या कारणांमुळे दिल्लीत झाली ‘आप’ची हॅट्ट्रीक

Update: 2020-02-11 13:05 GMT

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

भाजपने दिल्ली जिंकण्यासाठी सर्व शक्ती झोकुन प्रचार केला. मात्र मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार शेवटपर्यंत पक्षाने घोषित केला नाही. त्यामुळे केजरीवाल यांच्याविरुध्दचा चेहरा कोण या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर भाजपकडे नव्हतं. केजरीवाल यांच्या ताकदीचा दुसरा चेहरा भाजपकडे नव्हता.

त्यामुळे दिल्लीत ‘टिना’ (There is no alternative) फॅक्टर जोरात चालला. या मुद्यावर केजरीवाल यांनी भाजपला घेरलं, प्रत्येक पत्रकार परिषदेत भाजपला मुख्यमंत्रीदाचा उमेदवार कोण हा प्रश्न ते विचारायचे. दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्या चेहऱ्याला आपली पसंती दिली.

राष्ट्रवादाच्या मुद्यात केजरीवाल अडकले नाही

जेएनयू, शाहिन बाग, पाकिस्तान या मुद्द्यावरुन केजरीवाल यांना घेरण्याचा भाजपने सातत्यानं प्रयत्न केला. मात्र केजरीवाल यांनी हे मुद्दे मोठ्या शिताफीने टाळले. जेएनयूमध्ये हल्ला झाल्यानंतरही केजरीवाल विद्यार्थ्यांना भेटायले गेले नाहीत. सुधारीत नागरिकत्व कायद्यावरही केजरीवाल यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. शाहिन बागसंदर्भात केजरीवाल यांच्यावर भाजपने आऱोप लावले.

मात्र त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी केला नाही. केजरीवाल ‘आप’ सरकारच्या कामांवर बोलत राहीले. भाजपने केजरीवाल हे दहशतवादी असल्याचा आरोप लावला. मात्र मी दहशतवादी असल्यास दिल्लीकरांनी दहशतवाद्याला मत देवू नये अशी अतिशय संयमी प्रतिक्रीया त्यांनी दिली. प्रचाराच्या या काळात केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर एकही आरोप केला नाही.

‘आप’ची कामे

गेल्या काही वर्षापासून अरविंद केजरीवाल सरकारने केंद्र सरकारसोबत संघर्षाची भूमिका कमी केली आणि दिल्लीकरांच्या प्रश्नांवर फोकस केला. या काळात दिल्ली सरकारने सरकारी शाळांमध्ये सुधारणा केल्या. मोहल्ला क्लिनीकच्या माध्यमातून आरोग्य सेवा सशक्त केल्या.

दिल्लीकरांना मोफत पाणी दिलं. भरमसाठ येणाऱ्या विजबिलात कपात केली. सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास देवून केजरीवाल यांनी दिल्लीच्या महिलांची मनं जिंकली. सरकारच्या या मूलभूत कामांमुळे दिल्लीची जनता केजरीवाल यांच्यावर खूष होती.गरिबांसाठी सरकार काही करतय, ही भावना दिल्लीकरांमध्ये निर्माण झाली.

सकारात्मक प्रचार

‘आप’ने संपूर्ण प्रचारादरम्यान अतिशय संयमी भाषा वापरली. कपिल मिश्रा, मनोज तिवारी, योगी आदित्यनाथ, परवेश वर्मा यांच्यासारख्या भाजपच्या वाचाळ आणि आगखाऊ भाषणं करणाऱ्या नेत्यांना कुठलंही प्रत्युत्तर दिलं गेलं नाही. त्यामुळे या काळात आपचा फोकस हलला नाही.

अगदी शेवटच्या टप्यात हनुमानाच्या दर्शनावरुनही केजरीवाल यांच्यावर टीका केली गेली. मात्र त्याला कुठलंही उत्तर देण्याचं ‘आप’ने टाळलं. विजयानंतर अरविंद केजरीवाल यांचं भाषण ऐकल्यावर त्यांनी किती संयमाने भाषण केलं, हे आपल्याला लक्षात येईल.

काँग्रेस फॅक्टर

काँग्रेसने या निवडणुका न जिंकण्यासाठीच लढवल्या होत्या, असा संशय निकालानंतर काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानावरुन सहज काढता येतो. दिल्लीमध्ये तीनवेळा सत्तेवर असलेल्या काँग्रेसने प्रचारात अधिक जोर लावला असता तर मतांची फाटाफूट झाली असती आणि त्याचा फायदा कदाचित भाजपला होण्याची शक्यता जास्त होती.

त्यामुळे काँग्रेसने केजरीवाल यांच्याविरुध्द आक्रमक आणि सक्रीय प्रचार केला नाही. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीत केवळ दोन सभा घेतल्या. काँग्रेसचे महत्वाचे नेते प्रचारातही फिरकले नाहीत. काँग्रेसच्या या स्ट्रॅटेजीचा फायदा ‘आप’ला फायदा झाला.

भाजपमध्ये अंतर्गत कलह

दिल्लीत केवळ तीन महिन्यात प्रचार यंत्रणेतून आपला टक्कर देणे सोपं नव्हतं. भाजप नेत्याच्या या विधानावरुन तुम्हाला भाजपची खरी परिस्थिती लक्षात येईल. १९९६ मध्ये दिल्लीच्या राजकारणातून बाजूल्या पडल्यानंतर भाजपकडे दिल्ली सांभाळणाऱ्या नेत्यांची वानवा आहे. भाजपने मनोज तिवारी पार्ट टाईम राजकारणी नेत्याला प्रदेशाध्यक्ष केलं. स्वच्छ प्रतिमेच्या डॉ.हर्षवर्धन यांना दिल्लीच्या राजकारणातून बाजूला सारलं.

दिल्लीचं प्रभारीपद आयुष्यात एकही निवडणूक जिंकू न शकलेल्या प्रकाश जावडेकर यांच्या हाती देण्यात आलं. परवेश शर्मासारख्या नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपवली गेली. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार तर जाहिर केला नाही. मात्र दिल्ली भाजपचं नेतृत्व नेमक कुणाकडे आहे,याचा थांगपत्ता शेवटपर्यंत लागला नाही.

 

 

Similar News