पैसे नसतील तर तुझी बाईल आणून दे, सावकार महिलेची दमदाटी

Update: 2020-07-25 11:44 GMT

महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याची तंबी सांगली जिल्ह्यातून दिली होती. महाराष्ट्रात महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ लागू झाला. यानंतर अवैध सावकारीला काही प्रमाणात आळा बसला. पण कायदा येऊनही खुद्द सांगली जिल्ह्यातील खरसूंडी या गावातीलच सावकारी प्रकरण पुढे आल्याने सावकारीला पूर्णपणे आळा घालण्यास सरकार अपयशी ठरलं आहे. असंच म्हणावं लागेल.

खरसुंडी येथील मयुर भांगे अवैध सावकारीमध्ये त्यांची झालेली फसगत मॅक्स महाराष्ट्राकडे सांगतात. त्यांनी लक्ष्मी दबडे राहणार कारगणी यांच्याकडून ३ लाख ५० हजार इतकी रक्कम व्याजाने घेतली होती. या रकमेचे त्यांनी ३ लाख पंचवीस हजार इतके व्याज भरले आहे. याशिवाय व्याज देण्यास उशीर झाल्यानंतर ३ हजार रुपये दंड देखील त्यांच्याकडून वसूल केला गेला आहे.

दहा दिवसाला एक लाख रुपयांचे तब्बल १० हजार इतक्या दराने त्यांच्याकडून व्याज वसूल केले गेले आहे. ही रक्कम देण्यासाठी त्यांनी स्वतःची एक एकर शेती विकली आहे. तरी देखील त्यांना सदर व्यक्तीकडून ३ लाख ५० हजार मुद्दल मागण्यात येत आहे. व्याजाची रक्कम भागवण्यासाठी त्यांना तेथीलच दुसऱ्या सावकारांकडून कर्ज घ्यावे लागले. त्यांनी इतरही सावकारांकडून घेतलेल्या पैशाचे दुप्पट व्याज दिले आहे. तरीही अजुन त्यांचा तगादा सुरू असल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

ते सांगतात "सावकारांकडून धमक्या शिवीगाळ सुरू आहे. ते गावात येतात. या त्रासाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला पण रात्री कुटुंबीयांनी त्यांच्या हातातून औषधाची बाटली हिसकावून घेतली" त्यांच्या पश्चात त्यांचे काही महिन्याचे बाळ पत्नी तसेच वयस्कर आई वडील आहेत.

हा प्रकार केवळ एका व्यक्तीच्या बाबतीत घडलेला नाही. या कर्जाच्या चक्रात खरसुंडी येथील अनेक नागरीक अडकलेले आहेत.बिरूदेव कटरे सांगतात की त्यांनी लक्ष्मीबाई दबडे या महिलेकडून ७० हजार रुपये व्याजाने घेतले होते. अभिजित पवार यांच्याकडून १ लाख गोरख दबडे कडून ४५ हजार इतके पैसे घेतले होते. दुप्पट रक्कम व्याजापोटी दिली तरी अजूनही त्यांनी पैशाकरीता तगादा लावला आहे.

संजय कटरे यांनी उचललेल्या २ लाख रुपयांच्या अडीज लाख दिले पैसे द्यायला उशीर झाला तर लक्ष्मी दबडे त्यांना त्यांच्या मेंढ्या उचलून न्यायाच्या धमकी देते. पैसे नसतील तर तुझी बाईल आणून दे अशा प्रकारचे अपशब्द वापरत असते.

खरसुंडी गावाला या सावकारांनी पूर्णपणे पोखरलेले आहे. रोहित तुपे, विनायक सगरे, वैभव भोसले या नागरीकांचे अशाच प्रकारचे अनुभव आहेत. मयुर भांगे यांनी या विरोधात आवाज उचलला तर त्यांना आटपाडीच्या पाटलांकडे डांबून ठेवण्याची धमकी दिल्याचे ते सांगतात. या वरून आटपाडी येथील सदर पाटील कोण? या सावकारांना राजकीय अभय आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गावातील छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवणाऱ्या पोलिस विभागाला सावकारांकडून या गावकऱ्यांच्या होणाऱ्या शोषणाची माहिती मिळत नाही. हे देखील संशयास्पद आहे. या संदर्भात मॅक्स महाराष्ट्राने पोलिस विभागाशी संपर्क केला असता त्यांनी तक्रार आल्यानंतर कारवाई करू असे सांगितले.

या संदर्भात लोकांनी सावकारीचे आरोप केलेल्या महिला लक्ष्मी दबडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्र ने केला असता, त्यांनी पहिल्यांदा मी कुणाला असे पैसे दिलेले नाहीत. असे सांगितले. यानंतर त्यांना तुमचे कॉल रेकॉर्ड मिळालेले आहे. ज्यामध्ये तुम्ही चेक बाऊन्स करणार असल्याचे बोलत आहात. असे विचारल्यावर त्यांनी मयुर भांगे यांना उसने पैसे दिले असून ते मला परत मिळाले आहेत. असे त्या म्हणाल्या.अभीजित पवार यांनी दोन वेळा फोन कट केला तसेच यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

दरम्यान ज्या जिल्ह्यातून सावकारी विरोधात आवाज उठवला गेला. सावकारांची चमडी सोलून काढू अशा वल्गना झाल्या त्याच जिल्ह्यात अवैध सावकारां चा सुरू असलेला नंगा नाच इथल्या लोकप्रतिनिधींना दिसत नसेल का? असा प्रश्न पडतो. जिल्ह्याचे पालकमंत्री यावर काय पाऊले उचलतील हे येणाऱ्या काळात समजेल.

Similar News