Home > कॅलिडोस्कोप > नितीशकुमारांचे दात पोटात !

नितीशकुमारांचे दात पोटात !

नितीशकुमारांचे दात पोटात !
X

‘नितीशकुमार के दात तो पेट में है !’ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपबरोबर नवी सोबत करण्याचा निर्णय घेतल्यावर भाजपच्याच एका नेत्याने व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया अगदी बोलकी आहे. किंबहुना, गेल्या चार दशकातल्या नितीशकुमार यांच्या राजकारणाचं हे सूत्र आहे. नितीशकुमार कधी कोणती राजकीय खेळी खेळतील हे त्यांचे मित्रही सांगू शकत नाहीत. अत्यंत मितभाषी असलेला हा नेता आतल्या गाठीचा तर आहेच, पण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत नरेंद्र मोदींप्रमाणेच एककल्ली वृत्तीचा आहे.

लालूप्रसाद यादव यांची सोबत सोडण्याचा निर्णय नितीशकुमार यांनी अचानक घेतलेला नाही. चार महिन्यांपूर्वीच त्यांनी हा कट रचला असं कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आज म्हणत आहेत. पण राहुल गांधी यांच्या जवळ असलेल्या पत्रकारांच्या म्हणण्यानुसार नितीशकुमार यांनी काँग्रेस आणि लालू यादव या दोघांनाही गाफील ठेवून मोठा खेळ केला. लालू यादव यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीबीआयचं अस्त्र बाहेर काढलं ते या खेळातलं पहिलं पाऊल होतं. तोपर्यंत गेल्या वीस महिन्यातल्या लालूंच्या राजकीय सहवासाला नितीश पार वैतागले होते. महाराष्ट्रात भाजप सरकार विरुद्ध शिवसेना ज्या स्वरात बोलते त्यापेक्षा कितीतरी उंच आवाजात आणि अभद्र शब्दात लालूंचे सहकारी नितीशकुमार यांच्याबद्दल बोलत होते. लालू सांभाळून घेत असले तरी नितीशकुमार आतून दुखावले होते आणि योग्य संधी साधून लालूंना सोडचिट्ठी देण्याचा निर्णय त्यांनी मनोमन घेतला होता.

लालूंविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आणि सीबीआयच्या धाडी ही ती संधी ठरली. यावेळी नितीशने थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहांशीच समझोता केलेला दिसतो आहे. म्हणूनच काल राजीनामा दिल्यावर सर्व व्यवस्था अगदी सज्ज होती. अवघ्या काही मिनिटांतच मोदींनी नितीश यांचं अभिनंदन केलं आणि बिहारचा अधिभार ज्यांच्याकडे आहे ते पश्‍चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी काल नेमके याच वेळी पाटण्यात हजर होते. भाजपच्या विधीमंडळ पक्षाची आणि केंद्रिय कार्यकारिणीची बैठकही कालच संध्याकाळी ठेवण्यात आली हा निव्वळ योगायोग नव्हे. याचा अर्थ असाही लावता येतो की, राजीनाम्याची वेळसुद्धा नितीशकुमार यांनी मोदींशी बोलून ठरवली होती. मी माझा विवेकाचा आवाज ऐकला असं नितीश म्हणत असले तरी त्यात काही अर्थ नाही. भाजपने पाठींबा द्यायचा आधीच ठरलं होतं. त्यामुळे नितीशकुमार यांनी हे पाऊल उचललं हे स्पष्ट आहे. खरं तर बिहारमध्ये लालू यादव यांचा पक्ष (८३) सगळ्यात मोठा पक्ष आहे. नियमाप्रमाणे राज्यपालांनी त्यांना संधी द्यायला हवी होती. पण केसरीनाथ त्रिपाठी यांचा इतिहास पाहता ते मोदींशी गद्दारी करतील हे संभवतच नाही. म्हणूनच नितीशकुमार यांनी रात्रीच्या रात्री समर्थनाचं पत्र दिलं आणि सकाळी दहा वाजता घाईघाईने शपथविधी उरकला. लालू आणि तेजस्वी यादव यांनी काही हालचाल करण्याआधीच त्यांना चीतपट करण्यात आलं.

नितीशकुमार यांची ही खेळी पूर्णपणे संधीसाधू आहे यात शंका नाही. बिहारच्या जनतेने संयुक्त जनता दल-राजद-कॉंग्रेसच्या महायुतीला कौल दिला होता. तो कौल एक प्रकारे नितीशकुमार यांनी धुडकावून लावला आहे. एरवी नैतिकतेच्या बाता मारणाऱ्या भाजपनेही नितीश यांना पाठींबा देऊन संधीसाधूपणाच केला आहे. बिहारमध्ये भाजपकडे नितीश यांच्याएवढा प्रभावी नेता नाही. त्यामुळे या नव्या सरकारमध्ये नितीश यांचा पक्ष मोठ्या भावाची भूमिका पार पाडेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ही गोष्ट चालणार आहे. कारण नितीशकुमार यांना आपल्या तंबूत आणून मोदी यांनी विरोधकांच्या युतीतली हवाच काढून घेतली आहे. विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमार मोदींना आव्हान देऊ शकत होते. आता हाच उमेदवार मोदींनी पळवल्याने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर हात चोळत बसायची वेळ आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची पोळी शिजायची शक्यता नितीशकुमार यांना वाटत नसावी. मग अशावेळी मोदींशी पंगा घेण्यात काय अर्थ? नितीश यांनी २०२० पर्यंत आपलं सरकार कायम तर ठेवलंच आहे, पण २०२४ पर्यंतच्या वाटचालीची प्राथमिक तरतूद केली आहे. त्यांनी पूर्वी १७ वर्षं एनडीएबरोबर काढली आहेत. याचा अर्थ, ते पुढची सात वर्षं मोदींबरोबर राहतीलच असा नव्हे. राजकारणात प्रत्येक दिवस नवा असतो. नितीशकुमार आपल्या स्वभावानुसार सोयीप्रमाणे आणि संधीप्रमाणे अंदाज घेऊन पुढचं पाऊल टाकतील. पण सध्या तरी त्यांनी आपला राजकीय स्वार्थ साधला आहे.

