नांदेड लोकसभेसाठी भाजपकडून चिखलीकरांना उमेदवारी
भाजप मधील जुन्या लोकप्रतिनिधीच्याच शब्दाला किंमत, आयारामांच्या स्वप्नांना सुरुंग. लोकसभा उमेदवारीबाबत होता संभ्रम, अनेकांनी केला होता दावा;
नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर की अन्य कोणी? याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रम होता. त्यात अशोकराव चव्हाणांच्या भाजपातील एन्ट्रीनंतर अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव पाटिल खतगावकर यांची सून मिनल खतगावकर यांचे नावही उमेदवारीसाठी चर्चेत आले होते. तर दुसरीकडे भाजपातील विद्यमान आमदार आणि जिल्हाध्यक्षांनीही उमेदवारीसाठी दावा केला होता. त्यामुळे भाजपा धक्कातंत्रांचा अवलंब करते की काय? अशी शक्यताही वर्तविण्यात येत होती.
दरम्यान भाजपाने पुन्हा एकदा लोकसभेसाठी प्रतापराव चिखलीकर यांच्याच नावाला पसंती दिली असून बुधवारी त्यांच नाव घोषित झालेल्या भाजपाच्या दुसऱ्या यादीत चिखलीकरांचाही समावेश आहे. त्यावरून भाजपाने पक्षात नवीनच आलेल्या आयारामांनी आल्या बरोबर भाजपातील आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना भुरळ पाडत आपल्या गोटात सामील करून स्वतःचे वर्चस्व निर्माण केले होते आणि नांदेड लोकसभेसाठी आपले उमेदवार उभे करून, कोणत्याही पक्षात गेलो तरी आपणच पक्ष म्हणुन मोठे असा गैरसमज करून घेतला होता. त्यांच्या स्वप्नाला खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारीने मात्र सुरुंग लावला आहे. तर जुने भाजपायी कार्यकर्ते यांच्याच शब्दाला भाजपमध्ये किंमत असल्याचे दाखवून दिले आहे.
खासदार प्रतापराव चिखलीकर हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून भाजपात आले होते. तर हे आता काँग्रेसमधून अशोक चव्हाण भाजपात आल्यावर लगेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा, प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांची भेट घेऊन ही जागा चव्हाण गटातील उमेदवाराला सोडण्याबाबत चर्चा केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हिंगोलीची जागा भाजपला सोडल्यास नांदेडची जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी केली होती. त्यामुळे या दोन्ही जागांचा पेच निर्माण झाला होता. परंतू आता भाजपने नांदेड लोकसभेसाठी विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता हिंगोलच्या जागेकडे लक्ष आहे.
दरम्यान अशोकराव चव्हाणांच्या प्रवेशाने नांदेड लोकसभेची भाजपाची जागा सुरक्षित झालीय. तर या अगोदर भाजपाने केलेल्या अनेक सर्वेक्षणात नांदेडची भाजपाची जागा धोक्यात दाखविण्यात आली होती. ज्यात त्यांच्यासमोर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांचे तगडे आव्हान होते. कारण 2014 च्या मोदी लाटेतही अशोकराव चव्हाण हे विजयी झाले होते . परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांनी जवळपास 40 हजार मतांनी अशोकराव चव्हाणांचा पराभव केला. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या 1 लाख 66 हजार मतांचा फटका काँग्रेसला बसला होता. त्यानंतर गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जिल्ह्यातील भाजपाची सर्व सूत्रे चिखलीकरांच्या हाती आली. परंतु त्यामुळे भाजपातच उघडपणे दोन गट पडले होते. विद्यमान भाजपा आमदार आणि पदाधिकार्यांशी त्यांचे फारसे सख्य नसल्याचेही अनेक कार्यक्रमात दिसून आले होते. तर भाजपाने केलेल्या अनेक सर्वेक्षणात नांदेडची जागा धोक्यात असल्याचेच दाखविण्यात आले होते.
परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपाला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे.
दरम्यान चव्हाणांनी ही पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे नांदेडची जागा जिंकण्यासाठी भाजपाला आता वेगळे प्रयत्न करण्याची गरज दिसत नाहीयेत.
त्यातच काही दिवसापूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपाचे कमळ हाती धरले. त्यांच्यासोबत माजी खासदार भास्करराव खतगांवकर अन् त्यांच्या स्नूषा मिनल खतगांवकर यांनीही भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाकडून मिनल खतगांवकर या लोकसभेच्या उमेदवार राहतील अशा चर्चा सुरु होत्या. त्यात मिनल खतगावकर यांनी गृहमंत्री अमित शहा यांचीही काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे भेट घेतल्यानंतर या चर्चाना अधिकच जोर आला होता. तसेच भाजपाचे आमदार राम रातोळीकर, जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे यांनीही लोकसभा लढविण्याची ईच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपा धक्कातंत्रांचा वापर करुन उमेदवार बदलणार का? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. परंतु चिखलीकर मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळणार यावर ठाम होते. त्यानुसार बुधवारी भाजपाने जाहिर केलेल्या महाराष्ट्रातील 15 जागांच्या यादीत चिखलीकरांचे नाव झळकले अन् त्यांच्या समर्थकांनी सुस्कारा सोडला.