#कोरोनाशी_लढा - गणेशमूर्तींच्या उंचीवर यंदा मर्यादा

Update: 2020-06-27 02:26 GMT

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. “श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे.

मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत, हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी चर्चेनंतर शिस्तीने आणि सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर एकमत झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

भव्य मूर्तीऐवजी ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, यावर एकमत झाले आहे. मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन आणि विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. त्याचबरोबर मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडपदेखील लहान आणि साधेच पण सुंदर असतील याची खबरदारी घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Similar News