Home > Entertainment > हुरहुर असते तीच उरी !

हुरहुर असते तीच उरी !

काही वर्षांपूर्वी एक उनाड दिवस हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पन्नाशीचा नायक, सिनेमामध्ये एकच गीत, तरीही हा सिनेमा आपला प्रभाव का उमटवू शकला याचे विश्लेषण केले आहे श्रीनिवास बेलसरे यांनी...

हुरहुर असते तीच उरी !
X

विजय पाटकर यांनी निर्मिलेला आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेला एक अगदी वेगळा सिनेमा आला होता २००५ साली. प्रसिद्ध लेखक श्री. शं.ना. नवरे यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात नायक होते चक्क पन्नाशीतले वाटणारे अशोक सराफ! आणि नायिका होत्या साधारण त्याच वयोगटात शोभणा-या इला भाटे! पण कसलेला अभिनय आणि अंगची गुणवत्ता असेल तर केवळ दोनच कलावंत अख्खा ३ तासाचा सिनेमा कसा उत्तमरित्या पेलून नेऊ शकतात त्याचा हा सिनेमा हा एक वस्तुपाठच म्हणावा लागेल. सिनेमात आपल्या सहज अभिनयासाठी गौरविले गेलेले सुधीर जोशी होते आणि विजू खोटेनींही भूमिका केल्या होत्या.

संगीत होते सलील कुलकर्णी यांचे तर त्यातील एकमेव गीताचे कवी होते सौमित्र. सगळी भट्टीच जमलेली! उत्तम कलानिर्मिती तर व्हायलाच हवी असा सगळा संच! चित्रपटाच्या एकमेव गाण्यात केवळ ६ ओळींच्या गझलवजा रचनेने सौमित्र यांनी चमत्कारच केला असे म्हणावे लागेल. सिनेमातील कथेला पोषक ठरणारा विचार घेऊन, त्या प्रसंगाचा आशय इतक्या कमी शब्दात मांडण्याची त्यांचे कौशल्य वेगळेच दिसले. खरे तर इथे शास्त्रीय संगीतावर बेतलेले कोणतेही गाणे चालू शकले असते. पण सौमित्र यांनी एक मनस्वी कविताच केवढातरी आशय घेऊन निवडली. काहीशी अगळीवेगळी कथा असलेल्या चित्रपटात त्यांनी नायकाची सगळी मन:स्थिती टीपकागदासारखी शोषून घेऊन अवघ्या तीन कडव्यात उतरवली.

करियरमध्ये यशस्वी असलेला अशोक सराफ एक श्रीमंत माणूस. अर्थात गरिबीतून वर आलेला. त्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो. पत्नी 'आज तरी घरी रहा' असा आग्रह करत असते. मात्र काही महत्वाच्या कामासाठी ऑफिसला जाउनच घरी येइन असा त्याचा हट्ट! तो जायला निघणार तेवढ्यात कळते की आज ड्रायव्हर आलेला नाही. म्हणून साहेब टॅक्सी मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्याच दिवशी टॅक्सी युनियनने संप पुकारलेला असतो.

कोट्याधीश माणूस सरळ मुंबईच्या रस्त्यावरून चालत निघतो. आणि त्याची अचानक भेट होते एका जुन्या मित्राशी. हा गरीब मित्र नोकरीत अगदी मामुली पगारवाढ झाल्याने खुश असतो. तो त्याला चहा पाजायला हॉटेलात नेतो. आज पगारवाढ झालेली असल्याने 'तुला मस्त स्पेशल चहा पाजतो' असे सांगताना त्याच्या निरागस चेह-यावरचा आनंद आपल्यालाही खूप अंतर्मुख करून जातो! बिचारा इतका आनंदात असतो की अशोक सराफाला तो त्याची फक्त खुशाली विचारतो, जास्त खोलात शिरत नाही.

