कसा केला भारतानं दुसरा सर्जिकल स्ट्राईक

Update: 2019-02-26 12:48 GMT

भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांची दहशतवादी कॅम्प उध्वस्त केली आहेत. ही सर्जिकल स्ट्राईक कशी झाली, याविषयी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेली ही माहिती त्यांच्याच शब्दात...

पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताच्या प्रत्युत्तराची पुरेपुर कल्पना होती. कारण भारत पुन्हा दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करेल ही भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळं नुकसान होऊ नये म्हणून पाकिस्ताननं एलओसी जवळील दहशतवाद्यांची प्रशिक्षण तळं ही एलओसीपासून ३०-४० किलोमीटर आत पाकिस्तानच्या हद्दीत आतमध्ये हलवली होती.

मिराज विमानांची कामगिरी

भारताच्या ताफ्यातील मिराज विमानांचा पल्ला खुप जास्त आहे. पाकिस्तानमधल्या कुठल्याही टार्गेट (लक्ष्य) पर्यंत ही मिराज विमानं सहज पोहचू शकतात. विमानांचं वेग प्रचंड असल्यानं ती ३-४ मिनिटांतच दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पजवळ पोहचली असावीत. आणि हे कॅम्प उध्वस्त करून २-३ मिनिटातंच ही विमान भारताच्या हद्दीत परतली असावीत.

भारताचं अचूक टायमिंग

भारतीय हवाई दलानं हल्ल्यासाठी अचूक टायमिंग साधलं आहे. ऐन मध्यरात्री हल्ला झाल्यानं या ट्रेनिंग कॅम्पमधील दहशतवादी झोपेत असतील, या हल्ल्यानंतर त्यांना फार काही करता आलं नसेल. त्यामुळं भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की अशा हल्ल्यांना भारत जोरदार प्रत्युत्तर देतो म्हणून...

हल्ला करू शकतो...हा संदेश महत्त्वाचा

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात युद्ध करू नये किंवा हल्ला करू नये, याविषयी उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या अनेक तज्ज्ञांनी सल्ले दिले. पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत, पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करेल वगैरे...मात्र, अशा हल्ल्याच्या माध्यमातून पाकिस्तानला एक मेसेज देण्याची आवश्यकता होती की न्युक्लिअर बॉम्ब असो नसो पाकिस्तानमुळं भारताचं नुकसान झालं आहे, त्याचा बदला भारत घेतोच, हा संदेश सर्वांपर्यंत पोहचणं गरजेचं होतं. भारतानं फक्त पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्पचं नुकसान केलं आहे. शिवाय त्यांच्या दहशतवाद्यांचाही खात्मा झाला आहे, त्यामुळं आपल्या हवाई दलाचं कौतुक केलंच पाहिजे.

सुखोई अजून बाकी आहे...मिराजनचं करून दाखवलं...

मिराज विमानांमध्ये आपण अपग्रेडेशन आणलं आहे. पण त्यापेक्षाही अत्याधुनिक अशी सुखोई विमानं आपल्याकडे आहेत. यावेळी भारतानं मिराज विमानांचा वापर केला आहे, पाकिस्तानच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर आपल्याकडे सुखोई सारखी अत्याधुनिक विमानंही आहेत, त्याद्वारेही भारत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊ शकेल.

लेझर गाईडेड बॉम्ब...

भारतीय हवाई दलानं या सर्जिकल स्ट्राईकमध्ये कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये, याची पुरेपुर दक्षता घेतली होती. १००० किलो वजनाचे बॉम्ब टार्गेटवरच पडले पाहिजेत यासाठी लेझर गाईडेड तंत्राचा वापर करण्यात आला. त्यामुळं इतक्या मोठ्या वजनाचा बॉम्ब हा थेट टार्गेटवरच जाऊन पडतो. त्यामुळं हल्ल्याच्या ठिकाणापासून २०० मीटरचा परिसर हा पूर्णतः उध्वस्त होतो, इमारती, त्या परिसरातील माणसांचाही मृत्यु होतो, इतक्या विशाल क्षमतेचा हा बॉम्ब असतो...

हेमंत महाजन, निवृत्त ब्रिगेडियर

Similar News