आत्महत्या न करण्याचं आवाहन करणाऱ्या मुलाच्या वडिलांचीच आत्महत्या

Update: 2020-02-29 09:02 GMT

तिसरी शिकणारा मुलगा ''शेतकरी मायबापा आत्महत्या करू नको रे'' ही कविता शाळेत सादर करतो....काही क्षणात सोशल मीडियावरही ही कविता व्हायरल होते....कदाचित अनेक शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या कवितेमुळे हिंमत मिळालीही असेल..पण त्याच दिवशी ही कविता सादर करणाऱ्या मुलाचे वडीलच आत्महत्या करतात......डोळे पाणावणारी ही कहाणी आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या गावातली...

तिसऱ्या इयत्तेत शिकणारा प्रशांत बटुळे या मुलाने मराठी भाषा दिनानिमित्त शाळेतल्या कार्यक्रमात 'शेतकरी मायबापा आत्महत्या करू नको रे'' ही कविता सादर केली. काही वेळातच सोशल मीडियावर ती कविता व्हायरल झाली पण त्यानंतर काही तासातच शेतकरी असलेल्या त्याच्या वडिलांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.. हृदय पिळून टाकणारी ही घटना आहे. मल्हारी बटुळे असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Full View

पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी इथं राहणाऱ्या मल्हारी बटुळे यांनी ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातलं पीक उध्वस्त झालं. त्यामुळे बँकेचं कर्ज फेडायचं कसं या विवंचनेतून मल्हारी यांनी आत्महत्या केली.

हे ही वाचा...

तिसरीमध्ये शिकणारा प्रशांत या घटनेने पूर्ण बावरून गेलाय. आपल्यावर प्रेम करणारे पप्पा आता नाहीत, त्यांनी हे का केलं असे प्रश्न त्याच्या निरागस डोळ्यांमध्ये दिसतात...

सरकार म्हणतंय आम्ही कर्जमाफी केली आहे, लवकरच सगळ्यांना दिलासा मिळेल...या शेतकऱ्याच्या कुटुंबालाही कदाचित थोडीफार मदत मिळेल. पण ज्या विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करतोय....त्याच्यावर कर्जमाफी हा उपाय नाही हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Similar News