Home > Politics > शरद पवार दिल्लीत, नवीन समीकरण जुळणार का?

शरद पवार दिल्लीत, नवीन समीकरण जुळणार का?

शरद पवार शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत, नवीन समीकरण जुळणार का? काय घडतंय पडद्यामागे... sharad pawar in Delhi its new political Equation time in Maharashtra

शरद पवार दिल्लीत, नवीन समीकरण जुळणार का?
X

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपुर्वी फडणवीस यांनी पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोदींची भेट घेतली. या भेटीत "सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. याआधी बराच काळ आम्ही एकत्र होतो. त्यामुळे पंतप्रधनांसोबत आमची व्यक्तिगत भेट झाली. या भेटीत वावगं काहीच नाही." असं म्हणत आमचे संबंध चांगले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते.

दरम्यान कालच 19 जूनला शिवसेनेचा 55 व्वा वर्धापन दिन पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला होता. विशेष बाब म्हणजे या संपुर्ण लाईव्ह कार्यक्रमात एरवी हे सरकार 5 वर्ष टिकेल असं म्हणणारे उद्धव ठाकरे "आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे", अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

तिकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आगामी निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी घोषणा केली. आणि इकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी दिलेली ऑफर नाकारली. सध्या कॉंग्रेस स्वबळाचा नारा देत आहे. असं बोललं जात असलं तरी कॉंग्रेस आणि शिवसेना यांचं तसंही भविष्यात कुठलंही गणित जुळेल याची शक्यता नाही. मात्र, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचं आपआपसात कधीही आणि केव्हाही जुळू शकतं शकतं. याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळं त्यांनी 'आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही'. 'सत्ता न मिळाल्यानं अनेकांचा जीव कासावीस होतोय.' असं म्हणत राज्यातील तीनही प्रमुख पक्षांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर अचानक 9 जूनला प्रताप सरनाईक यांनी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र आज 20 जूनला माध्यमांमध्ये झळकलं आहे. विशेष बाब म्हणजे दिल्लीत उद्धव ठाकरे यांनी 8 जूनला मोदींची भेट घेतली. आणि 9 जूनला हे पत्र लिहिलं गेलं आहे. हा काही योगायोग नाही.

या सगळ्या घडामोडी घडत असतानाच प्रशांत किशोर यांची भेट घेतल्यानंतर देशातील तिसऱ्या आघाडीसाठी शरद पवार दिल्लीत बड्या नेत्यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात असलं तरी राज्यात राजकीय नेत्यांची वक्तव्य आणि सरनाईक यांचं पत्र राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असल्याचं सांगत आहे. त्यामुळं राजकीय समीकरण बदलत असल्याचं सांगायला पवारांना कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. फक्त आता हे समीकरण राष्ट्रवादी भाजप असं होतंय की, शिवसेना भाजप असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.

Updated : 20 Jun 2021 2:44 PM GMT
Next Story
Share it
Top