Home > Entertainment > अर्धशून्य भासे मज हा कलह जीवनाचा.

अर्धशून्य भासे मज हा कलह जीवनाचा.

आपण आयुष्यात अनेक गोष्टी करतो. काही अर्थ पुर्ण तर काही अर्थहीन.. यामध्ये अर्थहिन गोष्टी करताना आपल्याला निव्वळ आनंद मिळतो तर अर्थपुर्ण गोष्टी करताना आपल्याला समाधानासह एक दुखःची झालरही मिळते पण नेहमी असं का होतं, जाणून घेण्यासाठी वाचा श्रीनिवास बेलसरे यांचा हा महत्वपुर्ण लेख!

अर्धशून्य भासे मज हा कलह जीवनाचा.
X

आपण आयुष्यात अनेक गोष्टी करतो. काही अर्थ पुर्ण तर काही अर्थहीन.. यामध्ये अर्थहिन गोष्टी करताना आपल्याला निव्वळ आनंद मिळतो तर अर्थपुर्ण गोष्टी करताना आपल्याला समाधानासह एक दुखःची झालरही मिळते पण नेहमी असं का होतं, जाणून घेण्यासाठी वाचा श्रीनिवास बेलसरे यांचा हा महत्वपुर्ण लेख!

महाभारतातील सत्यवतीची कहाणी सर्वांना परिचित आहे. त्यावरच प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांनी 'मत्स्यगंधा' नावाचे संगीत नाटक लिहिले होते. महाभारतात सत्यवतीचे आयुष्य व्यासमुनींनी एक शोकांतिका म्हणूनच रंगवले आहे. खरे तर महाभारत हीच मुळात जीवनाचा गूढ अर्थ सांगणारी एक महा-शोकांतिका आहे!

नियतीने लादलेली सतत गुंतागुंतीची आणि भावनिक कोंडीची अनुभूती जीवनभर घेतल्यावर सत्यवती खूप उदास झाली आहे. तिला कशातच काही अर्थ वाटत नाही. एकंदर जगण्यातला वैय्यर्थच तिच्या लक्षात आला आहे. मोठमोठ्या शब्दांना काही अर्थच नाही असे लक्षात येऊ लागते. कधीकधी सगळे जगणेच व्यर्थ आहे असे वाटू लागते. धर्म, न्याय, नीती ही जी जीवनमुल्ये आपल्याला शाश्वत आणि महान वाटत होती त्यांना वास्तवात काहीच अर्थ नाही. नियतीच्या क्रूर खेळापुढे या केवळ कल्पना ठरतात असे सत्यवतीला जाणवते.

'उपदेशक' या बायबलमधील एका भागात राजा शलमोनाने लिहिलेले एक वाक्य अशावेळी हमखास आठवते. जीवनातील सर्व सुखोपभोगांचे आकंठ रसपान केल्यावर आयुष्याच्या शेवटी तोही म्हणतो, "व्यर्थ हो व्यर्थ! सारे काही व्यर्थ! या जगात नवे असे काहीच नाही!" नकळत राजा शलमोनाचे हे वाक्य सत्यवतीची मन:स्थिती अगदी नेमक्या शब्दात वर्णन करणारे ठरते!

कविवर्य वसंत कानेटकरांनी हाच आशय अधिक व्यापक स्वरूपात नाटकातील एका पदात मांडला आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या मार्गदर्शनाखाली आशालता वाबगावकरांनी गायलेल्या या गाण्याची लोकप्रियता एके काळी खूप होती. आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर हे पद नेहमी ऐकायला मिळत असे. त्यात 'मत्स्यगंधा'मधील विषण्ण मन:स्थितीत असलेली सत्यवती म्हणते-

