Home > मॅक्स ब्लॉग्ज > जब तक सुरज चांद रहेगा !

जब तक सुरज चांद रहेगा !

इंदिरा गांधी यांनी केलेला महापराक्रम ते इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण झालेल्या भावना, याबरोबरच लेखक श्रीनिवास बेलसरे यांच्या मनावर इंदिरा गांधी यांच्या हत्येचा काय परिणाम झाला होता? जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा...

जब तक सुरज चांद रहेगा !
X

साल १९८४. महिना ऑक्टोबर, तारीख ३१. मी त्या दिवशी पुणे विद्यापीठात होतो. सकाळी ९.३०ची वेळ असेल. तरीही इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.पांडे आपल्या रूममध्ये आलेले होते आणि त्यांचे काम सुरु झालेले होते. मी गेलो होतो त्यांचे मार्गदर्शन घ्यायला. मला इंग्रजीत एम.ए. करायचे होते आणि तेही बाहेरून करायचे होते. सर त्यांच्या स्नेहपूर्ण शैलीत मार्गदर्शन करीत होते. तेवढ्यात त्यांच्या टेबलावरील फोन वाजला आणि सगळे शांत झाले. पलीकडून कोण बोलले ते कळाले नाही पण सरांच्या बोलण्यातून एक भयंकर बातमी कळली. ती खरी मानायला मन धजावतच नव्हते. पंतप्रधान इंदिराजींवर हल्ला झाला होता! त्यांच्या निवासस्थानीच सुरक्षारक्षकांनी निर्दयपणे त्यांच्याच सरंक्षणासाठी मिळालेल्या बंदुकीनी पंतप्रधानांच्या शरीराची चाळण केली होती! सरांचे शब्द अजून इतक्या वर्षानंतर लक्षात आहेत. ते म्हणाले होते, "...there was infiltration in her security itself."

प्रवेशासाठी आणलेली कागदपत्रे पिशवीत टाकली आणि सरळ फुलेनगरला बहिणीकडे निघालो. विद्यापीठाचे कामकाज होणार नव्हते आणि आता प्रवेश घ्यायची इछाच राहिली नव्हती. मन सुन्न झाले. इंदिराजींचा चेहरा डोळ्यासमोर तरळू लागला. एवढी तेजस्वी व्यक्ती, एवढी धाडसी, एवढी कर्तबगार, एवढी लोकप्रिय पण कुणा शत्रूकडून नव्हे, तर आपल्याच रक्षकांकडून ठार झाली होती. खरे तर नीट विचारही सुचत नव्हते. मी तेंव्हा बँक ऑफ इंडियात होतो. संघटनेचे कामही करीत होतो. त्यामुळे सर्व मोठ्या भांडवलदरांचा दबाव टाळून १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा बाईंचा धाडसी निर्णय माहित होता. त्यामुळेच तर आपल्याला बँकेची नोकरी मिळाली हे मनात पक्के होते. बँकेच्या दारातच चप्पल काढून येणारे, दबलेले, घाबरलेले, गरीब लोक केवळ इंदिराजींच्या कृपेनेच तिथे येऊ शकतात. याची अतिशय कृतज्ञ जाणीव आम्हाला आमच्या संघटनांनी करून दिलेली होती. माझे ते शिकण्याचे वय. त्यावेळी मनाचा केवढातरी निरागसपणा शिल्लक होता. आजचा निबरपणा आलेला नव्हता. त्यामुळे घरातले कुणीतरी मोठे माणूस गेल्यासारखेच वाटू लागले होते.

पंतप्रधान तेंव्हा संपूर्ण देशासाठी आदरणीय व्यक्ती होती. पक्ष, राजकारण, परस्परद्वेष, प्रत्येक घटनेमागे कारस्थानाच्या थियरी शोधणे हे सगळे तेंव्हा सार्वजनिक नव्हते. चोवीसतास काहीतरी सनसनाटी किंवा साध्याच घटनांना द्यायचा सनसनाटी अँगल शोधणारी प्रसारमाध्यमे नव्हती. जे घडले होते तेच अघटीत होते. होते केवळ दूरदर्शन, दर तासाला केवळ ५ मिनिटांचे बातमीपत्र देणारी आकाशवाणी आणि दुस-या दिवशी निघणारी वृत्तपत्रे ! आतासारख्या दिवसभर कानात कचरा ओतत बसण्या-या 'क्लीनअप' च्या गाड्यांसारख्या वृत्तवाहिन्या अस्तित्वातच नव्हत्या. त्या एकाच बातमीने मन अगदी सैरभैर झाले होते. पण हे झाले एक व्यक्ती म्हणून मनात आलेले विचार !

बाहेर विद्यापीठाच्या परिसरात तर सगळे वातावरणच बदलून गेले. बाहेर मुख्य रस्त्यावर जवळजवळ कर्फ्यू लागल्यासारखे वाटत होते. वाहतूक अगदी तुरळक आणि पोलिसांच्या गाड्या इकडूनतिकडे फिरत होत्या. एक अस्थिरता, साशंकता आणि अनामिक भीती जाणवत होती. देशाच्या सर्वोच्चपदी असलेल्या इतक्या लोकप्रिय नेत्याची इतक्या निर्दयपणे हत्या होण्याचा देशाच्या इतिहासातला तो पहिलाच प्रसंग होता.

