भारताचा पुन्हा जय हो ! पाकिस्तानवर 89 धावांनी विजय

Update: 2019-06-17 06:34 GMT

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. तसेच विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. भारताने आज पाकिस्तानवर 89 धावांनी रो'हिट' विजय मिळविला आहे. पहिल्यांदा खेळतांना भारताने पाकिस्तानला 337 धावांचे आव्हान दिले. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हे टार्गेट 302 धावांचे करण्यात आले. तसेच सामना 40 षटकांचा करण्यात आला. यानंतर पाकिस्तानला 212/6 धावांपर्यंतच मजल मारता आली.

भारताने नाणेफेक गमावली. पण तमाम भारतीयांच्या मनात जसं होतं, अगदी तसंच घडलं. भारताला फलंदाजी मिळाली. पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर भारताकडून लोकेश राहुल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. सुरुवातीला दोघेही शांत आणि संथ खेळले. पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे भारतीय सलामीवीर धावबाद होता होता बचावले. यानंतर मात्र रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सुसाट सुटले. लोकेश राहुल 57 धावा काढून बाद झाला. तर दुसऱ्या बाजुने रोहित शर्माने शानदार शतक केले. तो 140 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी तडाखेबंद फलंदाजी केली. पांड्या 26 धावा काढून तंबूत परतला. भारतीय फलंदाज धावांची बरसात करत असतांनाच पाऊसही आला. तसा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. मात्र पाऊस आला अन् गेला. त्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला. विराट कोहली 77 धावा काढून बाद झाला. शेवटी विजय शंकर आणि केदार जाधव यांनी भारताला 336 धावांपर्यंत घेवून गेले.

पाकिस्तानसाठी 337 धावांचे आव्हान हे डोंगराएवढे ठरले. त्यामुळेच ते सुरुवातीपासूनच दबावात दिसले. मात्र सामना सुरु असतांनाच भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार घसरला. त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याचे अर्धवट राहिलेले षटक टाकण्याची जबाबदारी विजय शंकरवर आली. अचानक आलेल्या संधीचे विजयने सोने केले. त्याने पहिल्याच चेंडूवर इमाम उल-हकला पायचित केले. यानंतर मात्र बाबर आजम आणि फखर जमान मैदानात पाय रोवून बसले. थोड्या वेळासाठी सामन्यातला रोमांच संपून गेला होता. पाकिस्तानचा धावफलक हळू हळू पुढे सरकत होता. त्याचवेळी भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने बाबर आजमचा त्रिफळा उडविला. तर फखर जमानलाही बाद केले. यानंतर पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. मोहम्मद हाफिजला हार्दिक पांड्याने तंबूत धाडले. त्यानंतर आलेला शोएब मलिक भोपळाही न फोडता बाद झाला. त्यालाही पांड्यानेच तंबूत धाडले. यानंतर साहजिकच पाकिस्तानची धावगती मंदावली. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदही स्वस्तात तंबूत परतला. पण पुन्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे सामना 40 षटकांचा करण्यात आला. तर पाकिस्तानला 302 धावांचे आव्हान देण्यात आले. मात्र पाकिस्तानला शेवटी 212/6 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताचा 89 धावांनी विजय झाला.

संक्षिप्त धावफलक -

भारत - 336

रोहित शर्मा - 140

विराट कोहली - 77

लोकेश राहुल - 57

.........

पाकिस्तान - 212/6

फखर जमान - 62

बाबर आजम - 48

सामनावीर - रोहित शर्मा

Similar News