लॉकडाऊन ४ ची कशी सुरू आहे तयारी?

Update: 2020-05-13 03:15 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना संबोधित करत असतांना २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर विशेष पॅकेजची घोषणा केली. यासोबतच पंतप्रधानांनी चौथ्या लॉकडाऊनचे संकेतही दिले आहेत.

कोरोनामुळे सुरू असलेलं तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत १७ मे रोजी संपत आहे. त्यानंतर अनेक भागांमध्ये लॉकडाऊनमधून शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. चौथं लॉकडाऊन हे आतापर्यंतच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळं असेल असं पंतप्रधानांनी म्हटलंय. त्याबद्दलची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. १८ मे पासून महत्वाच्या शहरांमधील हवाई प्रवास सुरु होऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. मोठ्या शहरांमध्ये मेट्रो, लोकलसेवा पूर्ववत करण्याबाबत पंतप्रधानांनी नकार दिला आहे. मात्र, कोरोनाशी लढत असताना विशेष उपाययोजना करण्यासंबंधी निर्णय त्यांनी राज्यावर सोडला आहे.

कोरोनासंबंधीत नियमांचं काटेकोरपणे पालन करत आर्थिक घडामोडी सुरू करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्याना सूचित केलंय. १८ मे नंतर अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासंबंधी आराखडा तयार करावा असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.

येत्या १८ मे पासून ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांना त्रास न होता लॉकडाऊनसंबंधी नियमावली केली जाणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना केंद्र सरकारच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांने 'मॅक्स महाराष्ट्र'ला सांगितलं की, आमच्याकडे आलेल्या अहवालानुसार येत्या जून आणि जुलै महिन्यात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक असेल. त्यामुळे इतक्यात आपल्याला कोरोनापासून सुटका मिळणं शक्य नाहीय. हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल'

अमेरिका आणि इराणसारख्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही या देशात अनेक शहरं उद्योगांसाठी खुली करण्यात आली आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये ५० हजार कोरोनाबधित रुग्ण असूनही त्यांनी सर्व व्यवहार सुरू केले आहेत. अमेरिकेतही अशीच परिस्थिती आहे. आपल्यालाही कोरोनाच्या या विळख्यातून बाहेर येण्यासाठी डॉक्टर, सीए आणि लष्कराची मदत घेऊन नियोजन करावं लागेल, असं केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Similar News