Home > मॅक्स ब्लॉग्ज > धुरंधर : Akshay Khanna is trending...

धुरंधर : Akshay Khanna is trending...

अक्षय खन्ना हा आपल्या सुपरस्टार हँडसम अभिनेता पिता विनोद खन्नापेक्षा 'बाप अभिनेता' आहे आणि होता.

धुरंधर : Akshay Khanna is trending...
X

या आठवड्यात किंबहुना गेल्या दोन चार दिवसांपासून अभिनेता अक्षय खन्ना Akshaye Khanna जबरदस्त ट्रेंडिंग trending आहे सोशल मीडियावर. निमित्त आहे धुरंधर या नव्या चित्रपटाचे Dhurandhar Movie.

नुकताच आदित्य धर या नव्या भारत-पाक युद्ध, गुप्तहेर, देशभक्ती स्पेशालिस्ट सिनेमाकर्त्याचा 'धुरंधर' नावाचा नवा गुप्तहेर Spy Thriller ( की पाकिस्तान गँगवॉर..??) चित्रपट आला आहे.! गेले दोन-तीन दिवस या सिनेमाच्या रिव्ह्यूचा सोशल मीडियावर होम- यज्ञ पेटलेला असता, म्हटलं चला, आपणही चार चमचे आहुती टाकूया. सिनेमा अफाट वेगवान आहे. पटकथा वेगवान आहे. चित्रपटातील साऱ्याच मुख्य कलावंतांची कामे अफलातून झाली आहेत.! या सिनेमाचा हिरो आहे रणवीरसिंग. त्यानं त्याच्या अफाट दांडग्या व्यक्तिमत्वाच्या सहाय्यानं हमजा अली ही पठाणी व्यक्तिरेखा अफलातून साकारली आहे. त्यानं कुठेही भूमिकेची पकड सुटू दिली नाही.!


रणवीरसिंग हा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांना न्याय देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानं हमजा या भूमिकेला अत्यंत संयमितपणे पण अफाट न्याय दिलाय.! किंबहुना चाळीशीतला रणवीरसिंग हमजाच्या जटाधारी पठाणी भव्य गेटअप मध्ये कमालीचा उठावदार वाटतो. त्याच्या निम्म्या वयाची नायिका त्याला हिरोईन म्हणून दिली असली तरी.. हमजा लेडी किलर वाटतोच चित्रपटात. तरीही सध्या धुरंधर गाजतोय तो खतरनाक पाकिस्तानी बलुची टोळीचा नायक गुंड रेहमान डकैतसाठी.!

या खलनायकी भूमिकेसाठी जे काही अभिनेता अक्षय खन्नाने रेहमान डकैत या बलुची गँगस्टर-डॉनचे बेअरिंग पकडले आहे ते केवळ थक्क करणारे असेच आहे. अक्षय खन्नाच्या एकूणच कारकिर्दीत ही भूमिका मैलाचा दगड ठरावी अशीच आहे. त्यानं हॉलिवूडच्या 'गॉडफादर'ची आठवण करून दिली.. किंबहुना या भूमिकेसाठी अक्षय खन्नाला ऑस्कर मिळावे एव्हढं रेहमानचं कॅरेक्टर त्याने जिवंत उभे केले आहे. त्याचं ते स्टायलिश तिरके चालत येणं.. त्याची ती धारदार नजर बाप रे... अंगावर येतं.!

किरकोळ देहयष्टी, खोल गेलेले गाल, पन्नाशी उलटलेले वय या साऱ्या दुर्बल गोष्टींवर त्याच्या देहबोलीयुक्त धारदार अभिनयाने मात केली आहे. शेवटच्या हाणामारीच्या दृश्यांमध्ये धिप्पाड देहयष्टीच्या संजय दत्त आणि रणबीरसिंह यांना तो ज्या त्वेषाने भिडतो ते पाहून थक्क व्हायला होतं. एका समर प्रसंगात सस्पेंड पोलिस कमिशनर चौधरी उर्फ संजय दत्त त्याला पळवून नेऊन त्याला मारहाण करत जखमी करतात. त्याचा उजवा हात आणि बॉडीगार्ड असलेला हमजा त्याची तेथून सुटका करतो.

