ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोनावरील लस मानवी चाचणीत यशस्वी

Update: 2020-07-21 02:20 GMT

ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीचे निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आल्याचे द लॅन्सेट या नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या लसीचा ज्यांच्यावर प्रयोग करण्यात आला होता त्यांची प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

तसेच या लसीची रिएक्शन अत्यंत सौम्य स्वरुपात आली असून त्य़ाचा कोणताही परिणाम शरीरारवर होत नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. 1077 लोकांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला होता. या लसीमुळे त्यांच्या शरीरात कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडीज आणि पांढऱ्या पेशींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शऩास आले आहे.

एप्रिलमध्ये या लसीच्या चाचणीला सुरूवात करण्यात आली होती. ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार करण्यात आलेली ही लस एस्ट्राझेन्का कंपनीच्या सहकार्याने तयार करण्यात येत आहे. या लसीची निर्मिती ही कंपनी करणार असल्याने ब्रिटनच्या सरकारने 10 कोटी लसींचा करार या कंपनीशी केला आहे. तर दुसरीकडे आणखी दोन कंपन्यांच्या लसींची चाचणी सकारात्मक आल्याने सरकारने त्या कंपन्यांकडूनही 9 कोटी लसींसाठी करार केला आहे.

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मंचाऱ्यांना सगळ्यात आधी ही लस दिली जाणार आहे. ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या लसीचा अहवाल द लॅन्सेटमध्ये आल्याने या आता लवकरच ही लस उपलब्ध होऊ शकेल यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. पण ही लस नेमकी कधी उपलब्ध होईल ते असून स्पष्ट करण्यात आलेले नाही. तोपर्यंत कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.

Similar News