महाराष्ट्रात उन्हाळ्यातच पावसाला सुरुवात

Update: 2025-05-26 11:17 GMT

नैसर्गिक चक्राप्रमाणे राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाला सुरुवात होते. मात्र, यंदा सुमारे १५ दिवस आधीच राज्यात मान्सून दाखल झालाय. राज्यभरात मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावलीय. या अवकाळी पावसानं शेतीसह मालमत्तांचंही नुकसान केलंय. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याचं जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून अनेक ठिकाणी प्रत्यक्ष बचावकार्याला सुरुवातही झालीय. दरवर्षी ६,७ किंवा ८ जूनला राज्यात मान्सूनचं आगमन होतं. यावर्षी मात्र मान्सूनचं आगमन अपेक्षेपेक्षा लवकर झाल्याचं पुण्याच्या हवामान विभागाचे अधिकारी एस.डी.सानप यांनी माध्यमांना सांगितलं.

लवकर आलेल्या मान्सूनने प्रशासनाची धावपळ उडाली असून अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे. यावर्षी राज्यात पावसाचं प्रमाण कसं असणार याबाबत आधीच हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला होता. यंदा देशात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण 107 टक्क्यांच्या आसपास राहू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. बारामती व दौंड परिसरात जोरदार पाऊस झाला, बारामतीमध्ये रविवारी सकाळच्या २४ तासांमध्ये १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बारामती आणि फलटणमध्ये अनेक ओढ्या नाल्यांना पूर आले. बारामतीमध्ये अनेक घरांमध्ये पाणीही शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची दोन पथके रविवारी बारामतीला रवाना झाली.

गेल्या तीन दिवसापूर्वी केरळ राज्यात मान्सून दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचं देशात मान्सून कधी दाखल होणार याकडे लक्ष लागून असताना केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं. यानंतर तळ कोकणासह मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे. अशातच राज्यात येत्या चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबईमध्ये भारतीय हवामान खात्याकडून हा इशारा देण्यात येणार आहे. तर मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली असताना पुणे हवामान खात्याचे हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांनी महाराष्ट्रातील मान्सून यासंदर्भात भाष्य केले आहे. ‘काल देवगडपर्यंत मान्सूनने प्रवास केला. तर आज मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र येत्या २४ तासात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.’, असं सानप म्हणाले.

मुंबईत सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाची सर्वाधिक नोंद झालेली ठिकाण :

नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र: २५२ मिमी

ए विभाग कार्यालय: २१६ मिमी

महानगरपालिका मुख्यालय: २१४ मिमी

कुलाबा उदंचन केंद्र: २०७ मिमी

नेत्र रुग्णालय, दोन टाकी: २०२ मिमी

सी विभाग कार्यालय (चंदनवाडी, मरीन लाइन्स): १८० मिमी

मेमनवाडा अग्निशमन केंद्र: १८३ मिमी

ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी: १७१ मिमी

नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ: १०३ मिमी

सुपारी टँक, वांद्रे: १०१ मिमी

जिल्हाधिकारी वसाहत, चेंबूर: ८२ मिमी

एल विभाग कार्यालय, कुर्ला: ७६ मिमी

पुण्यातही तुफान पाऊस ( सकाळी १० वाजेपर्यंत पावसाची आकडेवारी)

कुरवंडे: १८४.५ मिमी

दौंड: ११४ मिमी

मालिन: ९५ मिमी

लवासा: ८३ मिमी

निमगिरी: ६७ मिमी

बल्लाळवाडी: ५६ मिमी

धामधरे: ५४.५ मिमी

वडगावशेरी: ५४ मिमी

बारामती: ५३ मिमी

भोर: ३९.५ मिमी

हडपसर: ३८ मिमी

राजगुरुनगर, मगरपट्टा: ३७.५ मिमी

गिरीवन: ३७ मिमी

नारायणगाव: ३६.५ मिमी

तळेगाव: ३३ मिमी

डुडुळगाव: २५.५ मिमी

शिवाजीनगर: २३ मिमी

पाषाण: २१ मिमी

के.पी.: ७.५ मिमी



 



कोकण, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पुणे वेधशाळेकडून करण्यात आले आहे.


- राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला.

- बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत.

- इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.

- फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.

- सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे.

- रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.

- मुंबईत 24 तासात 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत.

- मुंबईत पुढील 24 तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Tags: