जगणं 'अनलॉक' करणारा स्वामी

धर्मावर मक्ता सांगणा-या दांभिकांचा स्वामी अग्निवेश यांच्यावर का राग होता? धर्ममार्तंडांना स्वामींची भीती का वाटत होती. कोण होते हे धर्म मार्तंड? लाखो लोकांचं जगणं ‘अनलॉक’ करणाऱ्या स्वामी अग्निवेश याचं नुकतंच निधन झालं? त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेखक श्रीरंजन आवटे यांचा लेख

Update: 2020-09-14 07:09 GMT

१९८० साली हिरा देवी बाईंनी ठेकेदाराकडून २० रुपयांचं कर्ज घेतलं. खाणकामावर काम करुन आपल्या पोरांना कसंबसं शाळेत पाठवलं. खाणकामात त्या सतत काम करत होत्या. पण कितीही पैसे दिले तरी अजून कर्ज पूर्णपणे चुकतं झालं नाही, असं ठेकेदार सांगायचा. एके दिवशी हिरा देवी बाईंना एक स्वामी भेटले आणि त्यांच्या सारा प्रकार लक्षात आला. या बाईंचा वेठबिगाराप्रमाणे होत असलेला वापर लक्षात येताच. त्यांनी या विरोधात आंदोलन उभारलं. त्या बाईंसह लाखो लोकांचं जगणं कसं सरंजामी आणि भांडवली ‘लॉकडाउन’ मध्ये अडकलं आहे, याची जाणीव त्यांना झाली. या सा-यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि हक्कासाठी बंधु मुक्ती मोर्चाची स्थापनाच या स्वामींनी केली.

हा माणूस म्हणजे स्वामी अग्निवेश

कलकत्त्याच्या सेंट झेवियर्समध्ये त्यानं लॉ शिकवलं. इथेच तर आर्य समाजाच्या विचारांनी तो प्रेरित झाला. १९७० साली आर्य सभेची स्थापना त्यानं केली. हरियाणामध्ये आर्य सभेकडून निवडणूक लढवून हा माणूस आमदार झाला. पुढे हरियाणाचा शिक्षणमंत्री झाला. मात्र, आपल्याच सरकारच्या पोलिसांनी आंदोलकांची केलेली पिळवणूक पाहून हा माणूस व्यथित झाला आणि त्यानं शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला.

पुढे बंधु मुक्ती मोर्चाची स्थापना करुन अक्षरशः लाखो लोकांचं जगणं त्यानं ‘अनलॉक’ केलं. यात सुमारे २६ हजार लहान मुलांना बालमजूरीतून सोडवण्याचं मोठं काम या माणसानं केलं. बंधु मुक्ती मोर्चाच्या जनहित याचिकेवर कोर्टाने जे निकालपत्र दिलं होतं ते मानवी हक्कांच्या लढ्याच्या प्रवासात निर्णायक ठरलं.

२००४ साली ‘राइट लाइवलीहूड अवार्ड’ हा आंतरराष्ट्रीय मानाचा पुरस्कार त्यांना या कार्यासाठी मिळाला.

बालमजूरी, वेठबिगारी या विरोधात तर अग्निवेश बोललेच पण समाजामध्ये धार्मिक सलोखा रहावा, यासाठी ते प्रयत्नशील होते.

संपूर्ण भगव्या पोषाखात वावरणारा हा माणूस कुठल्या एका धर्मापुरता मर्यादित नव्हता. धर्मावर मक्ता सांगणा-या दांभिकांवर आसूड ओढत रचनात्मक काम उभा करणारा हा खरा फकीर होता. म्हणून तर या फकिराची धर्ममार्तंडांना भीती वाटत होती. ही भीती इतकी होती की, २०१८ साली झारखंडमध्ये भर रस्त्यावर अग्निवेशांचं ‘लिंचिंग’ करण्याचा घृणास्पद प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाच्या नराधमांनी केला. नंतर अटल बिहारी वाजपेयींना श्रध्दांजली वाहण्यासाठी जातानाही भाजप कार्यकर्त्यांनी स्वामींना धक्काबुक्की केली.

त्यानंतरही स्वामी शांतपणे मात्र, ठामपणे आपले मुद्दे मांडत राहिले. प्रेम शिकवतो तो खरा धर्म, हीच अग्निवेशांची धारणा होती. द्वेष आणि विखार पेरणा-या विकृतांच्या हातात धर्माची मक्तेदारी कशी गेली, याविषयी ते अगतिक होऊन प्रश्न विचारत होते. धर्मगुंडांना आव्हान देत होते.

वयाच्या ऐंशीव्या वर्षीही हा माणूस कोणत्याही लाभाचा, पद-प्रतिष्ठेचा विचार न करता केवळ समतापूर्ण, शांततामय समाजासाठी झुंजार लढा देत होता.

जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले ।तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ॥

असं म्हणणा-या तुकोबाच्या वाटेवरच्या स्वामी अग्निवेशांना आदरांजली.

- श्रीरंजन आवटे

Similar News