LockDown : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांचीही लूट!

Update: 2020-04-04 14:00 GMT

कोरोना व्हायरसच्या विळख्याने जगजीवन विस्कळीत झालेले असताना काही झारीतील शुक्राचार्य या परिस्थितही कमावण्याची संधी शोधत आहेत. सध्या जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये वाहतुकीस बंदी असल्यानं राज्यातील दळणवळण सुविधा ठप्प आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून ठराविक व्यापाऱ्यांना माल विकण्याची परवानगी आहे. हे व्यापारी ग्रामीण भागातून माल विकत आणतात आणि शहरात विकतात. भाजीपाल्यासारख्या अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचा स्थानिक स्वराज्य संस्था प्रयत्न करत आहेत.

या सेवा पुरवणारे बहुतांशी व्यापारी असल्याने त्यांची मक्तेदारी निर्माण होत आहे. हे व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी भावात शेतमाल खरेदी करून ग्राहकांना तिप्पट-चौपट दराने विक्री करत आहेत. ४० रुपये किलो असणारी वांगी ८० रुपये दराने विक्री करत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आल्या.

प्रत्यक्षात हे व्यापारी शेतकऱ्यांकडून किती दराने माल खरेदी करतात? हे पाहण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. तेथे प्रत्यक्षात असणारी परीस्थिती विदारक होती.

सांगली जिल्ह्यातील सुभाष गडदरे यांचा वांग्याचा प्लॉट आहे. पतसंस्थेचे कर्ज काढून त्यांनी तो वाढवला आहे. आता उन्हाळ्यात दर वाढेल ही आशा त्यांना होती. मात्र याच काळात कोरोनामुळे वाहतूक बंद झाली. त्यांच्याकडून व्यापारी ९ रुपये किलोने वांगी नेत आहेत. या दराने त्यांनी वांगी तोडायला लावलेल्या मजुरांचे देखील पैसे मिळत नाहीत. काढलेले कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेल्या काही मालावर व्यापारी डल्ला मारत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांकडून माल घेताना ज्या व्यापाऱ्यांना माल विकण्याची परवानगी दिली आहे. त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला त्याच्या मालाची रितसर पावती देणं गरजेचं आहे. या पावतीच्या दोन प्रती असाव्यात. एक शेतकऱ्यांसाठी आणि एक व्यापाऱ्यांसाठी. या दोनही पावत्यांवर शेतकरी आणि व्यापारी यांची दोघांचीही सही असावी, ज्यामुळे हा व्यापारी शहरामध्ये माल विकताना किमान नफ्यात विकेल. किंबहूना हा माल विकताना शासनाच्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याला दिलेल्या पावतीचा विचार करुन मालाची किंमत ठरवावी. अशी मागणी या निमित्ताने समोर येत आहे.

शेतकऱ्यांकडून लॉकडाऊन सांगून २० रुपये किलोने माल आणायचा आणि मुंबई पुणे शहरात १०० रुपये किलोने विकायचा असा प्रकार सध्या घडत आहे. त्यामुळं या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. व्यापाऱ्यांवर नियंत्रण नसल्यानं या आणीबाणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांचीही लूट होत आहे.

Full View

Similar News