Fact Check 3 : नैनीतालमध्ये मुसलमानांची दुकानं पेटवली सांगत बांग्लादेशचा व्हिडिओ शेअर केला
X
उत्तराखंडच्या नैनीताल मध्ये एका १२ वर्षीय मुलीवर ७३ वर्षांच्या महमद उस्मान नावाच्या नराधमानं बलात्कार केल्याचं प्रकरण उजेडात आल्यानंतर उस्मान वर पोस्को कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शनं करत दुकानांची तोडफोड केली, एका मशीदीवर दगडफेक केली. याच अनुषंगानं सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरला झालाय. ज्यामध्ये अनेक दुकानांना आग लागल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ शेअर करतांना दावा करण्यात येतोय की, हा व्हिडिओ नैनीताल इथला आहे, जिथं हिंदुंनी मुसलमानांच्या दुकानं पेटवून दिली. उजव्या विचारसरणीच्या कित्येकांनी हा व्हिडिओ ट्विटही केलाय.
भाजप समर्थक जनार्दन मिश्रा यानेही हा व्हिडिओ ट्विट केलाय. त्यावर त्यानं लिहिलंय की, उत्तराखंड च्या नैनीताल इथं हिंदुनी जिहादींना चांगल्या प्रकारे उध्वस्त केलंय. पूर्ण भारतात देशविरोधी घटकांसोबत असंच घडलं पाहिजे, असंही मिश्रानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय.
उत्तराखंड #नेनीताल में हिंदू भाइयों ने जिहादियों को अच्छी तरह पेल कर बर्बाद किया है, देश विरोधी तत्वों के साथ ऐसा ही होना ही चाहिए पूरे भारत में pic.twitter.com/RzGvdVmOd8
— Janardan Mishra (@janardanspeaks) May 4, 2025
पारस जैन याने देखील हा व्हिडिओ ट्विट करतांना लिहिलंय की, नैनीतालच्या हिंदुंनी नैनीतालला इस्त्रायल बनवलं.
सुदर्शन न्यूज च्या सागर कुमार ने देखील हा व्हिडिओ नैनीतालचा असल्याचं सांगत शेअर केलाय.
याशिवाय अन्य यूजर्सने देखील हाच व्हिडिओ याच दाव्यासह ट्विट केलाय.
फॅक्ट चेक
ऑल्ट न्यूजनं या व्हायरल व्हिडिओचे काही फोटो काढून ते रिवर्स इमेज मध्ये टाकून सर्च केल्यानंतर हाच व्हिडिओ बिना क्रॉप केलेला इंस्टाग्रामवर मिळाला तो देखील चांगल्या दर्जाचा.
प्रथमदर्शनीच हा व्हिडिओ संशयास्पद वाटतो. कारण हा व्हिडिओ नैनीतालचा असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुकानांवर बांग्ला भाषेतला मजकूर आहे. नैनीताल मधील दुकानांवर बांग्ला भाषेत मजकूर लिहिण्याचं कुठलंही औचित्य नाही. कारण बांग्ला भाषा मुख्यत्वे भारताच्या पश्चिम बंगाल आणि आस-पासच्या राज्यांमध्ये बोलली-लिहिली जाते. शेजारील बांग्लादेशाची ती अधिकृत भाषाही आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये बहुतांश लोकांनी लुंगी घातलेली दिसते. अशाप्रकारे भारताच्या पश्चिम बंगाल आणि आसपासच्या राज्यांसह शेजारील बांग्लादेशमध्ये नियमित पेहराव म्हणून लुंगी घालण्याची प्रथा आहे.
ऑल्ट न्यूजनं रिवर्स इमेज सर्च किंवा की-वर्ड्स सर्च केल्यानंतर त्यांना अशी कुठलीही बातमी भारतात घडल्याचं आढळून आलं नाही, जो दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत होता. तो या पडताळणीमुळं फोल ठरला. ऑल्ट न्यूजनं बांग्लादेशचे फॅक्ट चेकर सोहनूर रहमान सोबत व्हायरल व्हिडिओशी संबंधित माहिती घेण्यासाठी संपर्क केला. रहमान यांनी ११ जुलै २०२४ ची एक फेसबूक पोस्ट ऑल्ट न्यूजला पाठवली. ही पोस्ट बांग्ला भाषेत लिहिलेली होती. बांग्लादेशातील लक्ष्मीपूर इथल्या मोजू चौधरी हाट बाजारामध्ये भीषण आग, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं होतं.
ऑल्ट न्यूजनं व्हायरल होणाऱा व्हिडिओ आणि रहमान यांनी पाठवलेल्या व्हिडिओच्या फ्रेम जुळवून बघितल्या. हे दोन्ही व्हिडिओ एकाच घटनेचे असल्याचं निष्पन्न झालं. ग्राफिक्सच्या माध्यमातून या दोन्ही व्हिडिओची तुलना बघता येईल.
नैनीतालच्या पोलिसांनीही या व्हायरल व्हिडिओसंदर्भात एका नेटिझन्सला रिप्लाय दिलाय. या रिप्लायमध्ये पोलिसांनी म्हटलंय की, या व्हिडिओचा नैनीताल, उत्तराखंडशी कुठलाही संबंध नाही. त्यासोबतच पोलिसांनी अशाप्रकारे खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशाराही दिला.
एकूणच, कित्येक नेटिझन्सनी बांग्लादेशातल्या एका बाजारातील दुकानांना लागलेल्या आगीचा जुना व्हिडिओ वापरुन त्याचा संदर्भ नैनीताल मध्ये झालेल्या तणावाशी जोडून शेअर केला होता.