट होते. खेळाचे चित्रपट, आणि त्यातही बॉक्सिंग सारख्या तुफान वेगवान शैलीदार बेदम मुक्केबाजी असणाऱ्या खेळाची गोष्ट बॉक्सिंगच्या रिंगणाबाहेरची आंबेडकरी जनतेच्या संघर्षाची , जल्लोषाची एक बेभान गोष्ट म्हणून बघायला हवे 'सारपत्ता पारंबराई' या दाक्षिणात्य चित्रपटाविषयी सांगताहेत मयुर लंकेश्वर..

कलाकृतीच्या इतिहासातील मोठा कॅनव्हास: सारपत्ता पारंबराई
X

"मी अमेरिका आहे, मी इथला तो भाग आहे जो आजवर तुम्ही डोळ्यांआड केलात, झापडबंद हरामखोरी केलीत,

पण आता माझी सवय करून घ्या.

मी आहे असा काळाकभिन्न, दुर्दम्य आत्मविश्वास असणारा,

राकट, दणकट, ठोश्यास ठोसा देणारा.

इथून पूढे इथे निनादत राहील ते माझं नाव, तुमचं नाही.

ठसठशीत पणे दिसून येईल ती -

माझी संस्कृती माझा धर्म, तुमची नाही.

माझी ध्येयं, माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा आणि

त्यावर निर्विवाद असणारी माझी हुकूमत, आणि माझीच मालकी...तुमची नाही...

आता तुम्ही माझी सवय करूनच घ्या! "

मोहम्मद अली ने ही बेदरकार गर्जना केली त्याला आता काळ लोटून गेला, काही दशके ओलांडून गेली.

पा रंजित चा आलेला "सारपत्ता पारंबराई' हा चित्रपट नेमका ह्याच दमदार आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेली कलाकृती आहे. नुसता येताजाताच बघायचा म्हटलं तर ही गोष्ट नुसत्या खेळाची आहे, बॉक्सिंग ची आहे. अशा गोष्टी आजवर चिक्कार सिनेमातून आपल्या समोर आलेल्या आहेत. मात्र ह्या कथेत प्रतिकं, प्रतिमा आणि रंग वापरून उठावदारपणे पेरलेला आंबेडकरी जाणीवेचा भाग हा फार मोठा आहे. तब्बल तीन तासाचा हा चित्रपट नुसत्या बॉक्सिंग ची गोष्ट न राहता पाहता पाहता समष्टीची गोष्ट होते. खेळाचे चित्रपट, आणि त्यातही बॉक्सिंग सारख्या तुफान वेगवान शैलीदार बेदम मुक्केबाजी असणाऱ्या खेळाची गोष्ट - अश्या गोष्टी हजारो येतील आणि जातील, पण पा रंजित ने सारपत्ता च्या माध्यमातून जो ठसा उमटवला आहे त्याच्याकडे बॉक्सिंगच्या रिंगणाबाहेरची आंबेडकरी जनतेच्या संघर्षाची , जल्लोषाची एक बेभान गोष्ट म्हणून बघायला हवे.

प्रस्थापित साचेबद्ध फ्रेम्सच्या चौकटी वापरणाऱ्या कंपूच्या थोबाडावर "जयभीम" म्हणून आजवर हेटाळणी केल्या गेलेल्या रंगाचा दणकून डार्क डस्की रॉ आणि मजबूत असा वजनदार स्टॅम्प ताकद लावून मारावा अशा प्रकारचं टेकिंग आणि छायाचित्रण सगळ्या सिनेमाभर भरभरून पसरलेलं आहे. आणि ह्याचमुळे ही गोष्ट केवळ काबिलन ची किंवा त्याच्या कोच रंगन ची न राहता ती आपलीच गोष्ट होऊन जाते.

