आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचे काय होते हे दाखवणारा रिपोर्ट मॅक्स महाराष्ट्रने दाखवल्यानंतर त्या कुटुंबाच्या मदतीसाठी अनेक संवेदनशील हात पुढे आले आहेत. पाहा मोसीन शेख यांचा खास रिपोर्ट.....

Update: 2020-11-10 12:10 GMT

दुष्काळ, कर्जमाफी आणि नापिकीमुळे विदर्भ, मराठवाडय़ासह राज्यातील विविध भागातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांनतरही आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना सरकारकडून हवी तशी मदत मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाचे काय होते, याचे वास्तव मॅक्स महाराष्ट्रने दाखवले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पोरगाव तांडा येथील राठोड कुटुंबाची व्यथा आम्ही दाखवली होती. त्यांनतर आता राठोड कुटुंबाला मदत करण्यासाठी काही दानशूर हात पुढे आले आहेत.



मॅक्स महाराष्ट्रने 24 ऑक्टोंबर रोजी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तारा राठोड यांची व्यथा मांडणारा ग्राउंड रिपोर्ट दाखवला होता. पती आणि मुलाने कर्जाला कंटाळून केलेल्या आत्महत्येनंतर तारा राठोड यांच्या घरात करता पुरुषच उरला नसल्याने कुटुंब रस्त्यावर आलं आहे. घरात सून आणि नातवंड याचा सांभाळ कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यांचं हेच दुःख आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनतर आता राठोड कुटुंबाला आर्थिक मदत आणि रोजगार मिळवून देण्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे राठोड कुटुंबाची दिवाळी सुद्धा गोड होणार आहे.




राठोड यांची बातमी पाहून औरंगाबादपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक येथील गणेश भगत हे राठोड कुटुंबाच्या मदतीला धावून आले आहे. या आत्महत्याग्रस्त कुटूंबाची आर्थिक बाजू भक्कम व्हावी तसेच, स्वतःचा उदरनिर्वाह करता यावा म्हणून भगत यांनी राठोड कुटूंबाला शिलाई मशीन आणि रोख रक्कम दिली आहे. त्याचबरोबर या कुटुंबाची दिवाळी इतरांप्रमाणे गोड व्हावी म्हणून भगत यांच्या एका मि६ने राठोड कुटुंबाला दोन-तीन महिने पुरेल एवढा किराणा भरून दिला आहे. तर समाजाचं काही देणं असल्याने आम्ही ही मदत केली असून, इतरांनीही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या दुःखात सामील होऊन त्यांना होईल तशी मदत करण्याचे आवाहन भगत यांनी केले आहे.


Full View
Tags:    

Similar News