मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन, काय होणार दिवसभरात?

Update: 2020-01-23 04:47 GMT

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन गोरेगाव येथील नेस्को संकुलात पार पडत आहे. या अधिवेशनात 13 वर्षांनी राज ठाकरे (raj thackeray) मनसेचा (mns) ध्वज बदलणार आहेत. तसंच राज्यातील बदलत्या परिस्थितीत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते अधिवेशनात दाखल झाले आहेत. तसंच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे अन्य पदाधिकारीही गोरेगावमधल्या नेस्को संकुलात दाखल झाले आहेत.

आज सकाळपासून राज ठाकरे राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तसंच साधारण 6 वाजता ते पब्लीक रॅलीला संबोधीत करतील. अमित ठाकरे यांचे लॉंचिंग

आज होणाऱ्या या अधिवेशनात राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर सावरकर मनसेच्या या अधिवेशनाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह सावरकरांचा फोटा लावला आहे. त्यामुळं सावरकरांच्या मुद्यावरुन शिवसेनेला बॅकफुटला आणण्याचा प्रयत्न मनसे करणार का? असा सवाल या अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.

दरम्यान आजच्या होणाऱ्या कार्यक्रमाचं ब्रॅडींग करताना मनसेने 'विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा' या वाक्याचा वापर केला आहे. मनसेच्या अधिकृत पेजवरील सर्व बॅनरवर हे वाक्य दिसून येत आहे.

एकंदरीत मनसेच्या स्टेजची रचना, झेंड्याचा बदलला जाणारा रंग याचा विचार करता मनसे हिंदूत्वाकडे झुकत असल्याचं दिसून येतं. मनसेच्या सुरुवातीच्या झेड्यांमध्ये इतर रंगाचा समावेश होता. आता तो असणार नाही. त्यामुळं मनसे शिवसेनेची व्होट बॅंक मिळवण्याचा प्रयत्न करतेय का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Similar News