एका ब्रिजवर एका टोकाला रेहमानची टोळी.. आणि दुसऱ्या टोकाला चौधरी ची ब्रिगेड. जखमी रेहमान विजयी मुद्रेने आपल्या टोळीकडे जाताना चिडलेल्या पण असहाय्य चौधरी उर्फ संजय दत्तकडे पाहून त्याला खिजवण्यासाठी अत्यंत विषारी हसतो.. हे दृश्य प्रत्यक्ष पाहणे मनोरंजक आहे. अक्षय खन्नाचा अख्खा चेहरा त्याच्या अक्षय टोकदार नजरेसह बोलतो.! त्याला त्यासाठी बोलभांड भाषणबाजीची गरज लागत नाही.!

रेहमान डकैत समोरून चालत येताना, मग घरात असो, पॉलिटिकल स्टेजवर असो की, शत्रूच्या गोटात असो.. अफाट वाटतो.!

अक्षय खन्ना हा आपल्या सुपरस्टार हँडसम अभिनेता पिता विनोद खन्नापेक्षा 'बाप अभिनेता' आहे आणि होता..

गंमत म्हणजे सुरुवातीला सिनेमाच्या प्रमोशनच्या पोस्टरमध्ये चौथ्या पाचव्या स्थानावर असलेल्या अक्षय खन्नानं अख्खा चित्रपट ताकदीनं 'उचलला' आहे.!



अक्षय खन्नानंतर उल्लेखनीय आणि चकित करणारं काम राकेश बेदी या ज्येष्ठ अभिनेत्याचे आहे. अख्खं आयुष्य राकेश बेदींना फुटकळ विनोद करणाऱ्या भूमिकाच मिळाल्या.. केवळ याच चित्रपटात त्यांच्या प्रतिभेचे चीज झाले असे म्हणता येईल. अत्यंत कारस्थानी, लबाड नेत्यासह त्यांनी मजबूर झालेल्या मुलीच्या अस्वस्थ पित्याचेही रंग या भूमिकेत पेरलेत. खरं तर उत्तम वेगवान हिंसक सिनेमा करूनही या चित्रपटाच्या कथानकाला घेऊन लेखक दिग्दर्शक आदित्य धर गोंधळलेला आहे हे स्पष्टपणे जाणवते.! हमजा अली हा मूळ भारतीय धुरंधर गुप्तहेर असतो जो पाकिस्तानात उत्पात म्हणण्यासाठी वरिष्ठ भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या धुरिणांकडून पाठवला जातो. खरं तर तो कुठेही भारतीय गुप्तहेर म्हणून प्रभावी न वाटता तो डॉन रेहमान डकैतचा कट्टर भाडोत्री बलुची गुंड वाटतो.!

(आणि गंमत म्हणजे ते जास्त प्रभावी झाले आहे.)

हा सिनेमा सुरुवातीला भारत पाकिस्तान आणि त्यामधील गुप्तहेरी संघर्ष या नेहमीच्या ( सरधोपट..) वाटेने जाणार असे वाटत असताना, पाकिस्तानमधील कराची येथील लाहोरी विभागातील बलोची आणि स्थानिक मुस्लिम गुंड टोळ्यांमधील भयानक हिंसक टोळीयुद्ध असा मालमसाला यामध्ये आहे. अर्थात त्याला जोड दिली आहे भारतातील दहशतवादी हल्ल्यांना शस्त्रास्त्र पुरवठा करण्याची. आर माधवन सारख्या उत्तम अभिनेत्याला सुपरिचित गुप्तहेर प्रमुखाचा केवळ गेटअप करून दिग्दर्शकाने निव्वळ फुकट घालवले आहे..

पण कलाकारांच्या उत्तम अभिनयासाठी आणि दिग्दर्शकाच्या वेगवान हाताळणीसाठी हा सिनेमा पहायला हवा. रेहमान डकैतसाठी जान कुर्बान करणारा, त्याला जीवाच्या अनेक संकटांमधून वाचवणारा त्याचा साथीदार.. हमजा ( रणवीरसिंग..) त्याला शेवटच्या प्रसंगात फसवून जंगलात नेऊन चौधरीच्याच हवाली करून ठार मारतो. तो म्हणजे हमजा भारतीय गुप्तहेर असल्यानं आणि रेहमानने २६/११ च्या हल्ल्यात शस्त्रपुरवठा करण्यात आपल्या शत्रूराष्ट्राला मदत केल्यानं ते निश्चितच योग्य वाटते.!

पण एकूण कथानकाचा सिक्वेन्स पाहता, लॉजिकली मेंदूला ते अजिबातच पटत नाही.!

अर्थात अपने यहाँ -सारे जहाँ, आजकल सिर्फ खुदाका मॅजिक चलता है.. इन्सान के बुध्दीका लॉजिक नहीं.!


Updated : 10 Dec 2025 12:04 PM IST
Next Story
Share it
Top