बसने फुलेनगरला, माझ्या बहिणीकडे, निघालो. बसमध्ये तुरळक लोक होते. सगळे दबक्या आवाजात त्याच बातमीबद्दल बोलत होते. बस सायप्रसजवळच्या झोपडपट्टीपाशी आली. वाहतूक नसताना ड्रायव्हरने अचानक करकचून ब्रेक मारला. गाडी एक मोठा धक्का खावून थांबली. बसमधेच समोर जावून बघितले तर बससमोर एक ३५-४० वर्षाचा माणूस झोकांड्या खात उभा होता. हावभावावरून त्याने खूप दारू प्यायली असे लक्षात येत होते. त्याला एकदोघांनी बाजूला केले आणि बस सुरु झाली.

त्या घटनेला दशके उलटली आहेत. पण ढसाढसा रडत त्याने बोललेली ती दोनतीन वाक्ये जशीच्या तशी लक्षात आहेत, लहान मुलासारखा रडत तो आमच्या कंडक्टरला म्हणाला होता, "माझी माय मेली आहे, आमच्या समद्या गरिबांची माय मेली आहे, मास्तर, रडू नको तर काय करू?"

फुलेनगर बसचा शेवटचा थांबा! मी उतरून घरी जाऊ लागलो. शेकडो बैठी घरे असलेल्या त्या शासकीय वसाहतीतील लोक बाहेर जमले होते. कॉलनीतले कुणीतरी जावे तशी भीषण शांतता पसरली होती. बारीक आवाजात लोक बोलत होते. घरी रेडीओवरही शोकसंगीत सुरु होते. मन आणखीनच खिन्न झाले. लगेच औरंगाबादला परतल्यावरही सतत ह्याच बातम्या येत राहिल्या. शेजारच्यांच्या टीव्हीवर इंदिराजींचे अंत्यविधी दाखवीत होते. राजीवजींचा धीरगंभीर चेहरा मनातली उदासीनता वाढवीत होता. एकदाचा अग्नी दिला गेला. रेडिओवर अभिजात हिंदी आणि इंग्रजीत सगळ्या कार्यक्रमाचे निवेदन सुरु झाले. निवेदकाने एका इंग्रजी कवितेचा अन्वयार्थ सांगत म्हटले, "एखादी मोठी बोट जेंव्हा लोकांच्या नजरेतून दृष्टीआड होऊन दिसेनाशी होते, तेंव्हा एखाद्या दूरच्या देशातील त्या किना-यावरचे लोक म्हणत असतात, 'अरे पहा ती दिसतीये, ती येतीये." अतिशय भावविभोर शब्दातील त्या निवेदनाने डोळे पुन्हा एकदा भरून आले. झाले ! गेल्या इंदिराजी!

ती तडफ, ते धाडस, ती धडाडी, ते वेगात चालत जाणे, ते उघड्या मोटारीतील त्यांचे सुहास्य, चैतन्यमय दर्शन आता पुन्हा होणे नाही! सुन्न करणारी उदास जाणीव! मला आठवले, केवळ ७/८ दिवसापुर्वीच्या एका सभेत त्या म्हणाल्या होत्या, "मेरे खूनकी एक एक बुंद इस देश के लिये ही बहेगी." आपले तेही भयंकर वाक्य त्या खरे करूनच गेल्या !

वृत्तपत्रविद्येच्या वर्गात शिकविताना अनेकदा मोह होतो म्हणून मी परवापर्यंत पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना विचारायचो, "आपण १९७२ साली एक मोठा आंतरराष्ट्रीय पराक्रम केला तो माहित आहे का?" अर्थात १९८५ नंतर जन्माला आलेल्या या मुलांना काहीच माहित नसते. त्यांना ते जाणून घेण्यातही अजिबात रुची नसते. या देशाच्या एका महिला पंतप्रधानाने, पाकसारख्या युद्धखोर देशाचे दोन तुकडे करून 'बंग्लादेश' निर्माण केला, सुरवातीला त्या नव्या देशाचा सांभाळ केला आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य साम्राज्यवादी शक्तीच्या नाकावर टिच्चून भारताचे सार्वभौमत्व सिद्ध करून दाखविले. शेवटीशेवटी त्यांना तुम्ही 'त्या दोन संशयीत सुरक्षारक्षकांना काढून टाका, निदान त्यांची दुसरीकडे बदली करा' असेही सांगतिले गेले होते. पण सर्वधर्मसमभावावर निस्सीम श्रद्धा असलेल्या त्या कर्मयोगिनीने शेवटपर्यंत कुणाचेच ऐकले नाही. शेवटी त्यांना आपल्या तत्वांसाठी प्राणांचे मोल द्यावे लागले! पण आज असल्या गोष्टींत कुणाला रस आहे? सगळेच मुळातून बदलले आहे.

तरीही ३१ ऑक्टोबरच्या त्या उदास संध्याकाळी पुण्यात आणि देशभर चौकाचौकात लागलेले बॅनर्स माझ्या मनात अजूनही अनेकदा फडफडतात. पांढ-याशुभ्र कापडी बॅनर्सवर गर्द निळ्या अक्षरात एक ओळ लिहिलेली होती. अनेकांनी गेल्या ३२ वर्षात ती पुसून टाकायचे अनेक प्रयत्न केले. नव्या पिढीला इंदिराजी माहित नाहीत, जुने काहीच माहित करून घ्यायची त्यांना इच्छाही नाही. पण जोवर आम्ही जिवंत आहोत तोवर ते सळसळते चैतन्य, जे 'इंदिरा गांधी' या नावाने या देशात वावरले, ते कधीही विसरले जाणार नाही. निदान आमच्यासाठी तरी ते बॅनर्स आमच्या मनाच्या अवकाशात नेहमीच फडकत राहतील "जब तक सुरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा."

Updated : 31 Oct 2022 5:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top