खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचं हिंदुस्थान पेट्रोलिअमच्या विरोधात चक्री उपोषण

Update: 2019-03-03 06:27 GMT

खेड तालुक्यातील काळूस या गावातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिक गेल्या 41 दिवसांपासून चक्री उपोषण करत आहेत. गावाच्या गावठाणातून हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनच्या गॅसची पाईपलाईन जात असून या पाईपलाईनमुळे या गावकऱ्यांना धोका असल्याचं गावकऱ्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे हे गावकरी हिंदुस्थान पेट्रोलिअम आणि आणि सरकारच्या विरोधात चक्री उपोषण करत आहेत.

या संदर्भात आम्ही जेव्हा गावकऱ्यांची भेट घेतली तेव्हा गावकऱ्यांनी आम्हाला या पाईपलाईन पासून धोका असल्याचं सांगितलं. ही पाईपलाईन लोकवस्ती असलेल्या गावातून गेली आहे. आणि जर या गॅसच्या पाईपलाईनची गळती झाली तर गावातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल. तसंच या पाईप लाईनमुळे सिंचनाच्या सुविधा निर्माण करताना शेतकऱ्यांना अडचण होणार असल्याचं मत शेतकऱ्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं.

दरम्यान गावकऱ्यांनी या संदर्भात शासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र, सरकारी अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी तहसिलदारांशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडे पाठवल्या असल्याचं सांगितलं तसंच आंदोलन स्थळी डॉक्टरची टीम पाठवण्याचेही आदेश दिले असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

गेल्या 4 दिवसापासून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची तब्बेत बिघडत असून त्या ठिकाणी आजपर्यंत डॉक्टर आले नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दौडकर यांनी केला आहे.

Full View

Similar News