Exclusive : विडी कार्ड असेल तरच लग्न

Update: 2019-04-27 11:14 GMT

कुठल्याही लग्नासाठी वधु-वर एकमेकांना सर्वार्थानं अनुकूल असणं अपेक्षित असतं. मात्र, सोलापूरमध्ये विडी कामगारांच्या मुलींसाठी असे हे निकष कदाचित नसावेत. बदलत्या काळात या विडी कामगारांचे आर्थिक, सामाजिक प्रश्नही बदलत आहेत. विडी कामगारांच्या मुलींच्या लग्नाबाबत मॅक्स महाराष्ट्रचा हा ग्राऊंड रिपोर्ट.

लहानपणीच मुलींच्या हातात विडी

सोलापूरी चादरी जशा प्रसिद्ध आहेत तशीच विडी कामगारांचं सोलापूर अशीही ओळख सोलापूरची आहे. विडी कामगारांच्या वस्तीत तशा समस्या अनेक आहेत. पण या कामगारांच्या मुलींच्या लग्नाची समस्याचं थोडी वेगळी आहे. कामगारांच्या या मुली अगदी लहान वयातच विडी वळण्याच्या कामाला सुरूवात करतात. त्यातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो. लहान वयात हातात आलेली विडी या मुलींच्या हातात लग्नानंतरही कायम राहते.

विडी कार्डवरच मुलींचं लग्न अवलंबून

मुलींनीही विडी वळवायचं काम करावं अशी कामगारांची आणि त्यांच्या मुलींचीही इच्छा नसते. मात्र, दुर्देवानं या मुलींकडे विडी कार्ड नसेल तर त्यांना लग्नासाठी स्थळच येत नाहीत, अशी खंत मल्लेषम करपुरी यांनी व्यक्त केलीय. त्यामुळं कामगारांच्या मुली या आठवी किंवा दहावीपर्यंत शिक्षण घेतात. एकादचं विडी कार्ड या मुलींना मिळालं की त्यांच्यासाठी स्थळ शोधायला सुरूवात होते. बऱ्याचदा या मुलींची लग्न अगदी लहान वयात (म्हणजे १८ वर्षे पुर्ण होण्याआधी) लावून दिली जातात. विडी कार्ड असेल तर रोजगाराची हमी मिळते म्हणून या मुलींसोबत लग्न करण्याचा निर्णय वर पक्षाकडून घेतला जातो.

एका तासाला एक भाकर

सत्तरीच्या जवळपास पोहोचलेल्या अंबुबाई वासु यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रनं संवाद साधला. अंबुबाई आता थोड्या रिलॅक्स वाटत होत्या. कारण वयाच्या ८ व्या वर्षांपासून अंबुबाईंनी विड्याच वळलेल्या आहेत. मात्र, आता मुलं, सुना, नातवंड हे कमावती झाल्यानं त्या निवांत आहेत. अथक व अव्याहतपणे अंबुबाईंनी विडी वळण्याचं काम केलं. पुर्वी अंबुबाईंना एक तास विडी वळण्याचं काम केल्यावर एक भाकरी मिळायची. अशाप्रकारे अंबुबाईंचा विडी वळण्याचा प्रवास सुरू झाला. विडी उद्योगातील अनेक स्थित्यंतर त्यांनी अनुभवलीय. इतकी वर्षे विडी वळण्याचं काम केल्यानं अंबुबाईंच्या हाताच्या बोटांचे ठसेच उमटत नाहीत. त्यामुळं बँकेत पेन्शनसाठी त्यांना सतत चकरा माराव्या लागतात. त्यात शारीरीक कष्ट आणि मनस्ताप होतो, अशी खंत अंबुबाईंनी मॅक्स महाराष्ट्रजवळ व्यक्त केलीय. ९०० रूपये पेन्शनसाठी अंबुबाईंना या वयात हा त्रास सहन करावा लागतोय. विडी कामगारांना दर आठवड्याला मिळणारा पगार हा आता दर महिन्याला दिला जातो. त्यामुळं विडी कामगारांचं अर्थकारण बिघडतं, असं अंबुबाई सांगतात. विडी वळण्याचं काम हे बसून करावं लागतं. त्यामुळं हातं, बोटं, कंबर व पायदुखीचा त्रास या विडी कामगार महिलांना होतो. सतत विडी आणि तंबाखुच्या सहवासात असल्यानं त्यांना कॅन्सर होतो. हे सर्व सहन करून नाईलाज म्हणून महिला कामगार विडी वळतात.

मोबदलाही पुरेसा मिळत नाही

विडी कामगार महिलांच्या समस्यांचा हा धागा इथपर्यंतच थांबत नाही. विडी वळणाऱ्या महिलांच्या कमाईवरच इथल्या बहुतांश कुटुंबांचा कारभार चालतो. या घरातील पुरूष व्यसनांच्या आहारी जातात. घरातील पुरूष किंवा मुलांना मात्र विडी वळण्याचं काम दिलं जात नाही. एक हजार विड्या वळवल्यानंतर किमान वेतन म्हणून या महिलांना २५३ रूपये देण्याचा शासन आदेश आहे. मात्र, प्रत्यक्षात या महिलांना फक्त १५० रूपयेच दिले जातात, असं अंबुबाईंनी सांगितलं. सलग १२-१२ तास बसून काम केल्यानं उतार वयातही या महिलांना आरोग्याच्या अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. यासर्व त्रासातून सुटका व्हावी म्हणून विडी कामगारांच्या मुलींनी शिक्षण घेऊन नोकरी करावी, अशी अपेक्षा अंबुबाईंनी व्यक्त केली.

इथल्या मुलींचं बालपण विडी वळतंय...

विडी कामगारांच्या या वस्त्यांमधल्या मुलींचं बालपण विडी वळत असल्याचं साधारण चित्र आहे. शिक्षण घेण्याची इच्छा आहे, ती पूर्ण कऱण्यासाठी विड्याच वळाव्या लागणार असल्याचं दहा वर्षांच्या आकांक्षा बंडा हिनं सांगितलं. तीन बहिणी एक भाऊ आणि आई-वडील असं आकांक्षाचं कुटुंब आहे. त्यात वडील काहीच कामधंदा करत नाही. त्यामुळं कुटुंबाला हातभार म्हणून विड्या वळाव्याचं लागतील, असं सांगणाऱ्या आकांक्षाला शिक्षण घेऊन फॅशन डिझायनर व्हायचंय.

आधुनिकीकरणाच्या काळात विडी उद्योगाला आधीच घरघर लागलीय. त्याचा परिणाम विड्या वळणाऱ्या महिला कामगारांच्या आय़ुष्यावरही होतोय. पुरूषप्रधान व्यवस्थेत अजूनही महिला दुय्यम स्थानीच आहेत. यशाची अनेक शिखर पादाक्रांत करणाऱ्या महिल्या पाहिल्यावर गर्व वाटतो. मात्र, सोलापूरच्या विडी कामगार महिलांच्या मुलींची लग्न आजही विडी कार्ड असेल तरच होतात, याची भारतीय म्हणून लाजही वाटते.

 

https://youtu.be/P0iMgZ2enr4

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Similar News