शिक्षकांनी एकट्यासाठी सुरु ठेवली शाळा...

हलाखीची परस्थिती मोबाईल आणणार कोठून ? शिक्षणासाठी 10 वर्षीय गणेशची शिकण्याच्या जिद्दीतून अनोखा सायकल प्रवास केलाय.. पाहुयात याविषयीचा हरीदास तावरेंचा स्पेशल रिपोर्ट...

Update: 2022-01-23 12:06 GMT


कौटुंबिक परस्थिती हलाखीची, त्यात वडील अपंग... आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. त्यामुळं जिथं दोन घास मिळण्याचा कसाबसा मेळ लागतो. ते कुटुंब आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल कुठून आणणार ? मात्र, अशाही परस्थितीत 10 वर्षीय गणेश पन्हाळे हा विद्यार्थी, दररोज 7 किलोमीटर सायकलने प्रवास करीत शिक्षण घेत आहे.तर गणेशची शिक्षणाबद्दलची ही आवड लक्षात घेत त्याचे शिक्षक प्रीतम पन्हाळे यांनी, त्याच्या एकट्यासाठी शाळा सुरू ठेवली आहे.

गणेश हा बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या पाटोदा गावचा 10 वर्षीय गणेश सुधाकर पन्हाळे..गणेश हा पाटोद्यापासून साडेतीन किलोमीटर असलेल्या ममदापुर गावातील संभाजीराव बडगिरे प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गणेश वडील सुधाकर पन्हाळे अपंग आहेत, तर आई शेतमजूर मीना पन्हाळे या शेतमजूर आहेत. त्या दररोज दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन मजुरी करतात आणि त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र भर पडली कोरोनाची, कोरोनाने लॉकडाऊन लागलं अन ऑनलाइन शिक्षण झालं. मात्र एकीकडे दोन घास मिळवण्यासाठी वणवण सुरू असतांना मुलगा गणेशच्या शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल कुठून आणावा असा प्रश्न पन्हाळे दाम्पत्यापुढे पडला होता.

या सुरुवातीच्या लॉकडाऊन दरम्यान गणेश दुसरीत होता, मोबाईलअभावी तो ऑनलाईन शिक्षणापासून दुरावला. अशा मुलांचं शैक्षणिक वास्तव लक्षात घेऊन संभाजीराव बडगिरे विद्यालयाने मागील वर्षीचा अभ्यासक्रम ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करूनच पुढील वर्षाचे अध्यापन सुरू केले. त्यामुळे गणेश शिक्षणाच्या प्रवाहात आला. मात्र आता ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शाळा बंद झाल्या. शाळेतील इतर मुले ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ लागली. मात्र साधनांच्या व्यवस्थेअभावी गणेश ऑनलाईन शिक्षणात सहभागी होऊ शकत नव्हता. मात्र शाळेचे समन्वयक प्रीतम पन्हाळे यांच्यामुळे, गणेशला ऑफलाइन शिक्षणाची संधी मिळाली.

याविषयी शाळेचे समन्वयक प्रीतम पन्हाळे म्हणाले, की गणेशच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील अपंग असून आई शेतमजूर आहे, त्याचे वडील सुधाकर पन्हाळे अपंग असतानाही स्वतःच्या शेतात कधी कधी काम करतात, तर आई स्वतःच्या शेतासह इतरांच्या शेतात देखील मजुरीचे काम करते. आणि त्याच्यावर त्यांचा कुटुंबाचा गाडा चालतो. हे असताना ते गणेशसाठी मोबाईल घेऊ शकत नव्हते. त्यामुळे सुधाकर पन्हाळे म्हणाले, की माझ्या गणेशसाठी तुम्हीच काहीतरी करा. यामुळे मुलांचे ऑनलाईन क्लास घेण्यासाठी मी पूर्णवेळ शाळेच्या परिसरामध्ये असतो. यातच मी आता गणेशसाठी ऑफलाइन क्लास घेत आहे. या दरम्यान मला जाणवलं कि, गणेश मन लावून शिक्षण घेतोय, त्याची प्रगती पाहता माझ्या लक्षात आलं, की त्याचा आत्मविश्वास वाढत असून तो नक्कीच पुढील आयुष्यात चांगला अधिकारी बनू शकतो. यामुळे त्याच्या एकट्यासाठी मी शाळा घेत आहे. तर मागच्या काही दिवसापूर्वी कडाक्याची थंडी होती, दाट धुकं होतं मात्र या थंडी आणि धुक्यातही गणेशन शाळा कधीच बुडवली नाही .अशी प्रतिक्रिया शाळेचे समन्वयक प्राध्यापक प्रीतम पन्हाळे यांनी दिली आहे

याविषयी गणेश म्हणाला, की मला शिक्षणाची खूप आवड आहे. मात्र कोरोनामुळं लॉकडाऊन झालं, या दरम्यान सरांनी फोन केला आणि ऑनलाइन क्लासेसला जॉईन का होत नाहीस असं विचारलं. मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे मोबाईल नाही, मग वडिलांनी सरांना फोन केला आणि त्यानंतर सरांनी माझ्यासाठी शाळा सुरू केलीय. मी दररोज सात किलोमीटरचा येण्या-जाण्याचा प्रवास करतोय. थंडीतही मी शाळेत आलो, आज सर शिकवत आहेत म्हणून खूप बरं वाटतंय. अशी प्रतिक्रिया गणेश पन्हाळे या विद्यार्थ्याने दिलीय. गणेश पन्हाळ्याचे वडील म्हणाले, की कोरोनामुळं लॉकडाऊन झालं. आणि ऑनलाइन शिक्षण सुरू झालं. मात्र मी अपंग असल्यानं जास्त काम करत येत नाही. कुटुंबाची जबाबदारी पत्नीच्या जीवावर आहे. पैसे नसल्याने गणेशसाठी मोबाईल घेता आला नाही. त्यामुळं मी सरांना फोन केला आणि तुम्हीच काहीतरी करा असं मी आणि पत्नीने सांगितले. सरांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि मुलाला शिकवत आहेत. तर आई मीना यांनी मदतीची मागणी केलीय.

दरम्यान मला शिकायचं आहे, या ओढीने शाळेसाठी गणेशचा दररोज सुरू असलेला हा सायकलवरचा प्रवास कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या आव्हानांना अधोरेखित करणारा असून विद्यार्थी गणेश आणि समन्वयक शिक्षक प्रीतम पन्हाळे यांनी राज्यात आदर्श निर्माण केलाय. 

Full View

Tags:    

Similar News