Farmer Distress: फक्त पंचनामे झाले, मदत पोहचलीच नाही!

Update: 2019-11-04 13:50 GMT

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मडिलगे या गावात कवी सुनील मडिलगेकर राहतात. ते शेतकरी आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरातील पूर परिस्थिती त्यांंनी अनुभवली आहे. नेमकं त्याच काळात त्यांचे वडील पुण्यात हॉस्पिटलला दाखल होते. पाठोपाठ भाऊ हॉस्पिटलला दाखल होता. पुण्यातून कोल्हापूरला पोहोचले तरी मडिलगेपर्यंत जाण्यासारखी परिस्थिती नव्हती. वाटेत सगळीकडे पूर पसरलेला होता. हे सगळे भयाण दिवस अनुभवल्यानंतर पूर ओसरला आणि मग लक्ष शेतीकडे गेलं. सगळी शेती पाण्याखाली होती. उसाचं, भाताचं मोठं नुकसान झालेलं होतं. त्यातून सावरेपर्यंत परतीच्या पावसाची अवकृपा झाली.

माणूस एका बाजूला परिस्थितीशी झगडत असतो आणि दुसऱ्या बाजूला संकटांमागून संकट हल्ला चढवत असतात. अशा परिस्थितीत सरकार नावाची एक व्यवस्था असते, ज्याकडे लोक सहाय्यासाठी डोळे लावून असतात. कवी सूनील मडिलगेकर मोठ्या मनाने सांगतात की माझ्यासारखा एखादा शेतकरी सावरू शकतो, परंतु ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचं काय ? सरकारने त्यांच्यासाठी तरी वेगाने पावले टाकली पाहिजेत. पण प्रत्यक्षात पंचनामे होऊन गेले, तरी अजून मदत पोहोचलेली नाही. पंचनामे करतानासुद्धा शेतकऱ्यांचं शेतीचे क्षेत्रफळ आहे, त्यापेक्षा कमी दाखवण्याचा खोडसाळपणा सुद्धा सरकारी यंत्रणांनी केल्याची तक्रार आपल्याला ऐकायला मिळते. याबद्दल कोल्हापूर चे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'ला सांगितलं की नुकसानभरपाई अदा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

काही शेतकऱ्यांवर कर्ज आहे, त्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. ज्यांच्यावर कर्ज नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळेल, परंतु पीक कुठलं आहे, जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे, त्यावर आधारित नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि त्याचे मूल्यांकन सरकारी पद्धतीने होतं, त्याहून तीन पट रक्कम देण्याचं धोरण आहे, असं जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर कवी सुनिल पाटील मडिलगेकर आपल्या कवितेतून ज्या पद्धतीने व्यक्त होतात, ती व्यथा मात्र काळजाला चटका लावणारी आहे.

झोका झुलतो झाडाले,

तसा लटकतो बाप

माय कुंकवा पुसता

डसे कांकणाला साप

हे शब्द सरकारी यंत्रणांचे डोळे उघडण्यासाठी पुरेसे बोलके आहेत.

Similar News