आणि काशिनाथ घाणेकर...

Update: 2018-11-12 10:03 GMT

एक उत्तम जमलेला बायोपिक. विषयाशी प्रामाणिक राहून कष्टपूर्वक बांधलेला चित्रपट. एका नटाचं घडणं आणि पतन यामधील प्रक्रिया लेखक दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी फार परिणामकारकरित्या रेखाटली आहे. सुबोध भावे अतिशय अभ्यासू पणे भूमिकेत शिरलाय. नक्कल न करता लकबींचा आभास निर्माण करत त्यानं बेफिकीर, कलंदर,मिजासखोर पण मनस्वी घाणेकर कमालीच्या ताकदीनं उभे केले आहेत. त्याच्यापेक्षा दुसरया कोणाची या भूमिकेसाठी कल्पनाच करवत नाही !सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आणि सुमित राघवन या तिघांनी ही कलाकृती फार समृद्ध केलीय.

कुठेहि रेंगाळू न देता, अतिरेकी भडक व सवंग न करता दिग्दर्शकानं चित्रपट भावला तसा मांडला आहे. मोठया कलावंतांना अनेकदा व्यसनांचा किंवा वासनांचा शाप लागतो, पण टाळीचा शाप लागलेले घाणेकरांसारखे उत्तम पण बेबंद नट अगदी विरळाच! स्वतःच्या प्रतिमेत आणि प्रेक्षकांच्या टाळीत अडकलेले घाणेकर इथे काही ठिकाणी उदात्तपणे रंगवले गेले आहेत, पण तरी नट म्हणून त्यांचं मोठेपण अधोरेखीत होत॔च. माणूस म्हणून अनेकदा वाईट वागूनहि कलावंताला इतर बाबी माफ करणं हे तर रसिकांचं दातृत्व, जे मराठी मनांनी निभावलं!

पण तरीहि घाणेकरांच्या बेबंद आयुष्याचा हा लेखाजोखा आणि ताळेबंद या सर्व कलावंतांनी फार ताकदीनं पेलला आहे.

ज्यांनी घाणेकरांचा काळ किंवा नाटकं पाहिली नाहीत, ते कदाचित या चित्रपटाशी फार रिलेट होणार नाहीत.पण तरीहि अशा कलाकृती निर्माण करणं सोपं नाही. यातल्या प्रत्येक कलावंतानं आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेत जीव ओतला आहे.

मनात दीर्घकाळ रेंगाळत अस्वस्थ करणारा,आणि कलावंतांना अहंकार आणि मस्तीपासून दूर राहण्याचा, व कलेशी प्रतारणा न करण्याचा महत्वाचा संदेश देणारा हा चित्रपट,आवर्जून बघायलाच हवा असा आहे!...

समीरण वाळवेकर

Similar News