मराठवाडा - दुष्काळाच्या झळा, टँकरही बंद होण्याच्या मार्गावर  

Update: 2019-02-10 10:37 GMT

दुष्काळाच्या झळा बसलेल्या लातूर जिल्ह्याला दोन वर्षांपुर्वी टँकरनं पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यानंतरही जिल्ह्यात फारशी परिस्थितीत बदललेली नाही. सध्या शासन दरबारी जिल्ह्यात एकही टँकर सुरू नसल्याची नोंद आहे. त्यामुळं नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेऊन आपली गरज भागवावी लागत आहे. मात्र, परिसरातील पाण्याची पातळीच दिवसेंदिवस कमी होत चालल्यानं भविष्यात टँकरही बंद होण्याच्या मार्गावरच आहेत.

मॅक्स महाराष्ट्रच्या टीमनं सुमारे ६ हजार ५०० लोकसंख्येच्या एकुर्गा या गावाची पाण्यासाठीची वणवण प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊनच बघितली. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. आमच्या टीमनं गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावाची पाहणी केली तेव्हा तो कोरडाठक्क पडला होता. शेजारीच असलेली विहीरही कोरडीच होती. त्याचवेळी लिंबराज रसाळ हे टँकर चालक तिथे आले त्यांच्याशी झालेल्या संवादातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला.

गावाचा दैनंदिन पाणीपुरवठा

एकुर्गा या गावाला दररोज सरासरी ३६ हजार लिटर पाणी लागतं. एका टँकरची क्षमता सुमारे ६ हजार लिटर आहे. असे ५ ते ६ टँकरची गरज दररोज गावाला आहे. एक टँकर ६०० रूपयांमध्ये ६ हजार लिटर पाणी विकतो. ग्रामस्थ आपल्या आर्थिक कुवत आणि गरजेनुसार पाणी विकत घेतो. २ रूपयांना एक घागर असंही पाणी विकलं जातं. मात्र, आता याच टँकरचालकांना टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी विहीरींची शोधाशोध करावी लागत आहे. एक टँकर भरण्यासाठी किमान तीन-चार ठिकाणच्या विहीरींमधून पाणी भरावं लागतंय. त्यामुळं भविष्यात टँकरमध्येही भरायला पाणी शिल्लक राहील की नाही, अशी भीती टँकरचालक लिंबराज रसाळ यांनी व्यक्त केली आहे.

एकुर्गा गावाचा प्रस्ताव आलाय - अविनाश कांबळे, तहसीलदार

गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी विहीर किंवा बोअर अधिगृहीत करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल.

Full View

Similar News