Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरी पाटी घेऊन सोशल मिडीयात आलेल्यांसाठी...

कोरी पाटी घेऊन सोशल मिडीयात आलेल्यांसाठी...

कोरी पाटी घेऊन सोशल मिडीयात आलेल्यांसाठी...
X

नेमका बाबासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी 13 एप्रिलला व्हाट्सअप युनिवर्सिटी आणि फेसबुकवर मेसेज येतो की घटनासमितीत शेकडो लोक होते मग घटनेचे शिल्पकार फक्त बाबासाहेब कसे? 2 ऑक्टोबर तर सगळ्यांनी मुक्तपणे गांधीजींना शिव्या देण्याचा दिवस, गांधी कसे आणि कुठे चुकले यावर भरभरून लेख येतात.

14 नोव्हेंबर म्हणजे तर सगळ्यात मोठा शिमगा! नेहरूंवर खोटेनाटे आरोप लावण्याचा हक्काचा दिवस! नेहरू हे यात सगळ्यात दुर्दैवी. 1 ऑगस्ट आला की 'भटमान्य' टिळक कसे सनातनी होते, फक्त ब्राह्मणांचे नेते होते... आता पहिल्या पिढीचा उद्धार करून संपल्यावर आपली तरुणाई दुसऱ्या पिढीला सुरूवात करत आहे. साने गुरुजींना काल फटका बसलाच. पुन्हा, मी मीमवर बोलत नाही, प्रतिक्रियांवर बोलतोय.

आणि मी सराईत ट्रोलाबद्दल म्हणजे अजेंडे घेऊन आणि त्या अजेंड्यासाठीचा पगार घेऊन लिहीणारांबद्दल बोलत नसून कोरी पाटी घेऊन सोशल मिडीयात आलेल्या आजच्या सर्वसामान्य तरुण पिढीबद्दल बोलत आहे. सगळेच तसे नाहीत पण बहुतांश तरूण हे फशी पडत आहेत. राष्ट्रीय नेत्यांबद्दल फेसबुकवरून मत बनवत आहेत. आणि तशा कमेंट धडाधड टाकत आहेत जे योग्य नाही.

माझ्या वॉलवर सेक्युलॅरिझमला पाठिंबा देणारा एखादा तरूण दुसऱ्या कुठल्यातरी वॉलवर कट्टर जातीयवादी प्रतिक्रिया लिहिताना मला आढळतो. तेव्हा खरंच विश्वास बसत नाही की हा खरा की तो खरा? फेसबुकचा सगळ्यात वाईट भाग असा आहे की, इथं प्रत्येक राष्ट्रीय नेत्याचं फक्त वैगुण्य शोधलं जातं आणि ते तिखट मीठ लावून सांगितलं जातं.

हे ही वाचा...

‘गाडीचे स्टिअरिंग’ कुणाच्या हाती?

किरण बेदींना कोवीड-19 मंत्रालय? काय आहे सत्य?

राज्यात 24 तासात पुन्हा 9 हजारांच्यावर रुग्ण

“राजस्थानात राष्ट्रपती राजवट लागू करा”

रात्रीच्या अंधारात एखाद्या राष्ट्रपुरूषाच्या पुतळ्याची विटंबना करणारा आणि दिवसाच्या उजेडात फेसबुकवर राष्ट्रीय नेत्याचं प्रतिमाभंजन करणारा- कसा फरक करायचा दोघात? फक्त प्रतिमाभंजन. विधायक काहीच नाही. जणू काही या माणसांना देशानं आत्तापर्यंत डोक्यावर घेतलं ते केवळ अज्ञानापोटी आणि या नव्या संशोधकांनी फेसबुकवर संशोधन केल्यामुळेच जगाला सत्यस्वरूप कळलं अन्यथा सगळं जग अंधारात होतं.

राष्ट्रीय नेत्यांची चिकित्सा व्हावीच. चिकित्सेला विरोध नाही. उद्या बाबासाहेबांच्या 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' या प्रबंधात एखादं गृहीतक कसं चुकलं हे कोणी सप्रमाण मांडलं किंवा महात्मा फुलेंचा शेतीविषयक आर्थिक विचार कोणी खोडून दाखवला किंवा गांधीजींच्या सत्याग्रहातल्या उणीवा दाखवल्या किंवा नेहरूंच्या परराष्ट्र नीतीत चुका काढल्या किंवा टिळकांच्या गीतारहस्यामध्ये त्यांचं गीतेचं आकलनच मुळात कसं चुकलं? हे मांडलं तर स्वागत आहे! मराठी समाज बौद्धिकदृष्ट्या जिवंत असल्याचं ते लक्षण असेल. पण भलतीच समीक्षा होतांना दिसतेय.

काळाच्या मर्यादेत त्यांनी शक्य तितके बदल घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामाची चर्चा करा. त्यांच्या योगदानाची चर्चा केली तर आपणही काही करावं असं वाटेल. त्यांचे फक्त तथाकथित दोष चघळत बसलो. तर गावच्या पारावर वर्षानुवर्ष त्याच गप्पा मारत बसलेल्यांसारखी तुमची अवस्था होईल. ज्यांच्यावर तुम्ही टीका करता ते कधीच वर गेले. तुमच्या भविष्यात जर कशाचा उपयोग करता येईल तर तो त्यांच्या कामाचा. त्यांच्या चुकांचा काय उपयोग?

प्रतिमाभंजनाच्या खेळातून बाहेर या, विधायक काम बघा. शक्य झालं तर ते पुढे न्या. मी सरसकटीकरण करत नाही. विधायक विचार करणारे पण आहेत. पण संख्या अगदी नगण्य. आणि तरूण म्हणून तुमची प्रत्येक अभिव्यक्ती मला मान्य आहे, अभिव्यक्तीचं पिढीगणिक बदललेलं वेगळेपणही मान्य आहे. फक्त अभिव्यक्ती हे साध्य नसून साधन आहे. एवढंच सांगायचंय.

गांधी सनातनी होते, बाबासाहेब अहंकारी होते, नेहरू चारित्र्यहीन होते, टिळक फक्त भटमान्य होते या सगळ्या अफवा आहेत. अभ्यास वाढवला की डोक्यात प्रकाश पडेल. या सगळ्यांच्या कामाचा अभ्यास करा, सोशल मिडीयानं आकसानं त्यांच्यावर लादलेल्या कथित दुर्गुणांचा अभ्यास करून काय होणार?

स्वातंत्र्यानंतरच्या दोन-तीन पिढ्यांनी चांगलं ते समोर ठेवलं. नव्या पिढीनं फक्त वाईटाचा शोध लावून ते झाकाळून टाकू नये. ज्ञानात भर पडावी, अज्ञानापुढे ज्ञान संपून जाऊ नये. द्वेष हा फक्त राजकीय अजेंडा असतो, अभ्यासात द्वेषाला जागा नाही. द्वेष की अभ्यास यावर एकदा व्यक्तिगत निर्णय करायचा आहे.

Updated : 27 July 2020 3:08 AM GMT
Next Story
Share it
Top