वंशाचा दिवा विझवतोय पणतीला...!!!

Update: 2017-03-07 14:09 GMT

वंशाचा दिवा म्हणजे नेमकं काय... मुलगा जन्माला येणं म्हणजे तुमचा वंश पुढे जाईलच किंवा तो नेईलचं याची शाश्वती काय... मुलानंच घरातून हाकलून दिलं तर मग त्या 'मुलींचं' काय ज्यांना तुम्ही एक मुलगा जन्माला येण्यासाठी मारलंत... त्यांनी तुम्हाला सांभाळलं असतंच की... प्रत्येक गरोदर बाईला किंवा म्हणा ना आईला असं वाटतं की आपल्या पोटी एक गोड निरागस सुदृढ बाळ जन्माला यावं... मुलगा की मुलगी व्हावी असा ती विचार करत नाही... तिची गरोदरपणातली मानसिकता फार वेगळी असते... पण, तुम्ही लग्न करता कारण तुमच्यासाठी बाई म्हणजे तुमच्या घराण्याला वंश देणारं फक्त एक मशीन असते... किती अजून मुलींना तुम्ही जमिनीत गाडाल.... किती स्वतःचे हात खुनात रंगवाल... हे सगळं फारंच भयंकर होत चालंलय... 8 मार्चला महिला दिवस साजरा होतो पण त्याचा उपयोग तो काय आजही हजारो घरांमध्ये स्त्रियांवरचे अत्याचार कुठे थांबलेत.... त्या त्यांचं बाईपण भोगतातच आहेत... महिला दिवस का साजरा करायचा जर तुम्हाला महिला नको आहेत आणि ज्या आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला आदर नाहीये... हे फारंच घाणेरडं होत चाललंय... सांगलीमधलं प्रकरण घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारं आहे... गेले 12 वर्ष तो खिद्रापुरे फक्त मुलींना मारायचं काम करतोय... हे किती वाईट आहे... त्याचं हे कृत्य फोफावलं कारण तुम्ही तुमच्या बायकांना त्याच्याकडे घेऊन गेलात... लाज वाटत नाही???? लाज कशी वाटणार ज्यांची लायकी नाही त्यांना लाज ती कसली... आजही कित्तीतरी घरांमध्ये महिला फक्त स्वयंपाकघरातच कोंडल्या गेल्या आहेत.... आजही त्या चुलीमध्ये सडतायत... आजही त्यांच्या पायात बंधनं अडकवून घरातले पुरूष मात्र मोकाट फिरतायत... हा कुठला न्याय... तीला तीच्या पद्धतीनं जगू द्या की... का तुम्हाला तीचं अस्तित्व मान्य नाहीये... आजही असे अनेक पुरूष आहेत जे म्हणतात "करा की 8 मार्च महिला दिवशी काम, आणि दाखवून द्या तुम्हाला कशाला हवीये पुरूषांची गरज" ही वृत्तीच इतकी किडकी आहे की त्यांना महिलांचं अस्तित्वचं मुळात मान्य नाहीये... आणि आम्हाला तुमच्यासाठी काहीही सिद्ध करायची गरज नाही कारण आमच्याच गर्भातून तुम्ही जन्माला येता... आमच्याच नाळेतून तुम्ही अन्न खाता आणि म्हणून इथवर पुरूष म्हणवण्याइतपत मोठे होता... आई आणि बाळाला जोडणारी ती नाळ त्या दोघांच्या नात्यासाठी पुरेशी असते... त्याला कोणत्याही लिंग ओळखीची गरज नसते... बाळ जर स्त्री किंवा पुरूष लिंगाचं नसेल आणि ते नपुंसक असेल तरिही आईसाठी ते तीचं बाळ असतं.... त्यामुळे तुम्ही कोण? बाळाचं आणि आईचं नातं ठरवणारे?... एकदा विचार करून बघा... स्त्रिया जर उरल्याच नाहीत तर तुमचं काय होईल.... पुरूषीपणा कोणावर सिद्ध कराल????? हा विचार प्रत्येक बाईनं जी सासू झालीये आणि जी वंशाच्या दिव्याचा अट्टाहास करते आणि प्रत्येक नवऱ्यानं केला पाहिजे....

- सुप्रिया कुऱ्हाडे-नारखेडकर, वृत्त निवेदिका, आयबीएन लोकमत

Similar News