कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकेचा नकार

Update: 2020-07-17 14:48 GMT

सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीसुद्धा.. पण आता सांगली जिल्ह्यात कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज देण्यास सांगली -मध्यवर्ती सहकारी बँकेने नकार दिला आहे. त्यासंदर्भातले परिपत्रकच बँकेनं सर्व सोसायट्यांना पाठवले आहे. त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध न झाल्याने पेरणी करता येत नाहीये.

तासगाव तालुक्यातील बस्तवडे इथल्या शहाजी पाटील यांना कर्जमाफीचा लाभ झाला. शहाजी पाटील यांनी आपल्या नावावरील जमिनीवर पीक कर्ज काढले होते. त्यांच्या भावानेही स्वतंत्र उतारे असल्याने कर्ज काढले. पण कर्जमाफीच्या निकषात शहाजी पाटील हे एकटेच बसले आणि त्यांचे भाऊ निकषात न बसल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आता नवीन हंगामासाठी शहाजी पाटील जेव्हा पीक कर्ज काढण्यासाठी गेले तेव्हा बँकेने त्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. एकाच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावावरील कर्ज थकीत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला आम्ही कर्ज देऊ शकत नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे. सरकारकडून असे कोणतेही आदेश नसताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे धोरण ठरवल्याने असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांना परिपत्रक काढून तसे आदेश देण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. बँकेच्या या धोरणामुळे शेतकरी आता खासगी सावकारांकडे घरातील सोने गहाण ठेऊन आपली शेती पिकवू लागला आहे.

 

Full View

Similar News