शिल्लकच नाहीये एकही बैल....

Update: 2017-08-21 07:50 GMT

पोळ्याच्या निमित्तानं MaxMaharashtra.com वर व्यक्त होत आहेत कवी पृथ्वीराज तौर....

वाचणे म्हणजे स्वतःलाच वाचणे.

आज पोळा आहे आणि मी रावसाहेब कुवर यांची कविता वाचत आहे –

“कृतज्ञता व्यक्त करणारा बाप

बसून आहे मुकाट्यानं

ठगवला गेल्यासारखा कोप-यात.

त्याला करायचा नाहीये

बैलाचा कोणताही शृंगार

मारायच्या नाहीयेत

मारोती मंदिराला प्रदक्षिणा

मिरवायचे नाहीये गावभर बैलांना.

कारण त्याच्या गोठ्यातल्या खुट्याला

शिल्लकच नाहीये एकही बैल

सजवण्यासाठी मालकी हक्काचा.” (बाप बैल आणि मीः२, ५३)

‘हरवल्या आवाजाची फिर्याद’ या संग्रहात ही कविता आहे. रावसाहेब कुवर यांची कविता वाचताना स्वतःलाच वाचत जात असल्याचा अनुभव येत आहे. विशेषतः ज्याचा भुतकाळ गावाशी, शेतीशी आणि गावमाणसांशी जोडला गेलेला आहे, अशा प्रत्येकाला ही कविता आपली असल्याचा प्रत्यय येऊ शकेल. या संग्रहातील अनेक कविता या अशात—हेनं गावसमुहाचे आत्मकथन आहेत.

कविता लिहीणा-या व्यक्तीचे लौकीक जगणे भीन्न भीन्न असू शकते. व्यक्तीचा जीवन प्रवास विशिष्ट टप्प्या टप्प्यांनी मांडला जातो, विशिष्ट काळानंतर व्यक्तीला प्राप्त झालेली कळा-अवकळा दाखवता येऊ शकते. त्याचे पद, प्रतिष्ठा, व्यवसाय, नोकरी, जात, आर्थिक स्थिती, शिक्षण अशा विविध मोजमापांनी तिला तोलले जात असते. या सगळ्यांच्या पलीकडे व्यक्तीचे जे अस्तीत्व आहे, त्याच्याकडे फारसे लक्ष जातेच असे नाही. व्यक्तीच्या बाह्य जगण्यासोबत असणारे त्याचे जे अंतःस्तरीय जगणे आहे, ते इतरांना ठाउक असेलच असे नाही. असे जगणे प्रत्येकच व्यक्ती जगत असतो, त्याचे होकार नकार, हुंकार आणि फुत्कार आत जन्म घेत असतात आणि मावळत असतात. त्याचे राग लोभ, मत्सर आणि संवाद आत असतातच. हे जे ‘आतले आवाज’ आहेत ते पकडणे कठीण असते, या आतल्या आवाजांशिवाय व्यक्ती पुर्ण होत नसते. रावसाहेब कुवर यांची कविता ही या ‘आतल्या आवाजाची कविता’ आहे. ती बाह्य अवकाशाला आतून मारलेली हाक आहे आणि आत बाहेर होणा-या घुसळणीला दिलेला प्रतिसादही आहे.

हे जे आतले आवाज असतात ते मूल्यकेंद्री असतात, म्हणूनच सतावणारे असतात. बोचणारे जे शल्य आहे, ठसठसणारे जे काळजाचे दुखणे आहे, खोल रुतणारा जो काटा आहे त्याला पकडणे समजुन घेणे आणि शब्दात बांधणे कठीण असते आणि हे कठीण कार्य रावसाहेब कुवर यांनी ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’ मध्ये यशस्वीपणे साकारले आहे.

रावसाहेब कुवर यांची कविता वाचतांना विशेषतः मुक्तछंदातील त्यांची कविता वाचतांना दूर्लक्ष झालेला, खूप क्षीण असलेला, वर्तमान आणि भुतकाळाच्या कोलाहालाचा स्वर कानी पडला. या कवितेने जे दृश्य उभे केले ते खूप परिचित, खूप ओळखीचे आहे. आपल्या आजुबाजुची सामान्य माणसे या जगाचे पराभूत नायक आहेत. त्यांचे मोडून पडणे, उद्ध्वस्त होणे आणि नष्ट होणे या कवितेचा विषय आहे. हा विषय ते ज्या अनोख्या पद्धतीने समोर मांडतात ती पाहिल्यानंतर वाचक स्तब्ध होतो. गावाच्या नष्ट होण्याच्या प्रक्रियेला प्रत्येकानेच कसा हातभार लावला याची जाणीव रावसाहेब फारच नेमकेपणाने करुन देतात.

