या जिल्ह्यात टीव्ही मालिकांच्या शूटिंगला सुरूवात

Update: 2020-06-20 02:59 GMT

कोरोनामुळे गेल्या ३ महिन्यांपासून ठप्प असलेले मनोरंजन क्षेत्र आता पुन्हा सुरू होत आहे. यात सातारा जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. विशेष बाब म्हणजे झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'टोटल हूबलाक' या दोन मालिकांच्या चित्रीकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे.

जिल्ह्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने शूटिंगसाठी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या पातळीवर तयार केलेली 'एक खिडकी योजना' ही निर्मात्यांना सोयीची वाटते. त्याचसोबत फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक, सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमॅन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टीस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती होते.

चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या स्थानिक कलाकारांना मिळालेली संधी, कलाकरांना दळण–वळणासाठी आवश्यक असलेली वाहतूक व्यवस्था, सर्वांना जेवणासाठी सातारी केटरर्स या माध्यमांतुनही अनेक तरुणांच्या हाताला काम मिळते.

ज्या गावामध्ये चित्रीकरण आहे तेथील स्थानिक विकासाला मदत, चित्रीकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक स्वरूपात मदत देणे यामुळे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याचसोबत चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रीकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये झालेली लक्षणील वाढ, अशा विविधांगी स्वरुपाचा फायदा जिल्ह्याला होतो.

# चित्रीकरणासाठी नियम व अटी

● चित्रीकरण प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येकाने मास्क आणि पूर्ण शूटींग दरम्यान ग्लोज वापरणे बंधनकारक.

● चित्रीकरणाच्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे.

● हस्तांदोलन, मिठी मारणे अशा प्रकारची सर्व कृत्ये करणेस मनाई.

● दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर.

● 65 वर्षावरील व्यक्तींना चित्रीकरण प्रक्रियेत समाविष्ट करणेस मनाई.

● चित्रीकरण दरम्यान लग्न समारंभ, पुजा, सण, उत्सव, सामुहिक नृत्ये अशा गोष्टी करण्यास मज्जाव.

● केश रचना व मेकअपसाठी डिस्पोजेबल वस्तु वापरणे.

● चित्रीकरणाचे ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर, यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था बंधनकारक.

● चित्रीकरण दरम्यान वापरात येणारे सर्व साहित्य उदा. - कॅमेरा, रिमोट, लाईट स्विच, स्क्रिप्ट पॅड, माईक, इलेक्ट्रिक सिस्टम इ. सर्व साहित्य वापरापूर्वी व वापरानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक.

Similar News