कोकण, दशावतार आणि ओमप्रकाश चव्हाण

Update: 2017-04-22 11:31 GMT

लहानपणी परिक्षा झाल्या झाल्या पाय आपोआप गावाकडे वळायचे... कोकणच्या सौंदर्याची जादूच असेल ती जी आपल्याला तिच्या कवेत खेचून घेते. माझं ही गाव कोकणातच... वेंगुर्ला, उभादांडा...आंबा, फणस, काजू, जांभळं, करवंद, शहाळी ( नारळ ) आणि हां कोकणातला मेवा खायायला कोणाला नाही आवडणार.गावी गेलो की कुणाची ना कुणाची सायकल घेऊन गावभर हिंडायचं... कोणाची जांभळ काढा... कोणाचे आंबे चोरा... ( चोरून आंबे खाण्याची मज्जा काय औरच) मग संध्याकाळ झाली की समुद्राच्या लाटेची गाज मला त्याच्याकडे बोलवून घ्यायची... अनवाणी पायाने वाळू तुडवत तुडवत समुद्र किनारा गाठायचा... चालता चालता मध्येच वाळूत स्वतःच नाव एखाद्या काठीने कोरायचं...मग पुन्हा चालायचं... नजरेसमोर समुद्र दिसला की धावत जाऊन त्याला मिठी मारायची जणू तो काही आपला जुना मित्रच... तासान तास त्याच्या लाटांसोबत मनसोक्त खेळायचं... वाळूचा किल्ला बांधायचा... कुठे किनाऱ्यावर रेंगणारे हातालाही न मिळणारे कुर्ले ( खेकडे ) पकडण्याचा प्रयत्न करायचा...सूर्य समुद्रात बुडायला लागला की पुन्हा पाय माघारी फिरायचे... मग विहिरवर थंडगार पाण्याने आंघोळ करायची... कपडे खराब झालेले पाहून आजीच्या प्रेमळ शिव्या ऐकायचो..

"मायझया रवना... कपडे कोन तुझो बापूस धुतलो" मग चहापान झाल्यावर निवांत घरच्यांशी गजाली ( गप्पा ) मारत बसायच्या.

रात्री आजी जेवण करत असताना तिची परवानगी नसतानाही चुलीजवळ लुडबुड करायचो... कुठे माश्यांना मीठ घाल... चुलीत लाकड घाल आणि मासे तव्यावर परतायचा बालहट्टही त्यावेळी माझा असायचा. चुलीवरील रुचकर मासे व आजीच्या हातची स्पेशल मच्छी कडी खाऊन निजूची ( झोपायची ) तयारी करायची. पहाटे न चुकता आजीचा कोंबडा आरवून उठवून घालायचा...मग आजीच्या सगळ्या कोंबड्या सोडून द्यायचो... मग पुन्हा आजी करवतायची (ओरडायची) "एका एकाक सोडूचा व्हता ना... कित्याक सगळ्यांका सोडवून घातलस"ही एकेकाला सोडवून घालायची आजीची शाळा आजतागायत मला कळली नाहीय, पण दरवर्षी असाच काहीसा बेत मी गावी गेल्यावर रंगायचा...

गावी सुट्टीत जायचो आणि अजूनही जाऊन येऊन असतो. गावातील माणसं, संस्कृती, प्रथा, परंपरा जाणून घेण्यात माझी नेहमी उत्सुकता असते... गावच्या या आठवणी एका आठवणी शिवाय अपूर्ण आहे... ती म्हणजे कोकणातील "दशावतार" नाट्य परंपरा...लहानपणापासूनच अगदी जवळून या दशावतार नाटकांना अनुभवलं... मामा मोचेमाडकर, बाबी कलींगण, खानोलकर. पार्सेकर या नाट्यमंडळीची नाटकं गावी उन्हाळी सुट्टीत आवर्जून पाहिली.