“बॅनरमधली माणसं

हसताहेत हात जोडून

जाणा-या येणा-या

तुमच्या माझ्याकडे पाहून

च्युत्या बनवण्याचा गेम

अखंडित सुरु असल्याच्या

अघोरी आनंदात.” (बॅनरमधली माणसं, ३४)

किंवा

“आता

कर्जापायी ‘इतर अधिकारात’

दाखल झालेलं बॅंकेचं नाव खोडून

मरत्या बापाच्या नावाभोवती आळे मारुन

होऊ शकत नाही

आपल्या नावावर सातबारा

याची खात्री झालेली पोरं

बसली आहेत येड्यासारखी

निरर्थक गप्पांचे चर्वण करत

उन्हाळी सुटीनं बेवारस झालेल्या

शाळेच्या ओट्यावर.”(खेड्यातली पोरं बसली आहेत येड्यासारखी, २४)

अशा एका विशिष्ट लयीतील काही ओळी वाचकाला दिशा हरवलेल्या वास्तवाचे दर्शन घडवतात. अंतिमतः ही लय वाचकापुढे उदास खेडे उभे करते. असे खेडे ज्याच्या माथ्यावरचे आकाश चोरी गेलेले आहे, ज्या आकाशात आता सुर्य उगत नाही, ज्या आकाशात आभाळ भरुन येत नाही, मातीचे फुफाटे तुडवत जिथल्या शेतक-यांचे तांडे मजुर होऊन शहराकडे निघाले आहेत.

‘पुन्हा एक शेतकरी संपला’ ही व्यापक भूभागावर वास्तव्य करणा-या कृषीसमुहाचीच शोकांतिका आहे. ‘गाव झालं गोगलगाय’ सारखी कविता तिच्या एकीकडे भाषिक शैलीमुळे लक्षात राहाते तर दुसरीकडे शहरी माणसांची लबाडी, शासकीय योजनांचे फोलपण उघडकीस आणते, ‘कैकदा थरथरला माझा हात’ ही कविताही खोट्या माणसांचे मुखवटे टराटरा फाडते. किंबहूणा लबाडीमुळे संपुण जाणा-या परिघावरच्या माणसांचे तळतळाट, शाप चाकरमान्यांना सुनावते.

संग्रहातील ‘झाव-या सुताराच्या मायची झावर’ ही कविता मला विशेष आवडली. सोमनाथ नावाच्या सुताराची ही गोष्ट. सगळं गाव त्याला झाव-या सुतार म्हणुन ओळखायचे.

“जन्म होताच मरायची याची भावंडं

म्हणून लडवली शक्कल सुईणीनं

हा जल्मला तेव्हा

आणि ठेवलं गुंडाळून याला झावरीमध्ये

अखेरचा उपाय म्हणून.

झावरित घातलेल्या मायच्या

फाटक्या लुगड्याला पुरणाच्या उबेनं की काय

पण वाचला पठ्ठ्या एकदाचा

आणि झाले त्याचे नामकरण ‘झाव-या’ (झाव-या सुताराच्या मायची झावर, १८-१९)

पुढे झाव-याचे कसब, कारागिरी, सुतारकामातील त्याचा लौकीक, वाढता कुटुंबकबीला यांचे संदर्भ येत जातात आणि झावर-याची गोष्ट कळत जाते. झाव-याचा एक मुलगा कंपनीत चिकटतो आणि दुसरा ग्लोबल गावात सुताराचा कारपेंटर होतो. तो नांगर, वखर, पांभर बनवत नाही, शहरातील तो दिवाण, डायनिंगसेट, सोफासेट बनवतो. रावसाहेब पुढे लिहीतात –

“त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन

कुनब्यासकट अख्खे कारुनारुही

करु लागले आहेत प्रस्थान

भाकरीच्या शोधात शहराकडे

आणि गाव देऊ लागलं आहे, अखेरचे आचके.

आता झाव-या सुताराच्या

मायची झावर कोठून आणू मी

हे गाव वाचावं म्हणून.” (झाव-या सुताराच्या मायची झावर, २१)

आपण का लिहीतो? या प्रश्नाचं उत्तर कवीला द्यावंचं लागत असतं. रावसाहेब कुवर यांनी‘गाव वाचावं म्हणून’ कविता लिहीली, गावाचं उद्द्वस्त होणं पटलं नाही म्हणून कविता लिहीली. गावमाणसांच्या, शेतक-यांच्या, शेतीमातीच्या संपन्नतेचं स्वप्न हा कवी पाहातो, आणि गाणं गातो. ज्याचा भुतकाळ गावाने समृद्ध केलेला आहे असा वाचक म्हणून मला वाटतं, माझाच आतला आवाज हा कवी व्यक्त करतो.

- पृथ्वीराज तौर @ 7588412153

Similar News