किटकनाशक फवारणी केल्याने तीन एकरातील सोयाबीन झाली नष्ट

सोयाबीन पिकावर किटकनाशक फवारणी केल्याने संपुर्ण तीन एकर पीक जळून गेल्याची घटना बुलडाणा येथून समोर आली आहे. त्यामुळे संबधित शेतकऱ्यावर सुल्तानी संकट कोसळलं आहे. दोषी कृषि सेवा केंद्रावर कारवाई करत झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे

Update: 2021-07-28 08:39 GMT

बुलडाणा जिल्ह्यात यंदा उशिरा का होईना समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात 93 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. सोयाबीनची पिकेही यावर्षी चांगली आली आहेत, परंतु काही ठिकाणी सोयाबीन पिकावर खोंडमाशी व चक्राभुंगा अळीने आक्रमण केल्याने शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करतांना दिसत आहे. असाच पध्दतीने बुलडाणा तालुक्यातील साखळी खुर्द येथील शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर किटकनाशक फवारणी केली असता उभे सोयाबीन पीक जळून गेल्याची घटना समोर आली आहे.

साखळी खुर्द गावातील दिव्यांग शेतकरी प्रदीप भागाजी हिवाळे यांना साडेतीन एक्कर कोरडवाहू शेती आहे, यावर्षी त्यांनी 30 हजार रुपये व्याजाने पैसे घेऊन शेतात सोयाबीनची पेरणी केली. या शेतीच्या भरवश्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मागील काही दिवसांपुर्वी सोयाबीन पिकांवर खोड अळीने आक्रमण केले, त्यामुळे प्रदीप हिवाळे यांनी गावातीलच एका कृषि सेवा केंद्रातून किटकनाशक घेऊन फवारणी केली. मात्र, या औषधाचा उलटा परिणाम झाला आणि संपुर्ण पीकं जळून खाक झाले. संपुर्ण पीकं उध्वस्त झाल्याने या कुटुंबावर सुल्तानी संकट कोसळले आहे.

दरम्यान हिवाळे यांनी संबधित कृषि सेवा केंद्र चालकाकडे तक्रार केली असता त्याने पाहणी करून संबधित औषध कंपनीला कळवले आहे. मात्र, आता हिवाळे कुटुंबासमोर प्रश्न उभा राहीला आहे तो 30 हजारांचे कर्ज फेडायचे तर कसे ?

आता मायबाप सरकारने तातडीने आम्हाला आर्थिक मदत करावी अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असा टाहो हिवाळे दाम्पत्याने फोडला आहे. संबधित कृषि सेवा केंद्रातील कीटकनाशक वापरून गावातील अनेक शेतकऱ्यांनी फवारणी केली आहे आणि आता त्यांच्या शेतातील सोयाबीन पीक देखील पिवळे पडत चालले आहे , त्यामुळे हे शेतकरी देखील चिंतेत पडले आहेत. त्यांनी देखील कृषी विभागाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. आता या कृषी सेवा केंद्रावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

Tags:    

Similar News