"अर्धशून्य भासे मज हा कलह जीवनाचा, धर्म, न्याय, नीती, सारा खेळ कल्पनेचा" ..आणि खरे तर हा तसा किती सार्वत्रिक अनुभव आहे! कोणत्या ना कोणत्या क्षणी, जवळजवळ प्रत्येकलाच असे वाटून गेलेले असते की आपण ज्या मूल्यांना इतकी वर्षे उरीपोटी धरून बसलो त्याला व्यावहारिक जगात काडीची किमंत नाही! या जगात आपल्याला न्याय मिळाला नाही तर निदान तो 'वरचा न्यायाधीश' आपल्याला कधीतरी न्याय देईल म्हणून वाट पाहत आपण अवघे आयुष्य घालवतो पण न्याय मिळत नाही, इतकेच काय मनाला थोडाही दिलासाही मिळत नाही! आयुष्यभर ज्याने नितीमत्तेला धरून जीवन जगले त्याची वाताहत होताना, तर ज्याने वाईट मार्गांचा बिनदिक्कतपणे वापर केला त्यांची सतत भरभराट होताना दिसत राहते.

कानेटकर हाच अनुभव चित्रमय पद्धतीने मांडतात. माणूस मोठ्या उमेदीने आयुष्याबद्दल सोज्वळ, सुंदर स्वप्ने रंगवतो आणि एखाद्या सुंदर शिल्पावर वीज कोसळावी तसे विदारक वास्तव अचानक त्याच्यासमोर येते. त्याची सगळी स्वप्ने एका झटक्यात जळून भस्मसात होतात आणि समोर उभा राहतो तो केवळ विनाश!

म्हणून सत्यवती म्हणते हा तर जगाचा नियमच दिसतोय, जे जे निर्माण झाले त्याला या जगात काही चांगले भवितव्य नाहीच! सगळ्याचा विनाशच होणार!! या विश्वात शाश्वत असे काही नाहीच का? ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे, वीज त्यावरी तो पडूनि शिल्पा कोसळावे! सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा! अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा."

त्यातही कधी असे होते की एखाद्याला वैभव प्राप्त होते, तो इतक्या सुखासमाधानात जगत असतो की अनेकांना त्याचा हेवा वाटू लागतो. 'यथार्थ जीवन म्हणजे काय ते हेच!' असे दुस-यांना वाटू लागते. मात्र जरा नशिबाचा फेरा उलटला की त्याचेही होत्याचे नव्हते होऊन बसते. मग माणसाच्या हातात उरते काय, तर जसा एखादा लाकडाचा निर्जीव ओंडका प्रवाहाबरोबर दिशाहीनपणे वाहत राहतो तसे जीवनप्रवाहात वाहत जाणे! हेच का मानवी जीवन?

दैव ज्यास लाभे त्याला लाभ वैभवाचा, दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा, वाहणे प्रवाहावरती धर्म एक साचा.. कानेटकरांनी प्रश्न उभा करून तसाच सोडून दिला आहे. अभिजात साहित्याचे तेच लक्षण असते. ते आपल्याला जीवनातील अनेक विषयांवर नव्याने विचार करायला भाग पाडते. मात्र अनेक पर्यायी शक्यता समोर ठेवूनही एखादे मत न लादता आपले स्वतंत्र मत बनवायला आपल्याला मोकळे सोडून देते.

सत्यवतीच्या आयुष्यातील शोकांतिकेच्या विचाराने काहीशा उदास करून टाकणा-या या गाण्यावर विचार करताना इंग्रजी कवी पर्सी बिश शेले यांची एक कविता आठवते. त्यांच्या "टू अ स्कायलार्क" या कवितेत दोन सुंदर ओळी होत्या.

स्कायलार्क या पक्षाला उद्देशून लिहिलेल्या कवितेत ते म्हणतात, 'आपण कधी भूतकाळाचा तर कधी भविष्याचा विचार करत असतो आणि जे नाही त्याबद्दल दु:खी होतो, कुढत बसतो. कधी आपण खळखळून हसलो तरीही त्या हास्याला वेदनेच्या एका अदृश्य उपस्थितीने घेरलेले असतेच. म्हणून तर आपली तीच गाणी मनात चिरकाल टिकतात ज्यांच्यात एखाद्या दु:खाचा विचार अलगद गुंफलेला असतो.'

"We look before and after, And pine for what is not: Our sincerest laughter With some pain is fraught; Our sweetest songs are those that tell of saddest thought."

©,श्रीनिवास बेलसरे

७२०८६३३००३

Updated : 11 Sep 2022 11:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top