नितीशकुमार हे समाजवादी आंदोलनातून राजकारणात आले. जनसंघ किंवा भाजपशी संग ही समाजवाद्यांची जुनी खोड आहे. डॉ. लोहियांच्या काँग्रेस विरोधी राजकारणातून ही खोड समाजवाद्यांना लागली. पुढे जनता पक्षाच्या काळात जयप्रकाशांच्या आग्रहापुढे समाजवादी नेत्यांना नमावं लागलं आणि राजकीय मूर्खपणा करून त्यांनी आपला पक्षच मोडीत काढला. संघ किंवा भाजपचा धोका ओळखणाऱ्या मोजक्या समाजवादी नेत्यांमध्ये मधू लिमयेंची गणना होईल. म्हणूनच जनता पक्षाचं सरकार असताना त्यांनी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. पण यापासून जॉर्ज फर्नांडिस किंवा नितीशकुमार यांच्यासारख्या त्यांच्या चेल्यांनी काहीही धडा घेतला नाही. मंडलोत्तर काळात लालूंच्या विरोधी राजकारण करायचं म्हणून जॉर्ज आणि नितीश दोघेही भाजपच्या कळपात सामील झाले. आणि मंत्रीपदं मिळाल्याने तिथेच रमले. २००२ च्या गुजरात दंगलीच्या वेळेला नितीशकुमार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता. २०१३ साली त्यांनी मोदींच्या उमेदवारीला विरोध केला तो पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा जागी झाल्याने.

पण २०१४ लोकसभा निवडणूक निकालांनंतर वस्तुस्थिती त्यांच्या ध्यानात आली आणि त्यांनी बिहारी राजकारणावर लक्ष केंद्रित केलं. भ्रष्टाचाराचे आरोप त्यावेळीही लालूंवर होते आणि आजही आहेत. मग त्यांच्याबरोबर २०१५ ची निवडणूक लढवायला नितीशकुमार कसे काय तयार झाले? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत लालू यादव यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आणि आपला निष्ठावंत मतदार आपल्याबरोबर असल्याचं सिद्ध केलं. मग आजच नितीशकुमार यांना नैतिकतेचा झटका कसा काय आला? लालूंच्या भ्रष्टाचाराचं समर्थन करण्याचं कारण नाही, पण लालू भ्रष्ट आणि मोदी-अमित शहा साधूसंत हा युक्तिवाद पटणारा नाही. भ्रष्टाचारी लालूंना विरोध करताना नितीशना भ्रष्टाचाराचे, दंगलखोरीचे गंभीर आरोप असलेले मोदी-शहा कसे काय चालतात? कालपर्यंत मोदींच्या तीन वर्षाच्या कारभाराबद्दल नितीश नाराजी व्यक्त करत होते. गोरक्षकांनी केलेल्या हत्या, वाढती बेरोजगारी, अरेरावी कारभार याविषयी त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते टीका करत होते. डिमॉनेटायझेशनला नितीश यांनी सुरुवातीला पाठींबा दिला असला तरी त्याच्या परिणामांविषयी चिंता व्यक्त केली होती. मग आता भाजपचा पाठींबा घेताना याबाबतची त्यांची भूमिका बदलली आहे काय याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे.

नरेंद्र मोदी नितीशकुमारना भावी काळात नामोहरम करतील असा अंदाज काही विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे. आजच तसा कयास बांधणं मला योग्य वाटत नाही. दोघेही ठकास महाठक आहेत. कोण कोणाला 'खो' देणार हे भावी काळात स्पष्ट होईल. एक पंतप्रधान आहे तर दुसरा पंतप्रधान होण्याची स्वप्न बाळगून आहे. आज दोघांनी मिठी मारली असली तरी खिशातले खंजीर कधी बाहेर येतील हे सांगता येणार नाही. सध्या तरी बिहारच्या या राजकारणामुळे ऍडव्हांटेज मोदी आणि ऍडव्हांटेज नितीशकुमार असा डाव पडला आहे. झटपट होणाऱ्या प्रेमाचे परिणाम कळायला काही काळ जावा लागतो. आगे आगे देखो होता है क्या !

Updated : 27 July 2017 2:08 PM GMT
Next Story
Share it
Top