फॅक्ट्रीमधल्या पोत्याच्या ढिगारावर टेकून काबिलन चा दोस्त त्याला म्हणतो - "आपल्याला संधी सहजासहजी मिळत नाही. तू धाडस दाखव काबिलन, हा आपला काळ आहे" तेव्हा मागे बाबासाहेबांचा हसरा शांत आणि गंभीर दिसणारा फोटो आपल्याला आश्वस्त करतो, झुंजायला बळ देतो. चेन्नई महापालिकेच्या राजवाडा सदृश बिल्डिंग समोरून भल्या पहाटे धावणारा काबिलन आपला व्यवस्थेशी असणारा संघर्ष किती मोठा आहे हे ठसवत राहतो. पा रंजित ने अशा फ्रेम्सची अक्षरशः जादू ठिकठिकाणी पेरलेली आहे. आंबेडकरी सौंदर्यशास्त्राचा हा चित्रपट उत्कृष्ट नमुना आहे. निळा हिरवा डार्क रंग सगळ्या चित्रपटभर खुबीने पेरलेला आहे. त्यातून होणारं आपल्या अस्तित्वाचं असर्शन असं नितळ करून दाखवणे हे आजवर फारच थोड्या जणांना जमलं आणि समजलं आहे.

"The Sun Has Risen, Let The Beat Begins" ह्या इंग्लिश subtitle चं अफलातून गाणं मला पॅन्थर महाकवी ढसाळांच्या "सूर्यफूल हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला, आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालॆच पाहिजे" ह्या कवितेशी नाळ सांगणारं वाटतं. दगडी राकट करड्या रंगाच्या बुद्धाच्या मांडीवर बसलेली छोटी छोटी पोरं आणि शांत डोळे मिटून स्मित हसणाऱ्या बुद्धाच्या अवतीभोवती बेधुंद बेफाम नाचणारे बाप्पे, आज्ज्या, बिनधास्त तरुण पोरं आणि पोरी मला माझीच हक्काची माणसं वाटतात. खऱ्या माणसांच्या फ्रेम्सची हि खरी जादू असते जी बसल्याजागी तुम्हाला सीन च्या अक्षरशः मधल्यामध्ये नेऊन ठेवते. पा रंजित ने केलेलं हे काम निव्वळ कमाल आहे.

"फार काळ झाला नाही, जेव्हा तुम्ही लोकं आम्ही टाकलेल्या तुकड्यावर जगायचा...आता मात्र माजलात! माझ्या मेलेल्या गाईच्या प्रेताची विल्हेवाट लावायचं आणि साफसफाई करायचं काम कर, मग तुला माफ करतो" म्हणणाऱ्या सारपत्ता क्लब च्या एकाधिकारी मालकीसाठी कपट षडयंत्र पणाला लावून आटापिटा करणाऱ्या सरंजामी थनिंगाच्या पोराला पुन्हा बॉक्सिंग रिंगणात काबिलान चारीमुंड्या चित करतो तेव्हा मनाला मिळणारा सुकून हा दमदार ठोश्यातून प्रकट झालेल्या हिंसक बदल्यापेक्षा आपलं माणूसपण ठसठशीत पणे उजळ होतंय ह्या जाणीवेतून आलेला कृतज्ञ हुंकार असतो.

शेवटच्या लढाईत अंगावर डार्क सिल्की निळ्या कलरचा रोब घालून पाठमोरा रिंगणाकडे निघालेला काबिलन हा नुसत्या बॉक्सिंग साठी रिंगणात उतरायला चालला नसून तो "आमचं असणं आणि आमचं इथं पाय रोवून ठामपणे उभं राहणं" हे किती महत्वाचं आहे हे दर्शवून देतो. पा रंजित च्या आजवरच्या चित्रपटातील फ्रेम्स ह्या आंबेडकरी कलाकृतीच्या इतिहासातील एक मोठा महत्वाचा कॅनव्हास आहेत. त्यात सारपत्ता पारंबराईचं स्थान हे अत्यंत स्पेशल आहे.

Updated : 28 July 2021 12:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top