तर अशीच एक आठवण या दशावातर नाटकाला जोडून आहे... आमच्या गावात श्री देव हेळेकर मंदिराच्या आवारात मामा मोचेमाडकरांच नाटक रंगणार होत...शालेय जीवनापासूनच नाटकाची आवड असल्याने १० वाजता सुरु होणाऱ्या नाटकाला १ तासं आधीच जाऊन हजेरी लावायचो. कारण कलाकारांची रंगरंगोटी बघण्यात मला खूप रस असायचा...स्वतःच स्वतःचे रंगभूषाकार, वेशभूषाकार...समोर स्वतःची आभूषणे. रंगभूषेची साहित्य असलेली पेटी... या सगळ्याच गोष्टी पाहून मी भारावून जायचो...

तर एकदा झाले असे की, मी आणि माझे चुलत भाऊ आणि मुंबईहून सुट्टीला आलेले माझ्यासारखेच वाडीतील काही मित्र नाटकाला बसलो..."तुझ्या कृपेने दिन उगवे हा" या नांदीने नाटकाची सुरवात झाली...( नाटकाच नाव आता आठवत नाहीय) नाटक सुरु झाल्यावर काहीवेळाने एका स्त्री पात्राने रंगमंचावर प्रवेश केला...आपल्या मोहक आणि गोड संवादाने तिने साऱ्या प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. या दरम्यान नाट्यपद ही तिने सादर केल. नाटक पुढे पुढे सरकत मध्यंतरा पर्यंत पोहचलं...मग या दरम्यान आमच्याही गप्पा रंगल्या आणि त्यातून जेव्हा मी त्यांना म्हंटल की स्त्री भूमिका साकारणाऱ्या कलाकारात खरा पुरुष कलाकार दडलाय...तर माझ्या या बोलण्यावर माझे भाऊ आणि मित्र खिदीखिदी हसू लागले...त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता..मग त्यांना मंदिरामागे जिथे त्यांचा मेकअप रूम होता तिथे त्यांना घेऊन गेलो व त्यांनचं नॉर्मल बोलणं ऐकवलं, तेव्हा कुठे त्यांना खात्री पटली की या स्त्री वेश घेतलेल्या कलाकारामागे एक पुरुष कलाकार आहे तो... आणि ते कलाकार दुसरे तिसरे कोणी नाही तर कोकणातील बालगंधर्व म्हणून ज्यांना संबोधले जाते ते कोकणरत्न दस्तुर्खुद "ओमप्रकाश चव्हाण" होते.

अगदी लहानपणापासून ज्यांची नाटकं, ज्यांचा अभिनय जवळून पहिला त्याच माणसासोबत नंतर बराच वेळ गप्पा मारण्याचं भाग्य मला मिळालं... ज्यांनी आपल्या आयुष्याची ३० वर्षे या दशावतार रंगभूमीसाठी अर्पण केली आहेत. ज्यांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पसरली आहे. अशा या ग्रेट कलाकारासोबत काही क्षण व त्यांच्या काही आठवणी आणि अनुभव ऐकायला मिळाले. नुकतेच ते हृदयविकाराच्या धक्क्यातून सावरलेत. गोव्यात चालू प्रयोगा दरम्यानच त्यांना हा धक्का आला होता. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या मदतीला धावून आल. एका खऱ्या कलाकाराला रसिक प्रेक्षकांची साथ मिळतेय याशिवाय आणखीन काय हव असत एका कलाकाराला? परंतु मित्रहो अद्यापही ते आर्थिक परिस्थितून सावरले नाहीयत, कुणा इच्छुकाला आर्थिक मदत करावयची असल्यास कृपया खाली दिलेल्या त्यांच्या नंबरवर संपर्क साधावा!

ओमप्रकाश चव्हाण : 09421191599

रोहन पेडणेकर : 9892435889

( लेखक रोहन पेडणेकर स्वतः एक कलाकार आहेत. )

Similar News