मुख्यमंत्री साहेब, पीकविमा देता की, आत्महत्येची परवानगी देता ?

Update: 2019-07-13 07:48 GMT

शेतीचा शाश्वत विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार केला जातोय. मात्र, प्रत्यक्षात ज्या यंत्रणांवर शेतक-यांना दिलासा देण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याकडूनच शेतक-यांचं खच्चीकरण सुरू आहे. अखेर यंत्रणांच्या त्रासाला वैतागलेल्या त्रस्त शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रुड येथील शेतक-यांच्या सोयाबीन पिकाचं 2018 मध्ये मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी या नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले होते. शेतक-यांनी विम्याचा हप्ताही भरला होता. मात्र, तेव्हापासून शेतक-यांना बँकेकडून पीकविम्याचा एक छदामही मिळालेला नाही. शेतक-यांनी बँकांमध्ये कित्येक चकरा मारल्या. मात्र, बँकेकडून शेतक-यांना थातुरमातूर उत्तरं दिली जात आहेत. त्यामुळं आता संतप्त शेतक-यांनी आत्महत्येसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांना लेखी परवानगी मागितलीय.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रूड जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावातील हजारो शेतकरी एकत्र आले. आणि विमा कंपनीच्या गलथान कारभाराला वैतागत थेट जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांना आत्महत्येच्या परवानगीची मागणी केली आहे. येत्या 14 जुलै पर्यंत विमा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास 15 तारखेला दिंद्रुड बसस्थानक येथे सर्व शेतकरी लाक्षणिक उपोषण करेल. आणि या उपोषणानेही आमचा प्रश्न मार्गी लागणार नसेल तर जिल्हाधिका-यांनी आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलीय.

आधीच बीड जिल्ह्यातला शेतकरी दुष्काळामुळं अडचणीत सापडलाय. त्यात प्रशासन आणि सरकारकडून त्यांना दिलासा मिळण्याऐवजी त्रासच होत असल्याचं या घटनेतून स्पष्ट होतंय. या त्रासाची परिणीती भविष्यात गंभीर होऊ नये, यासाठी शेतक-यांनी आधीच प्रशासनाकडे आत्महत्येची परवानगी मागितलेली आहे. मात्र, अजूनही प्रशासनाकडून यासंदर्भात शेतक-यांना कुठलंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. पिक विमा कंपन्या आणि अधिकारी यांच्यात साटंलोटं असल्याचा आरोपही शेतक-यांना केला आहे. चार वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीत शेतात कशी तरी पेरणी केली आहे. पण मशागतीसाठी आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा ची रक्कम मिळण्याची आशा धुसरच आहे.

15 ऑगस्टपर्यंत पूर्ण रक्कम शेतक-यांना देऊ – गिरीष लोखंडे, व्यवस्थापकीय संचालक, जय महेश साखर कारखाना.

जय महेश कारखान्याकडे ज्या शेतकऱ्यांचे बील थकीत आहेत , त्या शेतकऱ्यांना 1725 रुपये एफआरपी प्रमाणे या महिन्यात 80 टक्के बील देण्यात येईल व उर्वरित 20 टक्के बील 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही देऊ.अशी माहिती , जय महेश कारखान्याचे MD गिरीश लोखंडे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलतांना दिली.

Full View

Similar News