अशोक सराफची सगळी मनस्थितीच बदलून जाते. तो आपले बेगडी जगणे एका दिवसाकरता तरी सोडून जीवनाच्या धडधडीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा म्हणून एका मोर्चात सामील होतो. घोषणा देतो फिरतो. स्वत:ला आपल्या प्रतिष्ठेच्या तुरुंगातून मस्त मोकळा करतो, गर्दीत मिसळून जातो. त्याच्या मनात विचार येतात इतकी वर्षे खो-याने पैसा मिळवून आपण वाढदिवसालाही कामाच्याच चिंतेत आहोत. मात्र भाड्याच्या १० बाय १० च्या खोलीत राहणारा, पत्नीला वर्षातून एकदोन वेळाच भेटू शकणारा, कामगार मित्र थोड्याशा पगारवाढीतून तिला काहीतरी भेट देवू शकेन या विचाराने हरखून जातोय! प्रचंड आत्मपरीक्षण सुरु होते. तो स्वत:ला मुक्त करून टाकतो! आणि त्यातूनच तो दिवस बनतो "एक उनाड दिवस."

सलील कुलकर्णी यांनी संगीत नाटकात गाजलेल्या कु. फैयाज या अभिनेत्रीला डोळ्यासमोर ठेवून इतके सुंदर संगीत दिले होते की ज्याचे नाव ते! फैयाज आकाशवाणीवर भावगीते गाणा-या जुन्या गायिका असतात. आकाशवाणीचे काम बंद. घरी होणा-या मैफिलीही संपलेल्या! या एकाकी गायिकेला कुठेच काही वाव नसतो. व्यक्तिगत पातळीवर होणारी कलेची साधना तेवढी सुरु! पण कोणत्याही कलाकाराला जे श्रोत्यांच्या प्रतिसादाचे जे टॉनिक गरजेचे असते ते मिळणे कधीचे बंद झालेले! त्यांना ओळखून, त्यांचा घरी जावून अशोक सराफ गाण्याचा आग्रह धरतो. त्यांच्यातला आतला कलाकार अगदी उदास आणि निराश असतो तरीही त्या गायचे मान्य करतात. इथे आपल्याला मेकअपमनलाही दाद द्यावी लागेल की त्याने या सर्व मुळात अमूर्त गोष्टी नुसत्या मेकअपमधून प्रस्थापित केल्या होत्या. या कलावतीचे विस्कटलेपण, निराशा, तरीही कलेबद्दल असलेले निस्सीम प्रेम आपल्याला फैयाज यांच्या पहिल्याच दर्शनात जाणवते. आपण हिंदीतल्या लहानातल्या लहान गोष्टीचे खूप कौतिक करतो. पण तेच मराठीत कुणी करून दाखवले तर त्याची दखलही घेत नाही. शुभा जोशी यांनी गाणे असे काही गायलेय की फैयाजच गात आहेत असे वाटत राहते.

अगदी साधे शब्द येतात आणि आपण गाण्याशी समरस होऊ लागतो-

हूर हूर असते तीच उरी दिवस बरा की रात्र बरी..

सगळे करियर संपलेली, जुन्या वैभवाच्या आठवणीत रमणारी, ही उदास गायिका जणू स्वत:लाच विचारते आहे, सगळ्या वास्तवाची जाणीव कारण देणारा भगभगीत प्रकाशाचा दिवस बरा, की सुखी गतकाळाची स्वप्ने दाखवणारी रात्र बरी?

इकडे अशोक सराफच्याही मनात तेच द्वंद्व उतरते! सर्व भौतिक सुखे पायाशी आणणारा, काहीसा नैतिक मुल्ये सोडून आडवळणाने जाणारा, यश देतानाच सगळे समाधान हिरावून घेणारा रस्ता बरा की थोडक्यातच गोडी सांगणारा सरळ रस्ता बरा?

कुठला रस्ता सांग खरा, वळणाचा की सरळ बरा

मैफल उठली आहे, दालन रिते झाले आहे, जीवनगान विराम पावले आहे. आता केवळ मृत्यूची भेट शिल्लक आहे. मग सुटकेचा आनंद मानायचा की अंताचे दु:ख करायचे?

जगणे मरणे काय बरे सुख खरे की दुःख खरे..

एका इतक्या छोट्या रचनेत गुंफलेला केवढा आशय, केवढा अवकाश! असे कवी, संगीतकार, गायक आहेत तोवर मराठीची मैफल अशीच गाजत राहणार आहे याचा आनंदही नॉस्टॅल्जिकच म्हणावा लागेल असे हे दिवस.

*

© श्रीनिवास बेलसरे.

Updated : 17 Sep 2022 12:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top