तुकाराम मुंढेंच्या क्षमतेचा वापर राज्याच्या हितासाठी करा - हेमंत देसाई

Update: 2020-09-05 10:17 GMT

नागपूरच्या किल्ल्याचे जे किल्लेदार आहेत, ते स्वत:च्या कोणत्याही स्वप्नांची पूर्ती करू शकतात... मीडियाचे देखील ते डार्लिंग आहेत, त्यामुळे त्यांची 'लाइन' मीडियामधून व्यवस्थित चालवली जातच असते.. त्यांच्या वा अन्य कोणाच्या 'कृपे'मुळे नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची अल्पावधीत बदली करण्यात आली. त्याची कोणतीही कारणे देण्यात आलेली नाहीत.

आता हा नागपुरी अध्याय समाप्त झाला असून, तुकाराम यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासारख्या प्रामाणिक, कार्यक्षम आणि इनोव्हेटिव्ह कल्पना राबवणाऱ्या अधिकाऱ्यास अधिक चांगल्या ठिकाणी नेमणे आवश्यक आहे. कारण या प्राधिकरणात अभियंता दर्जाचा माणूसही चालू शकतो.

तेथे फारसे करण्यासारखे काहीच नाही! असो. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांचे कौतुक केलेले आहे. तेव्हा आता त्यांनी सार्वजनिक आरोग्य खात्यात त्यांची नेमणूक केल्यास, ते योग्य होईल. आज कोविडमुळे आरोग्य खात्याचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य संकटात असून, या खात्यास वळणावर आणण्यासाठी मुंढे यांच्यासारख्या स्वच्छ व झपाटलेल्या अधिकाऱ्यांची गरज आहे.

तेथे शक्य नसेल, तर एमआयडीसीवर त्यांची नेमणूक करता येईल. आज महाराष्ट्रात वेगवान औद्योगिक प्रगती आणि रोजगारनिर्मिती होण्याची आवश्यकता आहे. तेही शक्‍य नसेल, तर मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. मुंबईचा परिघ वाढत असून, येथील समस्या गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत.

नालेसफाई, स्वच्छता, झोपडपट्ट्या, प्रदूषण, अनधिकृत फेरीवाले अशा अनेक समस्या आहेत. मुंबई शहरात स्वच्छतेची आणि महापालिकेत 'साफसफाई'ची गरज आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारखा डॅशिंग अधिकारी ज्या कोणत्याही पदावर असेल, तेथे तो लोकहितच साधेल, असे आजवरच्या अनुभवावरुन म्हणावेसे वाटते. व्यवस्थेतील हितसंबंधी गट व प्रवृत्ती यांचा मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना नेहमीच विरोध असतो, त्यात आश्चर्य नाही.

पण मुंढे यांच्या कामाबद्दल लोक खूष असून, सामान्य लोकांचा त्यांना पाठिंबा असतो, हे विसरून चालणार नाही. खरे तर तुकाराम मुंढे यांच्या क्षमतेचा लाभ घेऊन महाविकास आघाडी सरकारला खूप चांगली कामे करता येतील आणि लोकांचा दुवा मिळवता येईल. उद्धव ठाकरे यांनी हे जरुर करावे, असे कळकळीचे आवाहन आहे.

Similar News