अशोक चव्हाणांना शिवधनुष्य पेलवेल का?

Update: 2019-02-23 08:01 GMT

शिवसेना- भाजपाची युती झाल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तयारी संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. राज्यात काँग्रेस मोठा भाऊ असल्यामुळे साहजिकच काँग्रेसच्या नेतृत्वाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सध्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडे राज्यातल्या काँग्रेसची धुरा आहे. अशोक चव्हाणांना हे शिवधनुष्य पेलवेल का, मराठवाड्याचे नेते या टॅग च्या बाहेर त्यांना येता येईल का.. राजकीय विश्लेषक आनंद मंगनाळे यांचा अशोक चव्हाणांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेणारा हा लेख..

शिवसेना-भाजपाची तयारी पूर्ण झालीय. युती झालीय, जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. दुसरी कडे काँग्रेस आघाडी मध्येच खूप चढउतार पाहायला मिळत आहेत. काँग्रेसची आघाडी ज्या राष्ट्रवादी सोबत आहे, तो राष्ट्रवादी पक्ष एकाच वेळी काँग्रेससोबत आणि तिसऱ्या आघाडी सोबत दोस्ती ठेऊन आहे. अशा वेळी काँग्रेसला आक्रामक पणे आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे आवश्यक आहे. अशोक चव्हाणांवर मोठी जबाबदारी आलीय, मात्र पक्षातील प्रमुख नेते आणि अशोक चव्हाण यांच्यातच समन्वय दिसत नाहीत.

पुढचा मुख्यमंत्री मीच, अशाच अविर्भावात अशोक चव्हाण वावरताना दिसतायत. महत्त्वाकांक्षा ठेवायला हरकत नाही.परंतु त्यासाठी पाय जमिनीवर असले पाहिजेत. नांदेड जिल्ह्यातही त्यांची मुळं मजबूत नाहीत. दोन वेळा मुख्यमंत्री पद भुषवूनही , मराठवाड्याचे नेते एवढीही ओळख त्यांना निर्माण करता आलेली नाही, असं काँग्रेसच्या एका राष्ट्रीय नेत्यांचं त्यांच्या बाबतीतलं आकलन आहे.

त्यांच्यावर लागलेल्या आदर्शच्या आरोपांनंतर ते बॅकफूटवर गेलेयत ते अजूनही सावरलेले नाहीत. त्याचमुळे सरकारवर ते कधी पूर्ण शक्तीनिशी तुटून पडलेले नाहीत. त्यांचं वैयक्तिक नेतृत्वही मराठवाड्यात अजून मान्यता पावलेलं नाही. मधल्या काळात झालेली नांदेडलगतची लोहा नगरपरिषदही यांना जिंकता आली नाही, चव्हाणांची जी काही ताकद आहेत ती नांदेड शहरात...तरीही एखाद्या किंगमेकर सारखं त्यांचं बोलणं आहे. हा आत्मविश्वास ओढून आणलेला आहे, त्याचा पक्षामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी काहीच उपयोग झालेला नाही.

बदलत्या काळात मित्र आणि शत्रू ही बदलत चालले आहेत. अशावेळी नवीन मित्र जोडण्यात त्यांची मुत्सद्देगीरीही कमी पडताना दिसत आहे. मनसेने उघडपणे मोदींना विरोध करायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही मनसेशी हातमिळवणीची संधी साधलीय. अशोक चव्हाणांना मात्र यात भूमिका घेता आली नाही. मनसेशी वैचारिक मतभेद असल्याने राज ठाकरे यांच्याशी युती होऊ शकत नाही,असं जाहीर करून अशोक चव्हाणांनी बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखायलाच नकार दिला आहे. आजची महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची स्थिती चांगली नाही. भाजपा-सेनेचा जो जो विरोधक तो आपला मित्र, ही भूमिका घेऊनच पक्षाला चालावं लागेल. सगळ्या विरोधकांना सोबत घेऊन चालावं लागेल. अन्यथा पराभवापासून काँग्रेसला कोणीच वाचवू शकणार नाही.

महाराष्ट्रातील जनतेत नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. भाजपाच्या उद्दामपणाला, हुकूमशाही वृत्तीला जनता कंटाळली आहे. सगळ्यांचं जगणंच या सरकारनं कठीण केलयं. लोक बदलाच्या भूमिकेत आहेत. याचा अर्थ जनतेच्या मनात काँग्रेस, राष्ट्रवादीबद्दल प्रेम आहे, असं नाही. त्यातच पुलवामा हल्ल्याचा राजकारणासाठी वापर करत भाजपा राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीच्या मुद्द्यावर निवडणूक नेऊ पाहतेय. अशा बदललेल्या वातावरणात मोदी 2014 एवढी नाही, पण ओसरलेली लाट सावरण्याचा प्रयत्न करू शकतात. आज मोदींची लाट नसली तरी त्यांचा तरंग ही काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करू शकतो.

अशोक चव्हाणांना महाराष्ट्रात राजकीय शहाणपण दाखवावं लागेल. प्रकाश आंबेडकरांशीही ते जुळवून घेऊ शकलेले नाहीत, राज ठाकरेंना ते सोबत घेऊ इच्छित नाहीत, पक्षातले नेते अशोक चव्हाणांना मानायला तयार नाहीत, दिल्लीचीही त्यांच्यावर फार मर्जी नाही अशा परिस्थितीत अशोक चव्हाणांचा इगो त्यांच्या सोबतच पक्षालाही रसातळाला नेऊ शकतो. अशा वेळी पक्षाला नवा चेहरा शोधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Similar News